प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २५ वें.
बुद्धोत्तर चीन व जपान.

मांचू लोकांची चीनवर स्वारी.- या सुमारास मांचू तातार लोकांनां चिनी लोकांनीं वरचेवर बराच त्रास दिल्यामुळें त्यांनी चीनवर १६१६ मध्यें स्वारी केली आणि चिनी सैन्याचा पराभव केला. यानंतर तीन वर्षांनीं लिओ तुंग हा प्रांतहि त्यांनीं जिंकून घेतला. या संकटामुळें हृदयाला धक्का बसून चिनी बादशहा १६२० मध्यें मरण पावला. मांचू लोकांचा राजा तिएन मिंग यानें चीनचे सार्वभौमत्व झुगारून देऊन आपलें राज्य स्वतंत्र केलें. १६२७ मध्यें मिंग घराण्याचा शेवटचा बादशहा त्सुंग चेंग राज्यावर आला. त्याच्या कारकीर्दींत इंग्रज व्यापारी प्रथम कँटन बंदरांत आले. या शेवटच्या चिनी बादशहाच्या कारकीर्दींत सर्वत्र बंडाळी माजली बंड मोडण्याकरितां मांचू लोकानां मदतीस बोलाविलें त्यांनीं पेकिंग शहर घेतलें. पण नंतर परत न जातां मांचू लोकांनीं आपला तिएनमिंग याचा नववा मुलगा गादीवर बसविला व त्याला शुनचि ही पदवी देऊन त्याच्या घराण्याला तात्सिंग हें नांव दिलें. या सुमारास नानाकिंग येथेंहि बंडाळी माजली तेव्हां तातार सैन्यानें हल्ला करून तें शहर घेतले. त्यावेळीं मिंग घराण्यांतल्या शेवटच्या बादशाहानें पळून जाऊन यांगत्सि-किआंग या नदींत प्राण दिला. याप्रमाणें मिंग घराण्याचा शेवट झाला व परक्या मांचू लोकांची सत्ता चिनी साम्राज्यावर सुरू झाली. या मांचू लोकांनीं चीनचे एकंदर १८ प्रांत पाडिले. ही विभागणी अद्याप चालू आहे.