प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २५ वें.
बुद्धोत्तर चीन व जपान.
आधुनिक सुधारणांचा काळ - जपानचा हा एकांतवास १८५२ च्या सुमारास संपला. या सुमारास 'युनैटेड स्टेटस' च्या सरकारनें कोमोडोर पेरी नांवाचा वकील व्यापारी तह करण्याकरितां जपानांत पाठविला व त्यांच्याबरोबर आरमाराचा ताफा दिला. तीं आधुनिक लढाऊ जहाजें पाहिल्यावर त्यांचा प्रतिकार करणें लष्करी बाबतींत मागासलेल्या जपानला शक्य नव्हतें. त्यामुळें तह करून अमेरिकेला व्यापाराची मोकळीक देणें जपानला भाग पडलें. नंतर इंग्लिश, डच, फ्रेंच वगैरे राष्ट्रांनींहि सदरहू प्रकारचे तह करून व्यापार सुरू केला. बाह्याबरोबरच्या संबंधांत ही क्रांति घडून येतांच जपानच्या अंतःस्थितीवर त्याचा महत्त्वाचा परिणाम झाला व १८६७ मध्यें जपानमध्यें दुसरी महत्त्वाची क्रांति घडून आली. ही क्रांति म्हणजे शोमुनांची उर्फ कारभा-यांची सत्ता कमी करून बादशहाच्या हातीं संपूर्ण सत्ता देणें व त्याबरोबर देशांत कायदेमंडळ स्थापन करणें ही होय. याच वेळीं वंशपरंपरागत नोक-यांची व सरंजामदा-यांची पद्धति बंद करून विद्वत्ता व हुषारी पाहून अधिकारी नेमणें, आणि लोकप्रतिनिधींमार्फत व्यक्त होणा-या लोकमतानुसार राज्यकारभर चालविणें इत्यादि राजकीय सुधारणा अमलांत आल्या. तेव्हांपासून जपाननें राजकीय, औद्योगिक, व्यापारी वगैरे बाबतींत यूरोपीयांचें अनुकरण करून अवघ्या चाळीस वर्षांत राष्ट्राची इतकी सुधारणा केली कीं, चीन व रशिया या अवाढव्य साम्राज्यांचाहि जपाननें रणांगणावर पराभव केला व त्यामुळें यूरोपीय राष्ट्रें जपानला बरोबरीच्या नात्यानें वागवूं लागलीं.
एवढी प्रगति एवढ्याशा अल्प काळांत जपाननें कशी घडवून आणली याबद्दल पुष्कळांनां आश्चर्य वाटतें. या कोड्याचें उत्तर असें आहे कीं, सुधारलेल्या जपानी सरकारनें पाश्चात्य सुधारणेची सर्व अंगें उपांगें सुरु करण्याचें काम एकदम हातीं घेतलें. नव्या सुधारणावादी पुढा-यांपैकीं बहुतेक यूरोप, अमेरिका येथें राहून सर्व पाश्चात्त्य गोष्टींचें सूक्ष्म अवलोकन करून आलेले असल्यामुळें जपानांत सर्व बाबतींत त्यांनींच पुढाकार घेतला होता व राजकीय सत्ताहि त्यांचेंच हातीं होती. त्यांनीं रेल्वे बांधणें, तारायंत्रें सुरु करणें, समुद्रांत दीपगृहें बांधणें व आरमार तयार करणें या कामांकरितां तज्ज्ञ इंग्लिश लोक नेमले; कायदेग्रंथ करण्याकरितां व सैन्याला हालचाली, डावपेंच व रचना शिकविण्याकरितां फ्रेंच लोक नेमले; शिक्षण, पोस्टखातें, शेतकीसुधारणा व वसाहतीची स्थापना या गोष्टी अमेरिकन तज्ज्ञांवर सोपविल्या; औषधिशास्त्र, व्यापारी कायदेबुकांची रचना, स्थानिक कारभार, संस्थांची मांडणी व लष्करी अधिका-यांचें शिक्षण या गोष्टी जर्मन तज्ज्ञांच्या हातीं दिल्या आणि खोदकाम व रंगकाम शिकविण्याच्या कामीं इटालियनांची नेमणूक केली. अशा रीतीनें विविध परदेशस्थ तज्ज्ञांच्या द्वारें एकदम सुरू केलेल्या अनेकविध सुधारणा जपानी लोकांच्या पचनीं पडणें मोठें कठिण आहे असें परकीयांस साहजिक वाटे. परंतु जपानी लोकांना त्यांचा कांहींच बाऊ वाटला नाहीं. आपला पुराणाभिमान कायम ठेवून त्यांनीं वरील बाह्य उपकरणांचा व सुखसोयींचा स्वीकार केला. अर्थात् यामुळें नव्या जपानी पिढीची राहणी द्विविध बनली. हे लोक दिवसां आफिसचे व कामाचे वेळीं पोषाख, शिस्त वगैरे सर्व बाबतींत पाश्चात्त्यांचे धर्तीवर वागत असत; आणि कामावरून सुटून मोकळे होतांच आपले जुने देशी कपडे चढवून पुरातन पद्धतीनें कालक्रमणा करीत. जपानी लोकांनीं रेल्वे, आगबोटी, तारायंत्रें, पोस्टऑफिसें, व्यांका व सर्व प्रकारची यंत्रसामुग्री पाश्चात्त्यांपासून ग्रहण केली. पाश्चात्त्य भौतिक शास्त्रेंहि त्यांनीं आत्मसात् केलीं, पाश्चात्त्य तत्त्वज्ञान ब-याच अंशी मान्य केलें, यूरोपीय कायदेपद्धतीचें श्रेष्ठत्व कबूल करून त्या नमुन्यावर आपले कायदेग्रंथ बनविले; आणि इतकें करूनहि आपलेपणा न गमावतां प्रत्येक बाबतीत आपलें जपानी वैशिष्ट्य त्यांनीं कायम राखलें. सर्व पाश्चात्य सुखसोयींचा उदारबुद्धीनें संग्रह करूनहि त्यांनीं आपल्या परंपरागत चालीरीतींनां व समजुतींनां फारसें दुखविलें नाहीं ही जपानी सुधारणावाद्यांतील अत्यंत तारीफ करण्यासारखी गोष्ट आहे. दोन विजातीय संस्कृतीच्या संमिश्रणाचें हें अत्यंत अवघड काम करीत असतां त्यांचे हातून कित्येक वेळां वेडगळपणाच्या चुका झाल्या; पण त्या लवकरच दुरूस्त करून एकंदर सुधारणेच्या कामांत त्यांनीं चांगलें यश संपादन केलें आहे; व त्यामुळें पुढील सुधारणेच्या मार्गांतहि आपली राष्ट्रीय दृष्टि कायम ठेवून योग्य तितक्या गोष्टीच ते स्वीकारतील व स्वसमाजाच्या पचनीं पाडतील, अशी खात्री वाटते.