प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २५ वें.
बुद्धोत्तर चीन व जपान.

चौ घराणें (ख्रिस्तपूर्व ११२२ - २५३).- शाग अथवा इन घराण्यानंतर चीनवर चौ घराण्याचें राज्य सुरू झाले. या घराण्याचा पहिला बादशहा वू-वंग हा होता. चौ हा पश्चिमसरहद्दीवर एक जमीनदारीचा प्रदेश आहे. बादशहाचा भाऊ चौ-कुंग यानें साम्राज्याची सुसंघटना करण्याचे कामी आणि राज्यकारभाराची नीट व्यवस्था लावण्याचे कामीं फार मदत केली व बादशहानें आपले भाऊबंद व स्वपक्षीय प्रमुख यांनां मोठाल्या जमीनदा-या बहाल केल्या. त्यांतूनच पुढें अनेक संस्थानें उदयास आलीं. या वेळीं चीनच्या साम्राज्याची घटना सांप्रतच्या जर्मन साम्राज्याच्या घटनेप्रमाणें बनली. म्हणजे अनेक चिनी स्वायत्त संस्थानांचा संघ बनवून त्या सर्वांच्यावर एक बादशहा नेमण्यांत आला. धार्मिक बाबतींत चीनचा बादशहा हाच मुख्य पुरोहित मानला जात असे. राष्ट्रातर्फें होणारी परमेश्वराची प्रार्थना किंवा परमेश्वराला द्यावयाचें बलिदान बादशहाकडून करविण्यांत येत असे. वरिष्ठ सरकारी नोकरांबद्दल जमीनदारांबरोबर व मांडलीक राजांबरोबर बादशहाचे संबंध कशा प्रकारचे असावेत, परस्परांनीं एकमेकांचा मानमरातब कसा राखावा, पोशाख कसा करावा, भाषणें कोणतीं करावीं वगैरे सर्व बाबतींत नियम केलेले होते व त्यांप्रमाणें बादशहाला वागावें लागत असे. बादशहाच्या मर्जीवर किंवा लहरीवर कोणती गोष्ट न सोपवतां प्रत्येक बाबतीचे नियम घालून दिल्यामुळे सर्व बादशाही कारभाराला कायम शिस्तीचें वळण लागलें. प्रत्येक नवा बादशहा पूर्वजांच्या पद्धतीप्रमाणें वागणे आपलें कर्तव्य आहे असें मानीत असे आणि सर्व चिनी प्रजा पूर्वपरंपरेनुसार वागणा-या बादशहाशीं अत्यंत राजनिष्ठ रहात असे.

वू-वंग बादशहानें घालून दिलेली साम्राज्यकारभाराची शिस्त पुढें कायम टिकली नाहीं. कित्येक बादशहा दुर्बल निघाले तर दुसरे कित्येक फार कडक रीतीनें अंमलबजावणी करूं लागले. त्यामुळें बादशहा व त्यांचे मांडलीक यांच्यामध्यें असंतोष व बेबनाव उत्पन्न झाला. साम्राज्याचा विस्तार वाढल्यामुळें बादशाही सत्तेला सर्वांवर नीट नियंत्रण ठेवतां येईना. खुद्द बादशहाचा मुलूख देशाच्या मध्यभागीं असून त्याच्या भोंवताली चोहाबाजूंनीं मांडलीक राज्यें पसरलेली होतीं. त्यामुळें साम्राज्याच्या विस्तार झाल्यास त्याचा फायदा सरहद्दीवरील मांडलीक राजांनां मिळून त्यांचा मुलूख व सामर्थ्य वाढत असे. उत्तर व पश्चिमेकडील तार्तार जातीच्या टोळ्या आणि दक्षिणेकडील रानटी टोळ्या यांनां जिंकल्यावर त्यांचा चिनी लोकांशीं व्यापारविषयक संबंध व पुढें प्रत्यक्ष शारीरिक संबंधहि होऊं लागला. त्यामुळें मूळचीं उच्च दर्जाची बुद्धिमान् चिनी जात रानटी लोकांच्या रक्तामुळें मिश्र बनली. या मिश्र जातीमध्यें रानटी लोकांचा जोम व युद्धप्रियता अधिक दिसूं लागली. अशा कारणामुळें पुढें सरहद्दीवरील मांडलीक राज्यें मध्यवर्ति बादशाही सत्तेला डोईजड झालीं. चौ घराण्यांतील एकंदर ३५ बादशहांपैकीं कांहीं थोडेसे विशेष गुणसंपन्न होते. अशांपैकीं म-वंग नांवाच्या दहाव्या शतकांतील बादशहानें आपल्या साम्राज्याच्या पश्चिम सरहद्दीपलीकडे दूरवर सैन्यासह चाल करून तिकडील हूण उर्फ हिउंग-नू या रानटी लोकांचा पराभव केला. सुवन-वंग याच्या कारकीर्दींत (ख्रि. पू. ८२७-८०२) हूण आणि तंगुतन या लोकांबरोबर युद्धें झालीं. या सुमाराचा यू-वंग हा दुर्व्यसनी राजा फार जुलमी होऊन गेला. त्याच्या दुष्कृत्यांचें वर्णन एका शाहीरानें आपल्या पद्यग्रंथांत करून ठेवलें आहे. या बादशहानें इतकीं दुष्कृत्यें केलीं कीं, खुद्द परमेश्वराचा कोप होऊन त्यामुळे कांहीं अशुभ गोष्टी घडल्या असें ह्या शाहीरानें लिहून ठेवलें आहें. या अशुभ गोष्टीपैकीं सूर्यग्रहण ही एक होती. या ग्रहणाची चिनी मिति ख्रि. पू. ७७६ ऑगस्ट २९ तारखेशीं बरोबर जमते. यामुळें चीनच्या इतिहासांतील प्राचीन माहिती अधिक विश्वसनीय ठरते. चीनमध्यें प्राचीन इजिप्तप्रमाणें मनोरे किंवा देवालयांचे अवशेष उपलब्ध नाहींत. परंतु शांग व चौ घराण्याच्या वेळचीं ब्राँझ धातूचीं कांहीं भांडीं वर लेख कोरलेलीं उपलब्ध आहेत. त्यावरून या दोन्ही घराण्यासंबंधाची कांही निश्चित माहिती मिळूं शकते. तथापि चिनी राष्ट्राच्या ख-या ऐतिहासिक काळास ख्रि. पू. ७७६ पासून आरंभ होतो असें म्हटलें पाहिजे.

ख्रि. पू. ७ व्या शतकांत चिनी बादशहांची सत्ता अगदीं कमकुवत होऊन चिनी संस्थानांपैकीं पांच संस्थानें विशेष प्रबल बनलीं. त्सी म्हणजे सध्यांचें उत्तर शान-टुंग हे संस्थान कुअन-त्झी या तत्ववेत्त्या मुख्य प्रधानाच्या नेतृत्वाखालीं इतरांपेक्षां आर्थिक दृष्ट्या फार सामर्थ्यवान बनलें. बाकीचीं चार लष्करी सामर्थ्यांत अधिक बलिष्ट बनलीं. या प्रमुख संस्थानिकांमध्यें त्सिनचा संस्थानिक मु हा एक होता. हें संस्थान पश्चिम सरहद्दीवर असून त्यांतील चिनी लोकांचें शेजारच्या हूण लोकांशीं बरेंच मिश्रण झाल्यामुळे इतर चिनी लोक त्यांनां रानटी चिनी म्हणूं लागले. हे प्रमुख संस्थानिक बादशाहास पूर्णपणें जुमानीनासे होऊन आपसांत श्रेष्ठत्वाकरितां लढाया करूं लागले. चीनच्या इतिहासांतील या काळाला ''भांडणा-या संस्थानिकांचा काळ'' म्हणतात. या काळांत पराक्रमाचीं त्याप्रमाणेंच भ्याडपणाचीं तसेंच मुत्सद्देगिरीचीं आणि तत्त्वतेत्यांनां शोभणा-या मनाच्या समतोलपणाचीं अनेक कृत्यें घडलीं. ती अनेक गद्यपद्यमय सुंदर ग्रंथांत ग्रथित करून ठेवलेलीं आहेत. चौ घराण्याच्या वेळीं बादशाही सत्तेचा बराच उक्तर्ष झाला. त्याचप्रमाणें त्या काळांत वाङ्मयहि ब-याच उच्च दर्जाचें निर्माण झालेलें असून त्यावरून तत्कालीन लोकांचा जीवनक्रम अध्यात्मिक दृष्ट्या बराच उच्च दर्जाचा होता असे स्पष्ट दिसतें. तत्कालीन पुराणमताभिमानी बादशहा व इतर राजघराण्यांतील मंडळी यांचे नैतिक विचार कशा प्रकारचे होते हें कनफ्यूशियन (ख्रि. पू. ५५१ - ४७९) या श्रेष्ठ पुरूषाच्या ग्रंथामध्यें पहावयास मिळतें. या चीनच्या महान् साधुपुरुषानें चिनी राष्ट्रांत अनेक शतकें प्रचलित असलेलीं नीतितत्त्वें आणि परंपरागत चालीरीती एकत्र नमूद करून ठेविल्या आहे. कन्फ्यूशियसनें चीनमध्यें एक विशिष्ट पंथ प्रस्थापित केला. त्याचे अनेक अनुयायी बनले. पितृभक्ति हा चिनी इसमाचा श्रेष्ठ गुण मानला जात असे; व तद्‍नुसार आईबापाची आज्ञा मानणें आणि बादशहाशीं राजनिष्ठ रहाणें हें प्रत्येकाचें पहिलें कर्तव्य असल्याचें कनफ्यूशियसचा पंथ म्हणतो. या पंथाचा राजांनां असा उपदेश असे कीं, ''याऊ शून वोयू यांच्या प्रमाणें व्हा म्हणजे तुमची वागणूक नेहमीं बरोबर राहील.'' या पंथांत पुढें मेनशिअस हा एक मोठां उपदेशक झाला. कनफ्यूशियस पंथाचीं तत्त्वें चौ घराण्याच्या वेळीं बरींच प्रचलित होती. पण पुढें एक प्रतिपक्षी पंथ उद्भवला. या पंथाचीं तत्त्वें लाऊत्से यानें घालून दिलीं. हीं तत्त्वें बादशहाशी राजनिष्ठ न राहूं इच्छिणा-या लोकांनां मान्य होण्यासारखीं होतीं. याशिवाय लोकांनां आत्मश्लाघा करण्यास प्रवृत्त करणारे यंगचू सारखे कित्येक उपदेशक निघाले. असल्या उपदेशामुळें चिनी समाजांत अनीति आणि बेबंदशाही माजूं लागली. अनेक संस्थानिक बादशहाशीं बेइमान होऊं लागले. त्यांत त्सिनचा संस्थानिक प्रमुख होता. त्यानें अनेक संस्थानें प्रथम गिळंकृत करून चौ घराण्याचा शेवटचा दुर्बल बादशहा ननवंग याच्या बरोबर युद्ध सुरू केलें. व चौ बादशहाच्या मुलखापैकीं बराच भाग जिंकून घेतला. ख्रि. पू. २५६ मध्यें ननवंग मरण पावला. व पुढें दोन चार वर्षे बेबंदशाही चालून अखेर बादशाही सत्ता त्सिन घराण्याकडे गेली.