प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २५ वें.
बुद्धोत्तर चीन व जपान.

तात्सिंग मांचू नांवाचे घराणें.- मांचू घराण्याचे राजे किन नांवाच्या चिनी घराण्याचे वंशज होते, असे अनेक पुराव्यावरून सिद्ध झाले आहे. मांचू घराण्याचा पहिला बादशहा शुनचि याच्या कारकीर्दींत माजी मिंग घराण्याच्या पक्षपाती लोकांनीं अनेक ठिकाणी बंडें केली पण ती मांचू तातार लोकांनीं सर्व मोडलीं. या पहिल्या बादशहानें शास्त्रीय ज्ञानास बरेंच उत्तेजन दिलें. याच्याच वेळी १६५६ मध्यें रशियाचे वकील चीनच्या दरबारीं आले परंतु त्यांनीं बादशहापुढें 'कौ तौ' मरण्याचें नाकारल्यामुळें बादशहाची भेट न होतां परत जावें लागलें. शुनचि १६६१ मध्यें मरण पावुन त्याचा मुलगा कांगहि राज्यावर आला. याच्या कारकीर्दींत रशिया बरोबर तंटा सुरु झाला पण नेरचिन्स्कच्या तहानें १६८९ मध्यें तो मिटला. कांगहि बादशहानें जेसूट लोकांच्या मदतीनें वाङ्मय व शास्त्रें यांचा बराच अभ्यास केला. त्यानें चिनी भाषेचा एक कोशहि प्रसिद्ध करविला. याच्या कारकीर्दींत तिबेट प्रांत चिनी साम्राज्यास जोडण्यांत येऊन सैबीरियापासून कोचीन चीन पर्यंत व चिनी समुद्रापासून तुर्कस्तानापर्यंत चिनी साम्राज्याचा विस्तार वाढला. याच्याच कारकीर्दींत पेकिंग येथें मोठा धरणीकंप झाला व त्यांत एकंदर चार लक्ष लोक मरण पावले असें म्हणतात.

१७३५ मध्यें गादीवर बसलेला. किएनलुंग हा बादशहा फार महत्वाकांक्षी व युद्धप्रिय होता. यानें पूर्व तुर्कस्तान आपल्या साम्राज्यास जोडले व ब्रह्मदेशावर दोनदां व कोचीन चीनवर एकदां स्वारी केली पण त्यांत त्याला यश आलें नाही. त्यानें प्रजेवरहि बराच जुलूम केला त्यामुळें चिनांत बंडे झाली. १३ व्या शतकांत मोंगल लोक चिनांत शिरल्यापासून पश्चिम चिनांत मुसुलमान लोकांची बरीच वसाहत झाली होती. त्या मुसलमानांनीं यावेळीं बंड केलें, परंतु चिनी बादशहाच्या फौजेनें तें मोडले. किएनलुंग याने गद्य-पद्य बरेंच लिहिलें. महत्त्वाचे ग्रंथ प्रसिद्ध केले व ग्रंथसंग्रह बराच जमविला. त्याच्या सेनापतीनीं ७०,००० सैन्यानिशीं नेपाळवर स्वारी केली तेव्हां नेपाळी लोकांनीं चीनचें वर्चस्व कबूल केलें. १७९५ मध्यें ६० वर्षें राज्य केल्यानंतर आपल्या पंधराव्या मुलाला गादीवर बसविलें व तो १७९८ मध्ये ८८ व्या वर्षीं मरण पावला.

किएनलुंग बादशहाच्या कारकीर्दींत कँटन शहरी यूरोपीय लोकांचा व्यापार बराच वाढला होता. या यूरोपीय लोकांत पोर्तुगीज, ब्रिटिश व डच व्यापारीच पुष्कळ होते. ब्रिटिश लोकांचा सर्व व्यापार ईस्ट इंडिया कंपनीच्या हातीं होता, वयापारावर जकाती व इतर निर्बंध बरेच होते. त्याबद्दलचे अन्याय दूर करण्याकरितां ब्रिटिश सरकारनें पेकिंग येथें १७९३ मध्यें वकील पाठविले. तिस-या जॉर्ज बादशहाच्या तर्फे गेलेला लॉर्ड मॅकार्टने याचा चिनी दरबारानें मोठा आदर सत्कार केला परंतु व्यापाराचे बाबतींत मुळीच सवलती दिल्या नाहींत.

तथापि १९ व्या शतकांत अनेक यूरोपीय राष्ट्रे चीनमध्यें शिरली. प्रथम पोर्तुगीज आले, नंतर १८४१ मध्यें ब्रिटिश, १८९५ मध्ये जपान, १८९८ मध्यें रशिया व फ्रान्स यांचा शिरकाव चीनमध्यें झाला. हीं राष्ट्रे चीनमध्यें आल्यानें चीनमध्यें बरीच चळवळ उडाली व तिचे पर्यवसान १९०० मध्यें बॉक्सर बंडांत होऊन पेकिनमध्यें सात आठवडे अनर्थ उडाला व २०० ख्रिस्ती मिशनरी मारले गेले. मांचू घराणें देशावर सत्ता चालविण्यास अपात्र आढळून आल्यामुळें १९११ मध्यें चीनमध्यें राजक्रांति झाली व १९१२ मध्यें रिपब्लिक स्थापन झालें. रिपब्लिकचा राज्कारभार दोन प्रतिनिधि मंडळें व त्यांनीं निवडलेला अध्यक्ष पाहतो. तथापि मध्यवर्ती सरकार कमकुवत असून प्रांतांप्रांतीचे गव्हर्नर बलिष्ठ होऊन बसले आहेत. सांप्रत दक्षिणकडे एक व उत्तरेकडे एक अशी दोन सरकारें स्वतःस सर्वसत्ताधीश समजून एकमेकांशीं भांडत आहेत.

बॉक्सर बंडांत पाश्चात्य राष्ट्रांचे जे नुकसान झालें त्याची भरपाई म्हणून फ्रान्स, अमेरिका, इंग्लंड, जपान, इटाली वगैरे अकरा राष्ट्रांनां मोठाल्या रकमा द्यावयाचें कबूल करणें चीनला भाग पडलें. या रकमा हप्त्याहप्त्यानें १९४५ सालीं फिटावयाच्या आहेत व त्याकरितां मीठ व जकात ह्या उत्पन्नाच्या बाबी गहाण लावून दिल्या असल्यामुळें चीनच्या प्रत्यक्ष राज्यकारभारांत परराष्ट्रांचा हात शिरला आहे. या राष्ट्रांपैकीं सर्वांत अधिक सवलती जपाननें मिळविल्या असून चीनमध्यें मुबलक असलेल्या लोखंड व कोळसा यांच्या खाणीपैकी ब-याचशा हल्ली जपानच्या हुकमतीखालीं आहेत. तात्पर्य, सांप्रत चीनचें मध्यवर्ति सरकार अत्यंत दुबळ्या व परावलंबी स्थितीत आहे.