प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २५ वें.
बुद्धोत्तर चीन व जपान.

जपान - जपानचें इंग्लंड देशाशीं फार साम्य आहे. दोन्ही देश लहान व मुख्य खंडापासून पृथक् बेटें आहेत. दोन्ही देश साधारण समान अक्षांशावर असल्यामुळें हवापाण्याच्या बाबतींत बहुतेक सारख्या स्थितींत आहेत. प्राचीन इतिहासहि दोन्ही देशांचा जवळ जवळ सारखाच आहे. दोहोंनांहि स्वतःची संस्कृति किंवा धर्म नाहीं. इंग्लंडमध्यें रोमन व फ्रेंच संस्कृति शिरली व यूरोपच्या दक्षिण टोंकाकडे स्थापन झालेला ख्रिस्ती धर्म ब्रिटन लोकांनीं स्वीकारला. अर्थात् इंग्लंडला ख्रिस्तपूर्वकाळचा असा इतिहास नाहीं. जपानमध्येंहि देश्य लोकांची सुधारणा चिनी संस्कृतीनें झाली व दक्षिणेकडे दूरवर असलेल्या हिंदुस्थान देशांत स्थापन झालेला बौद्ध धर्म व संस्कृति यांनीं जपानी राष्ट्र बनविलें. या दोन देशांत साम्य इतकेंच आहे. राजकीय इतिहासांत जपान देश इंग्लंडच्या मानानें १९ व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत फार मागासलेला राहिला होता. भौगोलिक शोधांत व शास्त्रीय संशोधनांत इंग्लंडनें १७ व्या शतकापासून पुढाकार घेऊन जागतिक साम्राज्यरूपी जें फल प्राप्त करून घेतलें त्या साम्राज्यकल्पनेचें स्वप्न जपानला अगदीं अलीकडे पडूं लागलें आहे. जपानच्या या मागसलेल्या स्थितीस जपानचा गैरमुत्सद्दीपणा जितका कारण झाला तितकाच चीन व सैबीरियासारख्या अजगर वृत्तीच्या देशांचा शेजार कारणी झाला यांत शंका नाहीं. तथापि अलीकडे पन्नास वर्षांत यूरोपीयांचें अनुकरण करून जपाननें आपली सर्वांगीण सुधारणा करून जगांतील प्रमुख राष्ट्रांत स्थान संपादिलें आहे. यामुळें जपानचा एकंदर इतिहास मोठा बोधप्रद बनला आहे. म्हणून जपानच्या इतिहासाची थोडक्यांत रूपरेषा येथें दिली आहे.