प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २५ वें.
बुद्धोत्तर चीन व जपान.

चीन व सिकिम.- सिकिमचे प्राचीन रहिवाशी रोंगपा अथवा लेपचा जातीचे होते. ही इंडो-चिनी जातीचीच पोट जात असावी; परंतु ते सिकिममध्यें केव्हां व कसे आले याबद्दल माहिती मिळत नाही. परंतु नेपाळचें राजघराणें तिबेटी असून ते लोक पूर्व चिनी तिबेटांतील ग्यालपो राजघराण्याशीं आपला संबंध जोडतात. त्यांचे पूर्वज अनेक पिढ्यांपूर्वीं पश्चिमेकडे ल्हासा व शाक्य या बाजूनें अम्मोचु खो-याकडे गेले. अखेरीस १६४१ मध्यें पेंचू नमिगे यानें राज्यस्थापना केली. १७७६ ते १७९२ पर्यंत सिकिम व नेपाळ यांमध्यें एकसारखा लढाया चालू होत्या. अखेरीस १७९२ मध्यें चिनी सैन्यानें गुरख्यांस सिकिमच्या बाहेर घालवून दिलें. तथापि १८१६ मध्यें जनरल आक्तरलोनी यानें गुरख्यांचा पराभव करून सिकिमचा कांहीं भाग त्यांजपासून सोडवून सिकिमला परत देईपर्यंत तो गुरखेच बळकावून बसले होते. नंतर सिकिम व ब्रिटिश सरकार यांमध्यें कांहीं काळ वितुष्ट येऊन ब्रिटिशांनीं १८३९ मध्यें दाजींलिंग व १८४९ मध्यें सर्व तराई प्रांत आपल्या ताब्यांत घेतला व १८६१ मध्यें एक मित्रत्वाचा तह करावयास सिकीमला भाग पाडलें. अखेरीस १८९० मध्यें चीनशीं तह होऊन चीननें सिकिमवरील ब्रिटिशांचें संरक्षण मान्य केलें. असो.

बुद्धोत्तर जगांत भारतीयांचा चीनशीं राजकीय संबंध फार थोडा आहे हें वरील विवेचनावरून समजून येईल. जो संबंध आला तो मुख्यतः बौद्धिक आणि सांस्कृतिक होता. हिंदुस्थानाकडून चीनकडे भारतीयांची संस्कृति नेणारे बौद्ध प्रवाशी पहिल्या विभागांत वाचकांत परिचित करून दिलेच आहेत. चिनी प्रवाशी हिंदुस्थानांत अनेक येऊन गेले. त्यांची माहिती भौगोलिक शोधाच्या प्रकरणांत दिलीच आहे. असो. आतां चीनचा शेजारी जो जपान देश त्याकडें वळूं.