प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २५ वें.
बुद्धोत्तर चीन व जपान.
चीनचा नेपाळशीं तिबेटमार्फत संबंध.- प्रतापसिंहाचा अल्पवयी पुत्र बहादुरशहां हा गादीवर असतां त्याचा चुलता बहादुरशहा हा राज्यकारभार पहात असें. या काळांत गुरख्यांनीं आपली सत्ता आजूबाजूंच्या लहान सहान संस्थानांवर लादली व आपल्या राज्याचा विस्तार भूतानपासून सतलजपर्यंत व तिबेटपासून ब्रिटिश हद्दीपर्यंत वाढविला. १७९० मध्यें त्यांनीं तिबेटवर स्वारी केली. प्रथम त्यांस कांहीं विजय मिळाले पण या स्वारीमुळें त्यांनीं चीनचें शत्रुत्व संपादन केलें. तेव्हां १७९१ मध्यें चीनचें एक भलें मोठें सैन्य नेपाळवर स्वारी करून आलें व १७९२ मध्यें त्यानें नवकोटपर्यंत चाल करून येऊन नेपाळला तह करावयास भाग पाडलें. १७९१ मध्यें गुरख्यांनीं ब्रिटिशांशीं व्यापारी तह केला होता, व चिनी स्वारीचा प्रतिकार करण्यास त्यांनीं ब्रिटिशांची मदत मागितली पण ती येऊन पोंचण्यापूर्वींच तह होऊन गेला होता.
आज नेपाळ सरकारनें चीनच्या राजाचें स्वामित्व कबूल केलें आहे. पण दर पांच वर्षांनीं चीनच्या राजास कांहीं तरी मोठासा नजराणा द्यावा इतकंच त्याचें महत्व आहे.
नेपाळचा भारतीय राजकारणामुळें चीनशी संबंध येता; येवढेंच नव्हे तर परराष्ट्रीय राजकारणामुळेंहि येतो. सध्यां सोव्हिएट तत्त्वें मान्य करणारें रशियनसरकार बनलें. असल्याकारणानें त्या सरकारच्या पूर्वींच्या धोरणांत फरक पडला असेलच. तथापि रशियाच्या विस्तारक धोरणामुळें त्याचा जो चीन व नेपाळ यांशीं तिबेटमार्फत संबंध आला तो कावागुची पुढीलप्रमाणें वर्णन करतो.
''रशियाचें वर्चस्व तिबेटावर वाढत आहे हें पाहून नेपाळास वैषम्य वाटत आहे आणि नेपाळनें तिबेटास तुम्हीं रशियाबरोबर गुप्त तह केला आहे कीं काय असें विचारलें होतें. नेपाळनें युद्धांत तिबेटास जिंकलें तरी त्यास फारसा फायदा न होतां इंग्रजांचा होईल हें नेपाळ जाणून आहे. तथापि नेपाळी सरकारचें आपल्या प्रजेचा शिरकाव तिबेटांत व्हावा याकडे लक्ष आहे. नेपाळनें आपल्या गुप्त धनाचा रशियाप्रमाणें तिबेटांत उपयोग केला तर नेपाळचा फार फायदा होईल. नेपाळ बौद्ध धर्माची जोपासना करतें याबद्दल तिबेटी लोकांत मान्यता आहे. तिचा उपयोग करून घेतल्यास नेपाळास बरेंच सुलभ जाईल. तथापि नेपाळपाशीं तलवारीचा जोर आहे तरी वकिलातीची हुषारी नेपाळपाशीं नाहीं.''
एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकांत नेपाळी शिपाई नेपाळी प्रजेच्या संरक्षणार्थ ल्हासा येथे ठेवण्यास सुरूवात झाली. याचें कारण असें झालें कीं, पालपो जातीचे नेपाळी बौद्ध व्यापारी ल्हासा येथें सुमारें तीनशें होते. या व्यापा-यांपैकीं एकाच्या दुकानांत एका ल्हासा येथील बाईनें पोंवळीं चोरलीं असा त्या व्यापा-यास संशय असल्यामुळें तिचा झाडा घेण्याकरितां तिला त्यानें घरांत बळजजबरीनें ओढलें. तिला ज्या वेळेस परत जाऊं दिले तेव्हां तिनें कल्ला केला आणि सेरा मठाच्या लढवय्या लामास सांगितलें. लढवय्ये भिक्षू चौकशी करून गेले आणि नंतर त्यांनी सूड उगविण्यासाठीं पालपोवर एक हजार माणसांसह चाल केली. हा हजारांचा जमाव येत आहे असें पाहून पालपो व्यापा-यांनीं घर सोडून पलायन केलें. लढवय्ये भिक्षूंनीं येऊन घरें लुटलीं. त्यामुळें पालपो व्यापा-याचें सुमारें ३।। लाख रूपयांचें नुकसान झालें. त्यानंतर या गोष्टीबद्दल नेपाळ दरबार व तिबेट दरबार यांमध्यें बोलणें सुरू झालें. तिबेटतर्पेफ् वकील जीव बहाद्दर होते आणि तेव्हां तिबेटी दरबारनें नुकसानीची भरपाई केली आणि नेपाळी व्यापा-यांच्या संरक्षणासाठीं २५ शिपाई ल्हासा येथे ठेवण्याचें ठरलें. (कावागुची यांची तिबेटांतील ३ वर्षे.)