प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २५ वें.
बुद्धोत्तर चीन व जपान.

जपानचा ऐतिहासिक काळ - या काळाचे पुढील चार भाग पडतात:-
  (१) आद्य ऐतिहासिक काळ (इ. स. ४०० - ६७२).
  (२) फुजिवर लोकांचा काळा (इ. स. ६७३-११५५).
  (३) सरंजामदारी सत्तेचा काळ (इ. स. ११५५-१५९८)
  (४) टोकू गावा घराण्याचा काळ (इ. स. १५९८-१८६७)
  (५) आधुनिक सुधारणांचा काळ (इ. स. १८६७ पासून पुढें).

आद्य ऐतिहासिक काळांतला रिचू हा पहिला बादशहा होय. या काळांत राजघराण्यांतील इतर पुरूषांनीं राज्य बळकाविण्याचे प्रयत्न केल्याचीं पुष्कळ उदाहरणें आहेत. या समारास समाजामध्यें धंदेवार वर्ग उर्फ जाती बनत चालल्या होत्या. चिनी व कोरियन विद्वानांनीं जपानांत जाऊन चिनी संस्कृतीचा प्रसार केला व कारागिरांनीं उद्योगधंदे सुधारले. तथापि या काळांतील सर्वांत महत्त्वाची गोष्ट जपानांत बौद्धधर्माचा प्रवेश ही होय. हें काम खुद्द कोरियाच्या राजानें केलें. प्रिन्स शोकोटु या विद्वान् तत्त्ववेत्त्यानें या कार्यास फार मदत केली. इ. स. ६२३ च्या खानेसुमारींत जपानांत ४६ बौद्धालयें, ८१६ भिक्षू व ५६९ जोगिणी असल्याचें आढळून आले. यामुळें नवीन नीतिनियम व नवीन संस्कृति जपानांत शिरली.

याच्या पुढील काळास (इ. स. ६७३ ते ११५५) फुजिवर लोकांचा काल म्हणण्याचें कारण असें कीं, या काळांत प्रथम फुजिवर घराण्यांतल्या पुरुषांनीं आपल्या मुली बादशहांनां देऊन सर्व सत्ता आपल्या हाती ठेविली. परंतु पुढें हें घराणें चैनबाज बनून दुसरी तैरा व मिनमॉटॉ हीं दोन लष्करी पेशाचीं घराणीं पुढें आलीं व त्या दोघांमध्यें राज्याकरितां युद्ध होऊन त्यांत अखेर तैरा घराण्याचा पाडाव झाला.

इ. स. ११५५ ते १५९८ पर्यंतच्या काळांत जपानी राजांनां केवळ नामधारी बनवन एकामागून एक सरंजामी घराण्यांनीं पेशव्याप्रमाणें खरा राज्यकारभार आपल्या हातीं ठेविला. बौद्धधर्माचा प्रसार बराच वाढून कित्येक राजघराण्यांतले पुरूषहि भिक्षू बनले होते. असले भिक्षूं राजकारणांत उलाढाली करीत असत. यामुळें जपानच्या राज्यकारभारांत बराच गोंधळ माजला होता. पण या उद्वेगजनक परिस्थितीतूनच जपानमध्यें तीन अत्यंत मोठे युद्धनायक व मुत्सद्दी उदयास आले. ते ऑद नोबुनागा, हिदेयोशी व टोकुगावा इयेयसु हे होत. गोबुनागा हा लहानसा जमीनदार होता व हिंदेयोशी हा गरीब शेतक-याचा मुलगा असून तो नोबुनागाच्या पदरीं नोकरीस होता. तो मोठा तलवारबहाद्दर व कारस्थानकुशल निघाला. त्याच्या मदतीनें नोबुनागानें आपली सत्ता व सैन्य पुष्कळ वाढविलें. जपानी बादशहाच्या परवानगीनें त्यांनीं देशांतील बंडाळी मोडून शांतता प्रस्थापित केली. तेव्हां बादशहानें हिदेयोशीला प्रतिनिधि नेमिलें. त्यानें फार न्यायानें व दयाळूपणानें राज्यकारभार केला. कौरिया व चीनवर त्यानें स्वारीचा प्रयत्न केला. हिदेयोशी इ. स. १५९८ मध्यें मरण पावला. त्यानंतर टोकुगावा इथे यसू अधिकारारूढा झाला. याच्या वेळीं आपासांतील युद्धाचा वणवा पुन्हां पेटला आणि इ. स. १६०० मध्यें सेकिगहर येथे एक व १६१५ मध्यें ओसाका येथें एक अशा दोन लढाया होऊन त्यांत इयेयसूचा जय झाला. अशा रीतीनें बाराव्या शतकापासून १७ व्या शतकापर्यंत चाललेल्या अन्तर्युद्धाची परिसमाप्ति झाली. यापुढें जपानला पूर्ण शांतता लाभली व ह्या काळांत टोकुगावा वंशांतल्या कारभारी पुरूषांनीं (शोगुनांनीं) पुष्कळ सुधारणा केल्या. 'इयेयसूची कैफियत' (स्टेटमेंन्ट ऑफ इयेयसू) नांवाच्या ग्रंथांत या काळांतील जपानच्या परिस्थितीबद्दल सविस्तर माहिती मिळते. जपानांत सरंजामी पद्धति बरीच चालू असल्यामुळें जपानी समाजाचे तीन वर्ग पडले होते. (१) राजा व त्याचे दरबारी लोक, (२) लष्करी सरदार उर्फ सरंजामदार व (३) सामान्य लोक. यांपैकीं सरंजामदारांचा वर्ग बराच मोठा व बलिष्ठ होता. हे सरंजामदार व त्यांचे सैनिक हा जपानमधील लष्करी बाण्याचा वर्ग हिंदुस्थानांतील क्षत्रियांसारखा होता. टोकुगावाच्या शांततापूर्ण काळांत हा लढवय्या वर्ग अनवश्यक वाटूं लागला व तिस-या वर्गांतले म्हणजे सामान्य लोकांतले शेतकरी, कारागीर व व्यापारी या वर्गाला महत्त्व चढलें.