प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २५ वें.
बुद्धोत्तर चीन व जपान.

प्रागैतिहासिक काल.- जपानबद्दल अत्यंत प्राचीन माहिती कोजिकी (प्राचीन गोष्टींचा लेखसंग्रह) व निहोंगी (जपानची बखर) या दोन ग्रंथांवरून मिळते. हे ग्रंथ पुराणवजा असल्यामुळें त्यांतील माहिती काल्पनिक स्वरूपाची आहे. त्यांत विश्वोत्पत्तीपासून जपानची व तेथील पौराणिक राजांची माहिती आहे. जपानचा पहिला मानव राजा जिम्मू टेनो ख्रिस्तपूर्व ६६० मध्यें गादीवर आला असें म्हटलें आहे. जपानी साम्राज्याच्या आरंभशक हाच मानतात. तथापि ख्रिस्तोत्तर पांचव्या शतकापर्यंतची यांत दिलेली माहिती फारशी विश्वसनीय नाहीं. सबब ख्रिस्तपूर्व ६६० ते इ. स. ५०० पर्यंतच्या काळास जपानचा प्रागैतिहासिक काळ म्हटलें पाहिजे. या काळांत एकंदर २४ राजे झाले व त्यांतील बरेचसे शंभरांहून अधिक वर्षें जगले असें वर्णन आहे. त्या वेळचीं कांहीं थडगीं उकरून काढलीं आहेत पण त्यांत खोदीव लेख मुळींच सापडले नाहींत.

या काळांतील राजे अनेक स्त्रियांशीं लग्ने करीत असत. त्यामुळें त्यांनां संतति पुष्कळ असे. केइको नांवाच्या बादशहाला (इ. स. ७१-१३०) ८० मुलें होतीं. अश राजपुत्रांनां योगक्षेम चालविण्याकरितां जहागिरी देण्याची वहिवाट पडली व त्यामुळें देशभर जहागिरदारांचा वर्ग निर्माण झाला या वर्गाचा जपानच्या भावी इतिहासावर फार परिणाम झाला.

इ. स. २०० च्या सुमारास जपानी सैन्यानें कोरियावर स्वारी केली व कोरियाच्या राजानें जपानचें मांडलिकत्व पत्करलें असा जपानी बखरींत उल्लेख आहे. चिनी इतिहासांतहि या प्राचीन जपानी लोकांचीं लांबलचक वर्णनें आहेत. या प्रागैतिहासिक काळांत तलाव व कालवे खणणें, बोटी बांधणें, रस्ते, पुल, खानेसुमारी, लेखनकला वगैरे अनेक बाबतींत जपानची प्रगति झाली होती.