प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २५ वें.
बुद्धोत्तर चीन व जपान.
पूर्वेकडील हान घराणें (इ. स. २३).- लिउ सिउनें क्वांग बु ति ही पदवी धारण करून इ. स. ५८-७६ पर्यंत राज्य केलें. त्यानें होनान प्रांतांत लो यांग येथें आपली राजधानी नेली. इ. स. ६५ मध्यें बौद्ध धर्म हिंदुस्थानांतून चीनमध्यें शिरला. याच सुमारास तुर्कस्थानांतील एका लहानशा शेनशेन संस्थानच्या राजाकडे पॅनचौ हा सुप्रसिद्ध चीनी वकील पाठविला. पुढें लवकरच शेनशेन, खोतान, कुचा व काशगर हीं संस्थानें चीनच्या राज्यास जोडण्यांत आलीं. हान हें चीनमध्यें पहिलें राष्ट्रीय व फार प्रसिद्ध घराणें होऊन गेलें. या घराण्यांतील बादशहाहून अधिक लोकप्रिय बादशहा कोणी झाले नाहींत. यांच्या कारकीर्दींत देशांत व्यापार वाढला, लोकांची बरीच सुधारणा झाली आणि विद्वानांना पदव्या देण्याकरितां निरनिराळ्या परीक्षांची योजना करण्यांत आली. यांच्या कारकीर्दींत चीनमध्यें एकराष्ट्रीयत्वाची भावना इतकी दृढतर झाली कीं, पुढें आपसांत अनेक बंडाळ्या व परकीयांच्या अनेक स्वा-या झाल्या तरी ती बिघडूं शकली नाहीं.