प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २५ वें.
बुद्धोत्तर चीन व जपान.
बाह्यांशीं संबंध.- अगदीं प्राचीन काळापासून जपानचा चीन व कोरियाशीं संबंध होता. ख्रिस्तोत्तर सोळाव्या शतकापर्यंत परकीयांनां सरकारी अधिका-यांस आपल्या सामानाची तपासणी करूं देणें, लढाऊ शस्त्रें खरेदी न करणें वगैरे अटींवर जपानांवर सर्वत्र प्रवास करण्यास मोकळीक असे. जपानचा बहुतेक व्यापार चीनबरोबर असे. या पूर्वापार परिस्थितींत सोळाव्या शतकांत एकदम मोठा फरक झाला. इ. स. १५४२ पासून यूरोपीय लोकांशीं जपानचा संबंध सुरू झाला. प्रथम पोर्तुगीज लोक जपानांत शिरले. त्यांनी व्यापार व ख्रिस्तीधर्मप्रसार ही दोन्ही कार्ये सुरू केलीं. १५५० ते १५८२ पर्यंतच्या बत्तीस वर्षांत १,५०,००० लोक ख्रिस्ती बनले व एवढें अवाढव्य कार्य अवघ्या सुमारें ७५ जेसुटांनीं केलें. हा परधर्मप्रसार बंद करण्याकरितां हिदेयोशीनें १५७८ मध्यें एकदम बंदीचा हुकूम काढून सर्व परकी धर्मोपदेशकांनां वीस दिवसांच्या आंत जपान देश सोडून जाण्यास फर्माविलें. पोर्तुगीज व्याप-यांनां मात्र मोकळीक ठेविली होती. नंतर व्यापारास अडथळा न यावा म्हणून धर्मोपदेशकासंबंधाचा नियमहि ढिला करण्यांत आला. त्याबरोबर जेसुटांनीं पुन्हां झपाट्यानें धर्मप्रसाराचें कार्य चालविलें व १५९५ मध्यें बाटलेल्या जपान्यांची संख्या तीन लाखांवर गेली. त्यांत संस्थानिकांपैकीं सतरा जण ख्रिस्ती झाले होते. याच सुमारास स्पॅनिश लोकहि जपानांत शिरून धर्मप्रसार करूं लागले. तेव्हां हिदेयोशीनें पूर्वींचा हुकूम कडक रीतीनें अमलांत आणून ख्रिस्ती मिशन-यांस पूर्ण मज्जाव केला; इतकेंच नव्हे तर, पुढें इयेयसूनें सर्व परकीयांवर कडक बहिष्कार घालण्याचें धोरण १६३९ मध्यें अमलांत आणलें. हा निर्बंध दुहेरी होता. म्हणजे परकीयांनीं जपानांत येऊं नये या नियमाबरोबरच जपानी लोकांनीं कोणत्याहि परक्या देशांत जाऊं नये असा सक्त नियम करण्यांत आला.
या बहिष्कारापासून जपानचा तत्कालिक तोटा कांहीं झाला नाहीं. कारण यूरोपीयांची संस्कृति जपानी संस्कृतीपेक्षां उच्च दर्जाची नव्हती. यूरोपीयांजवळ त्या वेळीं दोनच गोष्टी अधिक होत्या. बंदुकी वगैरे अग्न्यस्त्रें व लष्करी तटबंदीचें शास्त्र. या दोन्ही गोष्टी जपानी लोकांनीं लवरकच ग्रहण केल्या. या बहिष्कारामुळें पुढें दोनअडीचशें वर्षें जपानला शांततेचा काळ लाभला खरा; पण तेवढ्यांत यूरोपीय राष्ट्रें शास्त्रीय संशोधनांत झपाट्यानें पुढें गेलीं. या शास्त्रीय शोधांची अंधुक कल्पना जपानी विद्यार्थ्यांनां देशिम येथील डच लोकांच्या फॅक्टरीतील गोष्टींवरून येऊं लागली. तथापि तेवढ्यानें जपानी सरकार बहिष्कार उठविण्यास तयार होणें शक्य नव्हतें.