प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २५ वें.
बुद्धोत्तर चीन व जपान.
मोंगल लोकांची स्वारी १२ वें शतक.- या सुमारास मोंगल लोकांची पूर्व आशियांत बरीच सत्ता वाढली व १२ व्या शतकाच्या आरंभीं जेगिझखानाच्या सैन्यानें चीनच्या वायव्य सरहद्दीवर व हिआ संस्थानावर स्वा-या करण्यास सुरुवात केली. हिआच्या संस्थानिकानें जेंगिझखानाला खंडणी देण्याचें कबूल केलें आणि मोंगल लोकांच्या राजाला एक राजकन्या बायको दिली. पुढें जेगिझखानानें लाओ तुंग प्रांतावर स्वारी करून त्या प्रांताचे राजधानीचे शहर घेतलें १२१२ पासून जेंगीखानानें चीनवर स्वारी करण्यास सुरूवात केली व १२२५ पर्यंत चीनचा बहुतेक प्रांत जिंकून घेतला. १२३० मध्यें जेंगिझखान मरण पावला. पुढें १२३२ मध्यें मोंगल लोकांनीं चिनांतील सुंग घराण्याशीं मैत्री करून किन घराण्याचा पाडाव केला व नंतर सुंग घराण्यावरच उलटून त्यांचा प्रांत जिंकून घेतला. या १२३२-१२५९ च्या काळांत मोंगल लोकांचेहि दोन तीन बादशहा होऊन १२५९ मध्यें कुबलाईखान राज्यावर आला. कुबलाईखानानें बहुतेक चीन देशावर आपली सत्ता प्रस्थापित केली. तथापि सुंग घराण्याच्या पिंग ति नांवाच्या शेवटच्या बादशहानें प्रथम वीस वर्षें कुबलाईखानाशीं विरोध चालू ठेवला. पण अखेर जय मिळण्याची निराशा झाल्यामुळें समुद्रांत बुडून प्राण दिला. याप्रमाणें अंत झालेल्या सुंग घराण्यानें एकंदर ३२० वर्षें चीनवर राज्य केलें. हें घराणें चीनमधील प्रसिद्ध घराण्यांपैकीं एक आहे. कारण ह्यांच्यावेळीं कलाकौशल्य व वाङ्मय बरेंच वाढलें, व पुष्कळ वरिष्ठ दर्जाचे लेखक प्रसिद्धी पावले.