प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
 
प्रकरण ८ वें.
ज्योतिषशास्त्राचा इतिहास                 
 
अयनगतीचें ज्ञान आम्हांस केव्हां झाले.– अयनगतिमानाचा निर्णय केव्हां झाला ह्याचा विचार करूं लागलें असतां मूल सूर्यसिद्धांत प्रथमार्यसिद्धांत, व पंचसिद्धांतिका या-म्हणजे शक ४२७ (इ. स. ५०५) सालच्या पूर्वीच्या -ग्रंथात अयनगतीविषयीं कांहींच विचार आढळत नाहीं. परंतु भास्कराचार्य याच्या म्हणण्यावरून ब्रह्मगुप्तापूर्वीच्या वर्तमानसूर्यसिद्धांतांत अयनगतिविचार असावा असें म्हणतां येतें. ब्रह्मगुप्ताच्या पूर्वीच्या शक ५०० च्या सुमाराच्या विष्णुचंद्राच्या ग्रंथांत तो होता असें नि:संशय दिसून येतें. यावरून शक ५०० च्या सुमारास अयनगतीचा विचार होऊं लागला व शक ८०० च्या पूर्वी तिचें सूक्ष्म ज्ञान झालें असें दिसतें.