प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.
प्रकरण ११ वें
विषयांतर-वेदोक्त इतिहास व आख्यायिका
अथर्ववेदांतील ऐतिहासिक व पौराणिक कथांचीं बीजदर्शक स्थळें.- ''दाक्षायणॠषींनीं ज्याप्रमाणें शतानीकाला सोन्याचा ताईत बांधला.'' (१.३५, १.)
''वेनानें गूढ परब्रह्म पाहिलें व पृश्रीनें जायमानांनां दोहिले.'' (२.१, १.)
''गंधर्व (आदित्य?) आम्हांला परब्रह्म सांगो. तीन पाऊलें गूढ आहेत.'' (२.१, २.)
''ज्या अप्सरा विश्वावसुगंधर्वाच्या बरोबर असतात.'' (२.२, ४.)
''इंद्रानें वृत्राला, ज्याप्रमाणें त्यानें यतींनां मारलें, त्याप्रमाणें मारलें.'' (२.५, ३.)
''सोमानें जुहूला घरीं नेली असतां, बृहस्पतीनें ब्रह्मचा-याच्या मदतीनें तिला-आपल्या पत्नीला-परत आणली.'' (५.१७, ५.)
''वैतहव्यांनीं ब्राह्मणाची गाय खाल्ली म्हणून त्यांचा नाश करण्यांत आला,'' (अनुशासनपर्वांत वीतहव्य राजाला ब्राह्मणत्व स्वीकारावयाला लावल्याची गोष्ट आहे). (५.१८, १०.)
''वीतहव्याचे पुत्र सृञ्जय फार बलिष्ठ झाले, ते जवळजवळ स्वर्गाला जाऊन भिडले; पण त्यांनीं भृगूचा अपराध केला व नाश पावले,'' (अनुशासनपर्वांतील कथेंत भृगूनें वीतहव्य राजाला आश्रय दिल्याची कथा आहे). (५.१९, १.)
''ज्या तीन कालकञ्जांनां स्वर्गांत देवांप्रमाणें उच्चस्थान दिलें.'' (६.८०, २.)
''या चारहि ॠचांत विष्णूनें त्रिपादभूमि आक्रमिल्याचा उल्लेख आहे.'' (७ {kosh Griffith मध्यें हें २६ वें सूक्त आहे.}*{/kosh} २७, १; ३; ४;५.)
''ज्या भाषेच्या योगानें आसुरीनें (वेबरच्या मतें हीं विलिस्तेंगा व सायणाच्या मतें पुलोमा असुराची मुलगी शची असावी) इंद्राला देवांमधून खालीं ओढलें.'' (७.३९,२.)
''या ॠचा वसिष्ठ ॠषीनें कल्मषपाद (सौदास) राजाला उद्देशून म्हटल्या आहेत असें सायण म्हणतो. महाभारतांत कल्मषपाद राजाची कथा (१.१७६) आहे त्याचें हें बीज दिसतें. भारतीय कथेहून ही मिन्न आहे.'' (८.४, १२-१६.)
''या इंद्रजालाच्या योगानें मी सर्वांनां अंधकारानें आवृत करतों. महाभारतांत इंद्रजाल हें अर्जुनाचें एक दिव्य अस्त्र होतें असें म्हटलें आहे. (८.८, ८.)
''मायेपासून मातलि निर्माण झाला.'' (८.९, ५.)
''तिचा-विराज मायेचा-प्रा-हादि विरोचन म्हणून एक वत्स होता...... द्विमूर्धा अर्त्व्यानें तिला दोहिलें. (विरोचन, द्विमूर्ध हें असुर भागवतांत आलेले आहेत) वैवस्वतमनु तिचा वत्स व पृथिवी तिचें पात्र होतें.'' (८.१३, १.)
''वेनाचा पृथी (पृथु) यानें तिला (विराजेला) दोहिलें'' (पृथुराजाची कथा भागवतांत आहे. त्यानें स्वायंभुव मनूला वत्स करून पृथ्वीचें दूध काढलें स्कं. ४ भागवत. अ. १८ वा) (८.१३, १; ११.)
''सूर्यवर्चसाचा मुलगा चित्ररथ पुण्यगंधेचा (विराजेचें गंधर्व लोकांतील, नांव) वत्स झाला व पुष्करपर्ण पात्र झालें. सूर्यवर्चसाचा वंशज वसुरूचि यानें तिला दोहिलें.'' (८.१४, ६; ७.)
''ती (विराट्) सर्पांकडे गेली तेव्हां त्यांनीं तिला 'विषवति' म्हणून संबोधिलें, तिचा वत्स वैशालेय तक्षक बनला, ऐरावत धृतराष्ट्रानें तिला दोहिलें.'' (८.१४, १३-१५.)
आठव्या कांडाच्या १० व्या सूक्तापासून पुढें विराज हीं प्रत्येक लोकीं गेली आहे व तेथें तिला अमुक वत्स होऊन अमक्यानें तिला दोहिली वगैरे कथा आहेत त्यांतील बरीचशीं नांवें पुराणांतून आढळतात व कांहीं गोष्टिहि जुळतात; उदाहरणार्थ पृथु राजाची गोष्ट होय.
अपां फेनेन नमुचेः शिर इन्द्रोदंवर्तयः ।
इंद्रानें पाण्याच्या फेंसाचें वज्र करून त्यानें वृत्राला मारिलें. ही कथा अनेक पुराणांतून आलेली आहे. पाण्याच्या फेसांत विष्णूनें प्रवेश केला असें पुराणांत अधिक वर्णन असून वृत्रहत्येचें पातक ब्रह्महत्या इंद्राच्या पाठीस लागली व तो पाण्यांत लपून बसला, नंतर अग्नीनें देवांचें दौत्य पतकरून त्याला परत स्वर्गांत आणिलें असें वर्णन आहे. (२०.२९, ३.)
इन्द्रो दधीचो अस्थिभिर्वृत्राण्यप्रतिष्कुतः ।
जघान नवतीर्नव ॥ १ ॥
दधीची ॠषीच्या हाडांचे वज्र तयार करवून त्याच्या साहाय्यानें इंद्रानें वृत्राला मारिलें अशीहि कथा पुराणांतून सांपडते. (वनपर्व अ. १००-१०१) (२०.४१, १.)
आविर्भुवत् सरमा पूर्व्यं ते ।
ह्या सरमा देवशुनीची गोष्ट महाभारतांत जनमेजयाच्या सत्राचे वेळी आलेली आहे. (२०.७७, ८.)
आतां दैवतेतिहासाकडे वळूं.