प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ६ वें
ब्राह्मण्याचा इतिहास

अगस्त्यकुल
(१) सर्वानुक्रमणी व ॠग्मंत्रसिद्ध वंशसंबंध- मित्रावरूणपुत्र अगस्त्य. अगस्त्याची स्त्री लोपमुद्रा.
(३) सर्वानुक्रमणीसिद्ध वंशसंबंध- मित्रावरुणाचा मुलगा अगस्त्य, अगस्त्याची बायको लोपामुद्रा व मुलगा दह्ळच्युत. दृहळच्युताचा मुलगा इष्मवाह.
अगस्त्य- अनुक्रमणावारांनी १. १६५ ते १९१ या सूक्तांचा हा द्रष्टा आहे असे म्हटले आहे. याला मान असें दुसरें नाव असून मित्रावरूणापासून वरिष्ठाचा व याचा जन्म झाल्याचा उल्लेख ७. ३३. १० व १३ व्या ॠचांत आहे. याची लोपमुद्रा नांवाची बायको असल्याचा १. १७९ या सूक्तांत उल्लेख आहे.
मान अथवा मान्य- ८. ५६ या सूक्ताचा द्रष्टा. याला मित्रावरूणपुत्र म्हटलें आहे. मित्रावरुणापासून याचा जन्म झाल्याचा उल्लेख ७. ३३, १३ या ॠचेंत आहे. अगस्त्याचेंच हें नाव असावें.
दृह्ळच्युत- हा ९. २५ या सूक्ताचा द्रष्टा असून याला अनुक्रमणीत अगस्त्यपुत्र म्हटलें आहे. सदर सूक्तांत अथवा ॠग्वेदांत याचा कोठेहि उल्लेख नाहीं. अर्थात हा अगस्तिपुत्र असल्याचें ॠग्वेदावरून सिद्ध होत नाहीं.
इघ्मवाह- हा ९. २६ या सूक्ताचा द्रष्टा. याला दृह्ळच्युतपुत्र असें अनुक्रमणीकार म्हणतात. परंतु तसा उल्लेख ॠग्वेदांत नाहीं.