प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ६ वें
ब्राह्मण्याचा इतिहास

सत्रें व तदंग संस्कार- सत्रांतील दक्षिणीयेष्टीमध्यें ‘पवन पावन’ नामक एक संस्कार करावयाचा असतो. त्याचा क्रम सूत्रकारांनीं पुढील प्रमाणें दिला आहे:- अघ्वर्यूनें प्रथम गृहपतीचा संस्कार कराव व नंतर होता, ब्रह्मा व उद्गाता यांचा संस्कार करावा. प्रतिप्रस्थात्यानें प्रथम अघ्वर्यूचा संस्कार करून नंतर प्रस्तोता, मैत्रावरूण, ब्राह्मणाच्छंसी यांचा संस्कार करावा. अग्नीघ्रानें प्रथम प्रतिप्ररथात्याचा संस्कार करून नंतर अच्छावाक, पोता,नेष्टा व सदस्य यांचा संस्कार करावा. उन्नेत्यानें प्रथम अग्नीघ्राचा संस्कार करून नंतर ग्रावस्तुत, सुब्रह्मण्य व प्रतिहर्ता याचा संस्कार करावा व आपणच आपला स्वतःचा संस्कार करावा. अघ्वर्यूनेच सर्वांचा संस्कार करावा अशी जर सर्वांची इच्छा असेल तर अघ्वर्यूनेच सर्वांचा पवनपावन संस्कार करावा.