प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ६ वें
ब्राह्मण्याचा इतिहास
सर्त्रे व सोमयाग यांचा संबंध - संत्रे म्हणजे अनेकांनी मिळून याग करावयाचा व तो पुष्कळ दिवस चालू राहावयाचा. ही कल्पना अत्यंत प्राचीन असावी. सत्र म्हणजे दीर्घकाळ चालणारा एक सामुच्चयिक याग होय. पुष्कळशा यजमानांनीं एकत्र राहावयाचें आणि प्रत्येकानें वेगवेगळया अथवा सर्वांनी मिळून एकाच अग्नीची उपासना करावयाची; सोमरस, पशुमास व पुरोडाशादि हविद्रव्यांचे हवन करावयाचें हेंच सत्रांचे सामान्य स्वरूप होय. ॠग्वेदांत पृथक्वानें होणा-या अग्न्युपासनेपेक्षा सामुच्चयिक अग्न्युपासना जास्त आढळते. मात्र तीमध्यें होत असलेले विधी कोणत्याहि विशिष्ट नियमांस धरून अथवा चोदनेस अनुसरून असे होत नसत. व त्यावेळी मंत्रपूर्वकता फारच थोडया विधीच्या वाटयास येत असावी. किंबहुना मंत्ररहितच ते विधी असावेत. ॠग्वेदांत व्यक्तिशः दैनिक सोमरसाच्या हवनाविषयी उल्लेख सापडतो. सामुच्चयिक सोमयाग तर स्पष्टच आहेत. अशा प्रकारचे सामुच्चयिक सोमयाग भटकणा-या टोळयांच्या भटकण्याच्या क्रमांत नऊ महिने, दहा महिने किंवा बाराहि महिने एकसारखे सतत चालत असावेत. प्राचिन कालचीं हींच सत्रें होत. मात्र हे याग जेव्हां प्रत्यक्ष होत असत तेव्हां त्यांनां सत्र हें नांव मिळालें असणें संभवनीय नाहीं. सत्र हा शब्द जुना आहे परंतु तो सामुच्चयिक यागांनां ॠग्वेदाच्या अखेरीस किंबहुना यजुर्वेदकालांत रूढ झाल्याचे दिसून येतें. ॠग्वेदांत येणा-या सत्र शब्दाचे कसकसे अर्थ होत गेले याची कल्पना येण्यासाठीं कांही उतारे आम्ही पुढें देत आहोत. त्यावरून हे सहज आढळून येईल की, सत्र या शब्दाचा उपयोग सामुच्चयिक याग या अर्थानें एकदाच केला आहे व तो देखील १० व्या म्हणजे मागाहून जोडल्या गेलेल्या मंडलांत आहे. सारांश ॠग्वेदांत सत्र हा शब्द प्रायः एकदम, बरोबर, खरोखर अशा सामुच्चयिक यागेतर अर्थासाठी आला आहे. ॠग्वेदांतील सत्र शब्दाचा विचार करावयास पुढील उतारे फार उपयुक्त होतील.
‘सत्रा विश्व दधिपे केवलं सहः’ (१.५७,६) केवल तूं एकटाच सर्वव्यापक आहेस. अशा प्रकारचें बल तूं धारण करतोस हें खरें आहे.
एकः सत्रा सूरो ‘वस्वईश’ (१.७१,९) शूर असा एकच आदित्य धनांनां एकदम मिळवितो.
‘सत्रा चक्राणी अमृतानि विश्वा’ ( १.७२,१) सर्व हिरण्यें एकदमच देऊन.
‘सत्राकरो यजमानस्य शंसः’ (१.१७८,४) हा इंद्र खरोखरच यजमानाचा लौकिक वाढवितो.
सत्रा शंसं यजमानास्य तूतोत् (२.२०,७) यजमानांचा महान् अभिलाष पूर्ण करो.
‘संत्रद्राय देवभिरर्णसातौ’ (२. २०.८) देवांनीं (स्तोत्यांनां) उदकलाभ व्हावा म्हणून इंद्राला सर्व (सत्रा) दिवसामध्यें हवि अर्पिला.
‘सत्रादधिरे हरिवो जुपस्व’ (३.५१,६) हे अश्वसंपन्न इंद्रा, ॠत्विज खरोखर तुझ्याच साठी स्तोत्रें धारण करतात.
‘सत्रा मदासो बृहतो मदिष्ठाः’ (४,१७,६) खरोखर सर्व सोमरस महान् इंद्राला मद आणणारे असेच झाले आहेत.
‘सत्रासदीं भारिस्य वृष्णः’ (४,२१,७) खरोखर भार्वराच्या इच्छा पूर्ण करणा-या इंद्राचेंच हें बल आहे.
‘नृम्णानि सत्रा सहुरे सहांसि’ (४.२२.९) हे सहनशील इंद्रा, सर्वदा शत्रूंनां जिंकणारे असें बल तूं आम्हास दे.
‘सत्रा ते अनु कृष्टयः’ ‘सत्रा महाँ असिश्रृतः’ (४, ३०, २) खरोखर तुझ्या प्रजा तुलाच अनुसरून आहेत. तूं खरोखर संघविॠुत असा आहेस.
‘सत्रा महाँसि चक्रिरे त्नृषु’ (५,६०, ४)तनूच्या ठिकाणीं महान तेजें एकदम धारण करते झाले.
‘दिवो न तुभ्यमन्विद्र सत्रा’ (६.२०,२) हे इंद्रा, देवांनीं खरोखर सूर्याप्रमाणें तुलाहि रतविला.
‘सत्रा ते विश्वमनु वृत्रहत्ये’ (६.२५,८) वृत्रवधाच्या वेळी देवानीं खरोखर उत्कृष्ट असें बल दिलें.
‘सत्रावावृधुर्हवनानि यज्ञः’ (६. ३४,४) ‘यजन साधन अशा दृविद्रव्यासह स्तोत्रें वाढविलीं.’
‘सत्रा मदासस्तव विश्वजन्याः’ (६.३६,१) हे इंद्रा तुला आलेले कैफ खरोखरच सर्व जनांनां हितकर होत.
‘सत्रा दधिरे अनु वीर्याय’ (६,३६,२) वीरवर्म करणयासाठी त्या इंद्राला खरोखरच पुढच्या बाजूस धारण करितात.
‘सत्रा वार्ज न जिग्युपे’ (६, ४६, २) प्रभूत अशा अन्नाप्रमाणे तूं जिंकणारानां (देणगी) देतोस.
‘सत्रा विश्वानि पौस्य’ । (६,४६,७) महान् अशी सर्व बलें तूं आमच्यासाठीं हरण कर.
सत्रा कृघि सुहना शूर वृत्रा (७.२५,५) हे शूरा शत्रूंनां सहज मारतां येईल असेंच सर्वदा कर.
‘सत्रा राजाने दधिरे सहघ्यै’ (७.३१,१२) शत्रूला जिंकण्यासाठी राजांनां उद्देशून सर्व बाजूनें स्तोत्रें धारण केलीं जातात.
‘सत्रा विश्वस्य परमस्य राजसि’ (.३२, १६) उत्कृष्ट अशा धनाचा खरोखर (तूंच) राजा शोभतोस.
‘सत्रा हतं सोमसुता रथेन’ (७.९३, ५) सोम कुटणा-या लोकांकडून सोम न कुटणा-या लोकांचा नाश नेहमी केला जाई.
‘सत्रा दधिरे शवांसि’ (८.२,३०) एकदमच बलांनां धारण करतात.
‘सत्रा विश्वा स्वपत्यानि दधिषे’ (८.१५, १०) सर्व शोभन अपत्यांनां एकदम धारण करतोस.
‘सत्रा त्वं पुरुष्टुत’ (८.१५, ११) अग्रभागी स्तविला जाणारा तूं एकदमच सर्व शत्रूंना मारतोस.
‘अंत विंदामि सत्रा’ (८.४६, ११) खरोखर तुझ्या धनाचा अंत आह्यास लागत नाहीं.
‘सत्रा दशानप्रतिष्कुतं शवांसि’ (८.९७, १३) खरोखर बलांनां धारण करणा-या व शत्रूला न हटवणा-या इंद्रालांच आम्ही बोलावतो.
‘सत्रा देव महाँ असि’ (८. १०१, ११) हे देवा खरोखरच तू मोठा आहेस.
‘सत्रा वृषं जठर आ वृषस्व’ (१०.९६, १३) सोमरसाची अतिशय वृद्धि करणा-या इंद्रा हा सोमरस तूं आपल्या जठरांत ओत.
‘आदिंद्रः सत्रा तविषीरपत्यत’ (१०.११३, ५) तो इंद्र एकदम पुष्कळांचा अधिपति होतो.
वरील उता-यांशिवाय ॠग्वेदांत सत्र शब्द ब-याच ठिकाणीं आढळतो. परंतु तो वरील अर्थानेंच असणार. आम्ही दिलेल्या मतास वरील उतारे पुरेसे होतील.
आतां यजुर्वेद संहितेंत सत्र शब्द याग या अर्थी कसा रूढ झाला आहे हें पुढील उता-यांवरून समजून येईल. यजुर्वेदांत ह्या शब्दाचा अर्थ भाष्यकारांनीं निरनिराळी सत्रें (याग) व सत्र करणारे यजमान असा केला आहे.
‘सत्राभिजितें’ (७.५,१) सत्रानुष्ठानानें मिळविलेलें. ‘सत्रा’ (२.२,१२) एकत्र. ‘सत्रिणः’ (१.७,२;७.२,९;४,११) सत्र करणारें.
याशिवाय तैत्तिरीय संहितेंत १.६, १२;२.३,३;३.१,९;४.७, १३;७.१,४;२,९;३,६;९;४,१;२;५;५,१;५;८;९ या स्थली सत्र शब्द सामुच्चयिक याग या अर्थानें आला आहे.
अनेकांनी मिळून एकत्र कांही क्रिया करावयाची. ही ॠग्मंत्रकालीन पद्धति सूतसंस्कृतीमध्येहि असणें स्वाभाविक आहे, आणि शत्रुदमनासाठी सामुच्चयिक प्रार्थना किंवा हवन हें सूतसंस्कृतीच्या लोकांत होत असल्यास सर्पसत्र विषयक कल्पना त्यांच्यांत विकसित झाली असल्यास नवल नाहीं. सामुच्चयिक कर्म हें सूतसंस्कृतीच्या देश्यांत होतें, आणि दैनिकयागसमुच्चय मांत्रीत होता. तर या दोहोंचेहि एकीकरण होऊन सत्रविषयक श्रौतविधी तयार झाले असावेत असें दिसतें.