प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.

होमरचें युग - क्रीटमध्यें ख्रि. पू. १२०० पासून नवपाषणयुग (निओलिथिक) काळापर्यंत व पाषाणयुगापासून मिनोईयुगापर्यंत सारखी वाढ चालत राहून नंतर तेथें एकाएकीं खंड पडतो. आदययुगसंस्कृति व ऐतिहासिक काळांतील डोरिअन लोकांची संस्कृति यांचा संबंध जोडतां येत नाहीं. डोरिअन लोक आदययुगीन लोकांच्या मानानें फारच रानटी होते. पुराणवस्तुयुग व ऐतिहासिक युग यांमध्यें हें मोठें खिंडार आहे. आतां मायसीनी चित्रकला व ख्रि. पू. ९ व्या शतकांतील आदय ग्रीक चित्रकला यांचा संबंध थोडासा जोडतां येतो. तसेंच मायसीनी युग व होमरयुग यांचाहि संबंध असल्याचें बहुतेकांस मान्य आहे. तथापि प्रो. रिजवेनें आपल्या 'ग्रीसचें आदययुग' या ग्रंथांत यांतील साम्य व विरोध उत्तम दाखविला आहे. उ. मायसीनि हेंच ॲगामेम्नॉनचें नगर होय; व होमरगृहें व मायसीनि येथील राजवाडे यांत साम्य आहे. उलट पक्षीं होमरमध्यें लोखंडाचा उल्लेख आहे, पण मायसीनी लोकांस तें माहीत नव्हतें. हेलेन हें नांव ग्रीक लोकांस पडलें असावें. ख्रि. पू. ८ व्या ७ व्या शतकांविषयीं ऐतिहासिक माहिती फार अल्प आहे. त्याच काळांत राजसत्ताकपद्धति लयास जाऊन हक्कदार किंवा उच्च घराण्यांतील लोक यांच्या हातांत राज्यकारभार जाऊन अल्पसत्ताकपद्धति सुरू झाली.