प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.
सस्सन साम्राज्य - सस्सन राजांच्या अमदानींत ग्रीक संस्कृतीचा कांहीं अवशेष शिल्लक राहिला असला, तर उपलब्ध ऐतिहासिक साधनांवरून तरी तो दिसत नाहीं. सस्सन राजे आपल्या राष्ट्रसंस्कृतीच्या रक्षणार्थ फार झटत होते; व डॉर्मेस्टेटरनें म्हटल्याप्रमाणें झरथुष्ट्र पंथांत ग्रीक छटा दिसत असती तर सस्सन राज्यामध्यें ग्रीक संस्कृतीचा परिणाम दिसून आल्याशिवाय राहिला नसता. पण वस्तुस्थिति तशी दिसत नाहीं. दरबारामध्यें कदाचित ग्रीक संस्कृतीच्या कांहीं अंगांचा मर्यादित प्रवेश झाला असेल. खुशरूला ग्रीक तत्त्वज्ञानाची आवड असून त्यानें ग्रीक अध्यापक आपल्या राज्यांत आणलेहि होते. तसेंच टेसिफॉन येथील आपला राजवाडा त्यानें ग्रीकांकडूनच बांधविला असें एक ग्रंथकार म्हणतो. पण खुशरूच्या एकंदर वागणुकीवरून इराणमधील ग्रीक संस्कृति -हास पावलेली होती, आणि जरूर लागल्यास ग्रीक विद्वानांनां व कारागिरांनां सरहद्दीपलीकडच्या प्रदेशांतून आणावें लागत होतें असें दिसतें.