प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.

सिरियांतील ग्रीक संस्कृति - या ग्रीक नगरांच्या जाळ्यामुळें आशियामायनरमध्यें ज्याप्रमाणें देश्य भाषांचा नाश झाला, त्याप्रमाणें सिरियामध्यें झाला नाहीं; व मेसापोटेमियामध्यें तर ग्रीक नगरांचा देश्य भाषांवर परिणाम याहूनहि थोडा झाला. येथें जुन्या संस्कृतीचेंच वर्चस्व कायम होतें, व करी (हरान) येथें तर ख्रिस्तीसंप्रदायाच्या स्थापनेनंतरहि ते तसेंच टिकलें. अँटिऑक येथील व सामान्यतः सर्वच शहरांतील खालच्या वर्गांतील लोक अरमइक भाषा बोलत असत, व खेडेगांवांत तर हीच भाषा सर्वत्र प्रचारांत होती. उलट पक्षीं, शहरांतील सुशिक्षित लोकांत मिसळणा-या किंवा सरकारी नोकरींत शिरलेल्या तद्देशीय श्रीमंत लोकांवर मात्र भाषेच्या व चालीरीतीच्या बाबतींत ग्रीक संस्कृतीचा बराच परिणाम झाला होता. या ग्रीक संस्कृतीचा तेथील समाजव्यवस्थेवर किती परिणाम झाला होता हें सिरियाच्या शासनग्रंथावरून कळून येतें. ग्रीक वाङ्‌मयामध्यें ज्या सिरियन लोकांनीं ख्याति मिळविली त्यांमध्यें सामोसाटाच्या ल्यूशिअनसारखें देश्य रक्ताचे कांहीं इसमहि होते. उत्तरकालीन ग्रीक तत्त्वज्ञानाच्या विकासामध्यें व ख्रि. पू. पहिल्या शतकांतील काव्य वाङ्‌मयांत फिनीशियन शहरांतील देश्य लोकांनीं बराच भाग घेतलेला आढळून येतो. वाङ्‌मयाची व समाजांतील उच्च वर्गाची भाषा या दृष्टीनें ग्रीक भाषेला महत्त्व प्राप्त झालें होतें. इडेसासारख्या ठिकाणीं जेथें देश्य घराणीं राज्य करीत होतीं तेथें कदाचित् अरमइक भाषेचा वाङ्‌मयाच्या कामीं उपयोग होत असावा. दुस-या शतकामध्येंच येथें आपणांस सिरिअक भाषेचा उपयोग करणारें एक ख्रिस्ती उपासनामंदिर आढळून येतें, व ख्रिस्ती संप्रदायाच्या प्रसाराबरोबरच ग्रीक भाषा मागें पडून सिरिअक भाषा पुढें आलीं. हल्लीं जें सिरिअक वाङ्‌मय उपलब्ध आहे तें सर्व ख्रिस्ती आहे.

पण ग्रीक भाषेच्या जागीं सिरिअक आली म्हणून तेथें ग्रीक संस्कृतीचें उन्मूलन झालें असें मात्र नाहीं. ख्रिस्ती संप्रदायांत ग्रीकसंस्कृतीचा बराचसा अंश होता. 'नशिबावर' म्हणून दुस-या शतकाच्या शेवटीं लिहिलेला सिरिअक भाषेंतील जो प्राचीनतम ग्रंथ उपलब्ध आहे तो ग्रीक धर्तीवरच लिहिलेला आहे. पुढील शतकांत ग्रीक ग्रंथांची विशेषतः शास्त्रीय व तात्त्विक विषयांवरील पुस्तकांचीं सिरिअक भाषेंत बरींच भाषांतरें झालीं.