प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.
सैनिकांतील निरुत्साह व स्वदेशाकडे गमन - परंतु अलेक्झांडरास या वेळीं, त्याच्या सैन्यामध्यें नेहमींचा उत्साह दिसून आला नाहीं. आपलें सैन्य पुढें जाण्यास नाखुष आहे असें त्याला आढळून आलें. त्यानें सर्व सैन्य एके ठिकाणी गोळा करून त्याच्यापुढें एक वत्तृफ्त्वपूर्ण आणि स्फूर्तिदायक असें भाषण करून लोकांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यानें आतांपर्यंत आपण किती शौर्यानें लढलों व मोठमोठ्या बलाढ्य शत्रूंनां कसें पादाक्रांत केले याचें रसभरीत वर्णन केलें, व आतां जर आपण ही नदी ओलांडू तर आपणांस आशियांतील अलोट संपत्ति मिळण्याचा संभव आहे असेंहि सांगून पाहिलें. परंतु या भाषणाचा त्या सैनिकांच्या मनावर कांहींच परिणाम झाला नाहीं. सरतेशेवटीं कोइनॉस नांवाचा अलेक्झांडरचा घोडदळावरील विश्वासू सेनापति उठला व त्यानें अलेक्झांडरच्या सैन्याची स्थिति खराब कशी झाली होती, त्याचे अनेक लोक जखमी कसे झाले होते व घरीं जाण्यास बहुतेक लोक किती उत्सुक झाले होते वगैरे हकीकत वर्णन करून परत फिरण्याची अवश्यकता प्रतिपादन केली.
कोइनॉसचें भाषण सर्व सैनिकांनां अतिशय पसंत पडलें. यामुळें अलेक्झांडरला आपला पाणउतारा झालासें वाटून तो कांहीं न बोलतां निमूटपणें आपल्या तंबूमध्यें गेला तो तीन दिवस बाहेर पडला नाहीं. सरतेशेवटीं आतां पुढें जाणें अगदीं अशक्यच आहे असें आढळून आलें तेव्हां त्यानें परत फिरण्याचा हुकूम सोडला.
आपली स्वारी कोठपर्यंत आली होती याची खूण म्हणून अलेक्झांडरनें जेथून तो परत फिरला त्या ठिकाणीं दोन मोठ्या वेदी बांधल्या व त्यांपुढें त्यानें बरेचसे बळी दिले. ह्या वेदी बांधण्यांतील उद्देश बराचसा सफळ झाला असें म्हणण्यास हरकत नाहीं. कारण, मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त व त्याच्या नंतरचे कित्येक राजे कांहीं शतकेपर्यंत तेथें येऊन बळी देत असत असें म्हणतात.
यानंतर अलेक्झांडर दुसरें कांहीं साहस न करतां पुन्हां आपल्या सैन्यानिशीं चिनाब नदीच्या तीरीं परत आला. येथें हेफाइस्तिऑन यानें एक तटबंदीचें शहर बांधलें होतें. या ठिकाणीं आपलें निरुपयोगी सैन्य ठेवून अलेक्झांडर नद्यांतून जलमार्गानें समुद्रापर्यंत जावयाचें ठरवून त्या प्रवासाची तयारी करूं लागला. परत जातां जातां वाटेंत हल्लीच्या राजौरी व भिंभार या संस्थानांच्या व ब्रिटिश हद्दींतील हझारा जिल्ह्याच्या प्रदेशांतील राजांचे वकील खंडण्या घेऊन आले होते त्यांचा त्यानें स्वीकार केला; आणि अभिसार (भिंभार व राजौरी) देशच्या राजास आपला क्षत्रप नेमून ज्याला ॲरिअननें अर्सेकीझ म्हटलें आहे त्या उरसा (हझारा) च्या राजावर यास अधिकार दिला. याच वेळेस, थ्रेसहून ५००० घोडेस्वारांचें पथक व त्याच्या पुतण्याकडून म्हणजे बाबिलोनियाच्या क्षत्रपाकडून २५००० चिलखतें व ७००० पायदळ अशी कुमक येऊन पोहोंचली. हीं चिलखतें ताबडतोब सैन्यामध्यें वांटण्यांत आलीं. नंतर तो झेलम (बितस्ता) नदीकडे जावयास निघाला, व त्या नदीच्या तीरावर त्यानें येऊन तेथें आपला तळ दिला. नदींतून पुढें जाण्याची तयारी करण्यामध्यें त्याचे कित्येक आठवडे गेले. या जलप्रवासासाठीं त्यानें आसपासच्या नदींत चालणार्या सर्व नावा गुंतवल्या होत्या. आणि कमी पडलेल्या नावा टेकडीच्या पाथ्यास असलेल्या अरण्यांतील लांकडाच्या नवीन तयार करण्यांत आल्या. ॲरिअनच्या मतें सर्व प्रकारच्या मिळून एकंदर २००० नावा अलेक्झांडरनें बरोबर घेतल्या होत्या. नावांवर चढण्यापूर्वी अलेक्झांडरनें आपल्या सरदारांची व हिंदू राजांच्या प्रतिनिधींची सभा भरविली, व त्यांच्या देखत बिआस व झेलम यांमधील सर्व प्रदेशावर पोरसला राजा नेमलें असल्याचें जाहीर केलें. याच वेळेस पोरस व त्याचा जुना शत्रु तक्षशिलेचा राजा यांच्यामध्यें सख्य घडवून आणून व त्या दोघांमध्यें शरीरसंबंध जुळवून तें चिरस्थायी करण्यांत आलें. तसेंच तक्षशिलेच्या राजाला झेलम व सिंधु यांमधील प्रदेश रीतसरपणें देऊन त्याला संतुष्टहि करण्यांत आलें.
अलेक्झांडरनें पुढें कूच करण्यापूर्वी हेफाइस्तिऑन आणि क्राटेरॉस यांनां पुढें जाऊन झेलमपासून सिंधूपर्यंत पसरलेल्या मिठाच्या डोंगराच्या प्रदेशाचा राजा सौभूति याला जिंकण्यास सांगितलें. परंतु तो राजा कांहींएक प्रतिकार न करतांच शरण आला.