प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.
सामाजिक परिवर्तन - अलेक्झांडरपासून डायोक्लीशिअनपर्यंत राजकीय दृष्ट्या जो ग्रीक संस्कृतीचा र्हास झाला त्याबरोबरच ग्रीक व ग्रीकसंस्कृतीच्या छत्राखालील लोकांच्या स्वभावांत देखील पुष्कळच फरक पडला. अर्थात् एका प्रदेशांत व दुसर्या प्रदेशांत बरेंचसें भिन्नत्व होतें. पण या सर्व साधारण असलेल्या स्थितींत व पूर्वीच्या ग्रीक साम्राज्यामधील समाजाच्या स्थितींत कांहीं फरक आढळून येतात. पूर्वेकडील सर्व देश ग्रीक लोकांनां मोकळे झाल्यामुळें त्यांनीं अतोनात पैसा मिळवला. त्यांची राहणी थोडीशी उच्च व थाटाची बनली. ग्रीक दरबारांतहि हा थाटमाट शिरला. डायोशिअस, हार्मिअस यांसारख्या मोठमोठ्या प्रधानांनीं अलोट संपत्ति मिळविली. मोत्यें, माणकें वगैरे रत्नें शोभेसाठीं वापरण्यांत येऊं लागली. अलेक्झांडरच्या पूर्वी ग्रीकांमध्यें जी एकराष्ट्रीयत्वाची भावना होती ती आतां दृढ होऊन एक सर्वसामान्य अशी ग्रीक संस्कृति जगभर पसरूं लागली. ग्रीकांमधील सामान्य भाषा जी 'कॉयनी' ती जुन्या पोटभाषांनां मागें टाकून सर्वत्र पसरली