प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.
वसाहती - व्यापाराबरोबरच वसाहतींसहि सुरुवात झाली. तथापि ग्रीक वसाहती म्हणजे केवळ व्यापारी ठाणी नव्हतीं; किंवा लोकसंख्या फार झाल्यामुळेंहि त्या बनलेल्या नव्हत्या. यांपैकीं कित्येक वसाहती राजकीय असंतोषामुळें व कांहीं केवळ साहसप्रियतेमुळेंहि झालेल्या होत्या. शिवाय रोमन किंवा अलीकडीली यूरोपीय वसाहतींप्रमाणें ग्रीक वसाहती राजकीय पारतंत्र्यांत नसून त्या पूर्ण स्वतंत्र किंवा स्वराज्ययुक्त होत्या. तसेंच जात, वर्ण व हवापाणी या बाबतींतहि ग्रीक वसाहतींनां अलीकडील वसाहतींप्रमाणें त्रास किंवा अडचणी सोसाव्या लागल्या नाहींत. कारण, ग्रीक वसाहतवाले व तद्देशीय लोक यांचा वर्ण, जात व संस्कृति हीं परस्परसदृश्य असून हवामानहि तेंच म्हणजे भूमध्य प्रदेशांतल्या सारखेंच होतें, यामुळें मूळचे व नवे लोक एकमेकांत लवकरच मिसळून जात.