प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.

मॅसिडोनिया - मॅसिडोनियामधील देश्य संस्थानिक ख्रि. पू. ५ व्या शतकापासून ग्रीक लोकांच्या ऐश्वर्याला मोहून गेलेले होते. पहिल्या अलेक्झांडरनें टेमेनिड घराणें हें अर्जाइव्ह वंशोत्पन्न आहे असें न्यायाधीशांनां अट्टाहासपूर्वक सांगितलें आहे; व जरी त्यांच्या शत्रूंनीं त्यांनां 'रानटी' (बार्बेरिअन) असें म्हटलें आहे, तरी मॅसिडोनियाचे राजे आपणांला ग्रीकवंशीय असें अभिमानानें म्हणवून घेत. आर्किलेअसनें (ख्रि. पू. ४१३-३९९) राज्याची व्यवस्थित संघटना ज्या वेळी केली तेव्हां ग्रीक संस्कृति मॅसिडोनियामध्यें हळू हळू शिरकावूं लागली; व थोडक्याच काळांत ती सर्वत्र पसरली. जें जें कांहीं ग्रीकांचें उत्तम असेल तें तें इजीच्या दरबारांत येऊं लागलें. झूक्सिसनें राजवाड्याचें बांधकाम करून तो शृंगारला. युरिपिडीझन आपले वृद्धापकाळचे दिवस या दरबारी घालविले. या वेळेपासून मॅसिडोनियाच्या सरदारांमध्यें देखील ग्रीक वाङ्‌मय पसरूं लागलें. त्यांचीं नांवें फिलिपच्या कारकीर्दीत ग्रीक तर्‍हेचींच दिसून येतात. फिलिपच्या ताब्यांत असलेल्या ग्रीक संस्थानांमधून पुष्कळसे ग्रीक लोक मॅसिडोनियाच्या लष्करांत आले होते. फिलिपनें आपल्या मुलाला शिकविण्यासाठीं आरिस्टॉटल नांवाच्या ग्रीक विद्वानाला नेमलें होतें; व वाङ्‌मयांत आणि दरबारांत सर्वत्र ग्रीक भाषाच मुख्य मानली जात असे.

पश्चिमेकडे : सिसिलींतील मूळचे लोक - इटाली व गॉलच्या दक्षिणेकडील प्रांत यांच्या सन्निध ग्रीक वसाहती असल्याकारणानें त्यांच्यावरहि ग्रीक संस्कृतीची छाप बसली होती. चवथ्या शतकामध्यें छोट्या व मोठ्या डायोनिशिअसच्या कारकीर्दीत सिसिल लोकांवर ग्रीक संस्कृतीची पूर्णपणें छाप पडली (फ्रीमन-सिसिलीचा इतिहास २. ३८७).

ख्रि. पू. ५ व्या शतकापासून इटालियन लोकांमध्यें जीं अक्षरें प्रचलित होतीं ती प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रीतीनें ग्रीकांपासूनच घेतलेलीं होतीं. दक्षिण इटालीमधील लोकांमध्यें ग्रीकांचीच नामकरणपद्धति अस्तित्वांत होती. दक्षिण इटालीमध्यें प्रचलित असलेल्या पायथॅगोरियन तत्त्वज्ञानाचा तद्देशीय संस्थानिकांनीं अंगीकार केलेला होता. दक्षिणेकडील गॉलमधील ग्रीक लोकांमुळें केल्टिक जातींमध्यें ग्रीकसंस्कृति इतकी पसरली कीं, ग्रीक लोकांच्या नाण्यांप्रमाणें अतलांतिक महासागराच्या कांठींहि नाणीं पडू लागलीं.