प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.

मिनोई व मायसीनी युगें - ग्रीसच्या इतिहासाला आरंभ केव्हांपासून होतो हा मोठा वादग्रस्त प्रश्न आहे. पहिल्या ऑलिंपिअड (ख्रि. पू. ७७६) पासून त्याला आरंभ होतो हें प्रसिद्ध इतिहासकार ग्रोट याचें म्हणणें बरेंच मान्य होऊं लागलें होतें तोंच पुराणवस्तुसंशोधनशास्त्राची विलक्षण वाढ होऊन त्यांतील पुराव्यांवरून असें ठरूं पहात आहे कीं, त्या इतिहासाचा आरंभ ख्रि. पू. ३ र्‍या किंवा ४ थ्या सहस्त्रकापासून धरला पाहिजे. या संशोधनाच्या कामांत एच. इलीमन व ए. जे. इव्हॅन्स यांनीं फार परिश्रम केले आहेत. श्लीमननें ट्रॉय, मायसीनि, टिरिन्स इत्यादि ठिकाणीं जीं मोठालीं खोदकामें केलीं त्यांवरून मायसीनी युगाची माहिती उपलब्ध झाली असून त्यायोगें इतिहासास ख्रिस्तपूर्व दुसर्‍या सहस्त्रकाच्या मध्याइतकें मागें नेतां आलें पुढें इव्हॅन्सनें इ. स. १९०० मध्यें क्रीट बेटांत जें खोदकाम हातीं घेतलें त्यायोगें मिनोई युगाची माहिती उपलब्ध होऊन आणखी हजारपंधराशें वर्षे अगोदरच्या संस्कृतीच्या इतिहासावर प्रकाश पडला. परंतु मिनोई व मायसीनी संस्कृतीशीं हेलेनिक लोकांचाच कार्यकारणरूप संबंध आहे हें ठरण्यास त्या संस्कृतिकाळांतील लिपि व धर्म तदनंतरच्या ग्रीकांच्या लिपीशीं व धर्माशीं जुळावयास पाहिजे; पण तें अद्याप सिद्ध झालें नाहीं. कारण त्या लिपींतील लेख वाचून त्याचा अर्थ कोणास लावतां आलेला नाहीं. परंतु मायसीनी चित्रकला व ग्रीक चित्रकला या दोहोंतहि दिसून येणार्‍या कल्पनास्वातंत्र्याच्या गुणावरून व त्या कलेच्या परिणत अवस्थेशीं प्राचीन ग्रीक कलेच्या निकट साम्यावरून त्यांचा परंपरागत संबंध चांगला सिद्ध होतो. तथापि एकंदरीत या प्रश्नाचें उत्तर अद्याप अनिश्चित स्वरूपांतच आहे असें म्हटलें पाहिजे. तसेंच या संस्कृती स्वयंसिद्ध बनत गेल्या किंवा अनुकरणसिद्ध होत्या, अथवा या संस्कृतींचा मिसरी व पौरस्त्य संस्कृतींशीं, तसेंच मिनोई युगाचा पेरिक्लीन व पिसिस्ट्रेटस युगांशीं काय व कसा संबंध होता वगैरे गोष्टीहि नक्की ठरल्या नाहींत. नोसस येथील नहरांचें काम १८ व्या शतकांतल्यापेक्षां चांगलें होतें; युद्धांत पायदळापेक्षां रथी योध्द्यांनां अधिक महत्त्व असे; सर्व शरीर आच्छादितील अशा मोठाल्या ढाली असत; ग्रीक इतिहासांतील नगरराज्यांपेक्षां त्या वेळच्या एकसत्ताक राजांचीं राज्यें विस्तृत होतीं वगैरे गोष्टी महत्त्वाच्या आहेत.