प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.
पोरसशीं लढाई - तक्षशिला येथें आपल्या सैन्याला बरीच विश्रान्ति देऊन तेथील राजाच्या साहाय्यानें हायडॅस्पीझ (झेलम) वर युद्धाची तयारी करून वाट पहात असलेल्या पोरसला तोंड देण्यासाठीं अलेक्झांडर पूर्वेकडे निघाला. तक्षशिलेपासून हायडॅस्पीझवरील झेलम नामक शहर नैर्ॠत्येच्या बाजूस शंभर मैल दूर होतें. तेथपर्यंत येण्यास अलेक्झांडरला १५ दिवस लागले. उन्हाळा प्रखर होता तरी त्यास न जुमानतां कोठेंहि न थांबतां अलेक्झांडर आपल्या सैन्याला घेऊन तडक झेलम येथें आला (मे. ख्रि. पू. ३२६). येथें त्याला झेलम नदीला भयंकर पूर आला असल्याचें आढळून आलें. तेव्हां त्याला पुन्हां नावांचा उपयोग करावा लागला. त्याची सर्व जय्यत तयारी होती, तरी स्थानिक गोष्टींची माहिती असल्याशिवाय कांहींहि करणें फार धोक्याचें होतें. यास्तव अलेक्झांडर तेथील परिस्थितीचें फार बारकाईनें निरीक्षण करूं लागला. नदीच्या दुसर्या तीराला पोरसची सेना कडेकोट बंदोबस्तानें उभी होती. तिच्यावर अगदी समोरून हल्ला करतां येणें शक्यच नव्हतें. म्हणून अलेक्झांडरनें एक निराळीच युक्ति लढविली. नदीचें पाणी उत्तरेपर्यंत तेथेंच रहावयाचें असा त्यानें बहाणा केला व त्यामुळें पोरसचें सैन्य गाफिल राहिलें. अतिशय काळजीपूर्वक शोधाअंतीं त्याला असें कळून आलें कीं, त्याच्या छावणीपासून वर १६ मैलांच्या अंतरावर नदीला वांक असून त्या ठिकाणीं शत्रूला कळूं न देतां आपल्याला नदी ओलांडतां येईल. ताबडतोब त्यानें नदी ओलांडण्याचा निश्चय करून क्राटेरॉसपाशीं ५००० सैन्य ठेवून त्याजकडे झेलमची छावणी संभाळण्याचें काम सोंपविलें, व आपण स्वतः अकरा बारा हजार निवडक सैन्य घेऊन तेथून कूच केलें. आपण कोठें जाणार हें शत्रूला कळूं नये म्हणून रात्रींच्या रात्रीं कूच करून तो ठरल्या जागीं आला, व तेथें नावांतून त्यानें सर्व सैन्य पहाटेच्या सुमारास निर्विघ्नपणें पैलतिरावर नेलें. परंतु येथें आणखी एक नदीचा खोल प्रवाह अद्याप आपणास ओलांडावयाचा आहे असें त्यास आढळून आलें. मोठ्या प्रयासानें त्यानें उताराची जागा शोधून काढली, व त्याचें सैन्य छातीइतक्या पाण्यांतून कसेंबसें अलीकडे आलें. येथून पोरसच्या छावणीकडे जाण्याचा मार्ग अडचणीचा होता, व शिवाय भिजून चिंब झालेल्या सैनिकांसहि कपडे वाळविल्याशिवाय पुढें जाणें शक्य नव्हतें. यामुळें अलेक्झांडरला आपला अचानक छापा घालण्याचा बेत रहित करावा लागला. इतकें होईतों पोरसला ही वर्दी लागून त्यानें आपल्या मुलास २००० घोडेस्वार व १२० रथ देऊन अलेक्झांडरवर पाठविलें. परंतु त्याचा पराभव होऊन त्यास आपले सर्व रथ गमावून परत फिरावें लागलें. हें पोरसला कळतांच तो आपलें सैन्य घेऊन अलेक्झांडवर चाल करून आला. पोरसनें आपल्या सैन्यापुढें शंभर शंभर फुटांच्या अंतरावर आठ रांगांत २०० हत्ती उभे केले होते. त्याला असें वाटत होतें कीं, या हत्तींमुळें शत्रूचे घोडे बुजून वरील स्वारांस ते अनावर होतील. या हत्तींच्या मागें त्यांच्या दरम्यान ३०००० पायदळ शिस्तीनें उभें होतें. घोडेस्वार एकंदर ४००० असून ते सैन्याच्या दोन्ही बगलांचें संरक्षण करण्याकरतां दोन्ही बाजूंस रथांच्या मागें उभे केले होते. रथांची संख्या ३०० होती. प्रत्येक पाइकाजवळ रुंद व जड तलवारी, भाले व धनुष्यें हीं आयुधें होतीं. अशी तरी स्थिति होती तरी मॅसिडोनियाच्या चपळ सैन्यापुढें या लोकांचा टिकाव लागणें शक्य नव्हतें. पोरसजवळ जे कांहीं थोडे घोडेस्वार हाते ते देखील ग्रीक घोडेस्वारांबरोबर टिकणारे नव्हते. अलेक्झांडरला पोरसच्या सैन्यावर समोरून हल्ला करणें आपणास जमणार नाहीं असें आढळून आल्याबरोबर त्यानें १००० तिरंदाज घोडेस्वारांस एकदम वळसा घालून शत्रूच्या डाव्या बगलेवर जोराचा हल्ला करण्यास पाठविलें, व शत्रूची धांदल होईपर्यंत आपल्या ६००० पायदळास जागच्या जागीं स्वस्थ बसण्यास सांगितलें. अलेक्झांडरच्या तिरंदाज घोडेस्वारांनीं आपले बाण सोडण्यास सुरुवात केली. व थोड्या वेळानें अलेक्झांडरहि आपली फौज घेऊन त्यांस सामील झाला. तेव्हां पोरसच्या सैन्याच्या उजव्या बगलेकडील घोडेस्वार डाव्या बगलेकडील घोडेस्वारांस मदत करण्याकरितां सैन्याच्या पाठीस वळसा घालून यावयास निघाले. हें पाहतांच उजव्या बाजूनें कोइनॉसच्या आधिपत्याखालीं असलेली अलेक्झांडरच्या घोडदळाची एक तुकडी दौड करीत पोरसच्या स्थूल सैन्यासमोरून उजव्या बगलेकडे जाऊन, तिला वळसा घालून पिछाडीवर हल्ला करण्याकरितां मागें येऊं लागली. त्यांनां तोंड देण्याकरितां पोरसचें सैन्य तोंड फिरवूं लागलें तेव्हां त्याची साहजिकच धांदल झाली. अशा रीतीनें पोरसच्या सैन्याच्या या धांदलीचा फायदा घेऊन अलेक्झांडरनें जोराचा हल्ला चढवला. तेव्हां पोरसचे दोन्ही बगलेकडील सैनिक आली जागा सोडून आश्रयासाठीं म्हणून हत्तींमध्यें घुसले. अशा स्थितींत पोरसच्या महातांनीं ग्रीक घोडेस्वारांवार आपले हत्ती ढकलले. घोडेस्वारांनीं त्यांच्यावर बाण सोडण्यास सुरुवात केली, तेव्हां हत्ती चिडून शत्रूच्या सैन्यांत शिरले. ही संधि साधून पोरसच्या घोडेस्वारांनींहि ग्रीक सैन्यावर निकराचा हल्ला केला, पण तो निष्फळ झाल्यानें ते पुन्हां हत्तींच्या दरम्यान येऊन उभे राहिले.
पुढें ग्रीक घोडेस्वारांनीं जोराचा हल्ला चढवून पोरसच्या सैन्याची दाणादाण चालविली. पोरसचें सैन्य जिकडे तिकडे पळूं लागलें. पोरसचे हत्ती आतां जवळ जवळ आल्यानें त्यांनीं शत्रूच्या सैन्याइतकाच स्वतःच्याहि सैन्यांत हाहाःकार उडविला. पोरसचें ३००० लोक मारले गेले व ९००० बंदिवान झाले. पोरसनें स्वतः व शौयाची अगदीं कमाल केली. त्याला नऊ जखमा होऊन मूर्च्छित अवस्थेंत तो शत्रूच्या हातीं लागला. अलेक्झांडरनें त्याच्या विनंतीला मान देऊन, त्याचा राजाप्रमाणें सत्कार केला. त्यानें पोरसचें राज्य पोरसला परत देऊन आणखीहि कांहीं मुलूख त्याला दिला; व अशा रीतीनें त्यानें एका मोठ्या शत्रूस आपला कायमचा मित्र बनविलें.
या जयाचें स्मारक म्हणून निकैया आणि बूकेफल या नांवांची दोन शहरें वसविण्यांत आलीं. यांपैकीं निकैया हें लढाईच्या जागेवर व दुसरें बूकेफल हें ज्या ठिकाणाहून अलेक्झांडर हायडॅस्पीझ नदी ओलांडण्यास निघाला त्या ठिकाणीं वसविण्यांत आलें. या दुसर्या शहराला अलेक्झांडरचा प्रसिद्ध व त्यास अनेक संकटांतून निभावून नेणारा असा जो बूकंफालस नांवाचा विजयशाही घोडा त्याचेंच नांव देण्यांत आलें होतें. हें शहर पश्चिमेकडून हिंदूस्थानांत शिरण्याच्या राजमार्गावर वसलें असल्यामुळें, याची फार भरभराट झाली. प्लुटार्कच्या मतें, अलेक्झांडरनें वसविलेल्या सर्व शहरांमध्यें हें शहर मोठें व महत्त्वाचें आहे. हल्लींचे झेलम शहर हेंच पूर्वीचें बूकेफल होय. निकैया शहर मात्र फारसें प्रसिद्धीस आलें नाहीं. पण तें हल्लींच्या सुखचैनपुर या शहराच्या आसपास कोठें तरी वसलें असावें असा तर्क आहे.
पोरसच्या या लढाईचें नाणकविषयक स्मारक म्हणजे ब्रिटिश म्यूझिअममध्यें ठेवलेलें सुप्रसिद्ध दहा द्रामांचें नाणें होय. या नाण्यावर एका बाजूस दोन महात वर असलेल्या हत्तीस हांकून नेत असलेला एक मॅसिडोनियन घोडेस्वार असून दुसर्या बाजूला डोक्यास पर्शियन शिरस्त्राण घातलेला व हातांत वज्र (भाला) घेतलेला असा अलेक्झांडर उभा असलेला दाखविला आहे.