प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.
पश्चिमेकडील ग्रीक संस्कृति - पूर्वेकडे ग्रीकसंस्कृतीचा ग्रीक लोकांच्या राजकीय वर्चस्वामुळें प्रसार झाला, पण इटालीमध्यें तिला तो स्वतःच्या तेजामुळेंच केवळ करून घ्यावा लागला. तिस-या शतकामध्यें कार्थेजमधील सुशिक्षित वर्गाचा ग्रीक संस्कृतीशीं परिचय झाला होता असें दिसतें. दुस-या शतकांत अथेन्स येथील विद्यापीठाचा मुख्य क्लिटॉमाकस हा तत्त्वज्ञ कार्थेजियन होता. ग्रीक संस्कृतीचा प्रसार इटालींत अलेक्झांडरच्या पूर्वींच थोड्या फार प्रमाणांत झाला होता. पण दक्षिण इटाली आणि सिसिली येथील ग्रीक लोक जेव्हां ख्रि. पू. तिस-या शतकामध्यें रोमन सत्तेखालीं आले, तेव्हांच ग्रीक संस्कृतीचा म्हणण्यासारखा अंश रोममध्यें शिरला.लिव्हिअस अँड्रोनायकस या दास्यत्वांतून मुक्त झालेल्या ग्रीक इसमानें ओडिसीचें भाषांतर करून नवीन धर्तीच्या लॅटिन वाङ्मयाचा पाया घातला. त्यानेंच ग्रीक नाटकांनांहि लॅटिन पेहेरावांत आणलें. आरंभीचे रोमन इतिहासकार ग्रीक भाषेंतच इतिहास लिहीत असत. तिस-या शतकाच्या अखेरीस टायटस क्विंक्शिअस फ्लामिनिअसच्या नेतृत्वाखालीं रोममध्यें ग्रीकाभिमानी उमराववर्ग तयार झाला होता, व त्यानें १९६ सालच्या इस्थमियन खेळांच्या वेळीं रोमच्या नांवानें ग्रीक स्वायत्ततेचा पुकारा केला. दुस-या शतकाच्या मध्यांत रोममधील ग्रीक संस्कृति सिपिओ एमिलिएनसच्या मंडळांत केंद्रीभूत झालेली असून त्या मंडळामध्यें पोलिबिअससारखे विद्वान् आणि पॉनीशिअससारखे तत्त्वज्ञ होते. बाबिलोनियन डायोजिनीझ, क्रिटोलेअस आणि कार्निआडीझ हे तिघे तत्त्वज्ञ १५५ सालीं रोमला आलें तो काळ रोममधील ग्रीक संस्कृतीच्या इतिहासांत नवयुगारंभकारी होता. ग्रीक संस्कृतीस स्थानिक विरोध होणें हें अर्थातच अपरिहार्य होतें; व सर्व ग्रीक तत्त्वज्ञांनां व विवादकांनां अधिकारी मंडळानें एकदां (१६१) शहर सोडण्याचा हुकूम सोडला. या हुकूमांचा परिणाम केवळ तात्पुरताच होता. इटालियन लोकांनीं ग्रीक मतांचा सररहा अंगीकार केला नाहीं. निरनिराळ्या शाखांमध्यें कमी अधिक प्रमाणांत त्यांनीं आपलें स्वातंत्र्य राखलेच होतें. कला व वाङ्मय या बाबतींत सुद्धा इटालियन लोकांनीं थोडेसें स्वातंत्र्य कायम ठेविलें होतें. रोममधील शासनपद्धति त्यांची स्वतःचीच होती. त्यांनीं लॅटिन भाषेंत वाङ्मय निर्माण केलें एवढ्यावरूनच त्यांची कल्पकता व ग्राहक बुद्धि दिसून येते. प्रतिभाशाली लॅटिन कवी हे केवळ अनुकरण करणारे नव्हते. उलट पक्षीं कायद्यासारख्या रोमन लोकांच्या स्वतंत्र बुद्धीनें विकास पावलेल्या विषयांत देखील थोडी तरी ग्रीक विचारांची छटा दिसून येते. रोमन कायदेशास्त्राच्या बाबतींत स्टोइक तत्त्वज्ञानानें बरीच मदत केली हें बहुश्रुतच आहे.
इटालीमधील वरच्या सुशिक्षित वर्गास शिक्षणामुळें ग्रीक संस्कार झाला, तर अगदीं खालचा वर्ग, रोममध्यें गुलाम म्हणून जे ग्रीक किंवा ग्रीकसंस्कृतियुक्त आशियामधील लोक आणले गेले, त्यांच्या संसर्गानें ग्रीक संस्कृतीखालीं आला. रोममध्यें यहुदी लोकांचे जे शिलालेख आहेत त्यांपैकीं दोन तृतीयांश ग्रीकमध्यें आहेत. रोममधील प्राचीन ख्रिस्ती प्रार्थनामंदिरांतहि ग्रीक भाषाच चालत असून तिस-या शतकापर्यंत ती तशीच कायम राहिली.