प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.

महायुग - (ख्रि. पू. ४८०-३३८) - वर सांगितल्याप्रमाणें पर्शियनांचा मोड करून हांकून लाविल्यापासून जे अनेक इष्ट परिणाम झाले, त्या मानानें स्पेनच्या आरमाराच्या पराभवानें इंग्लंडवर झालेले परिणामहि कमी महत्त्वाचे आहेत. या जयानें राष्ट्रीय एकी व वर्चस्व या भावना ग्रीक लोकांत फार बळावल्या. या महायुगांत राजकारण, वाङ्‌मय व कला पूर्णावस्थेस पोहोंचल्या. सर्वत्र लोकशाही स्थापन झाली; व हळू हळू ग्रीक संस्थानांचा संयुक्तसंघ बनविला जाऊन अथेन्सच्या अध्यक्षत्वाखालीं डीलिअन संघ स्थापला गेला (ख्रि. पू. ४७७). या डीलिअन संघाचेंच पुढें अथेनियन साम्राज्यांत रूपांतर झालें, व अथेन्सची जागा पुढें स्पार्टानें घेतली. यानंतर थीबीकडे व त्यापुढें मॅसिडोनकडे वर्चस्व गेलें.