प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.
उपप्रकरण १० वें.
संघरक्षण, संघसदस्यत्व, आणि शिक्षणपद्धति.
हिंदु व हिंदुस्थान यांचा अभेद पाहिजे.- विश्वराष्ट्र या समुच्चयाची घटना जी व्हावयाची तिच्या दिशा ठरलेल्या आहेत. मत किंवा दैवत या तत्त्वावर समाजरचना ठेवून अशा समाजांचा संघ करावयाचा ही पद्धति शक्य नाहीं. प्रादेशिक समुच्चय म्हणजे राष्ट्रें यांचाच समुच्चय होऊन विश्वराष्ट्र होईल. लेनिनसारख्या विचारास अत्यंत महत्त्व देणार्या मनुष्यानें देखील प्रादेशिक समुच्चय मान्य केले आहेत, तेव्हां जे समुच्चय प्रादेशिक नाहींत त्यांची एकी होऊन विश्वसंघ निर्माण होण्याचें कार्य होणें शक्य दिसत नाहीं. जे संघ प्रादेशिक नाहींत त्यांस जगाच्या शासनव्यवस्थेंत स्थान नाहीं. यासाठीं संघसमुच्चयांत सदस्यत्व मिळवून इतर सदस्यांशीं स्पर्धा किंवा सहकारिता करण्याचें काम मुसुलमानी, ख्रिस्ती वगैरे संप्रदायांचें नसून प्रांतांचें व देशांचे आहे. यामुळें ज्या संघाचें सदस्यत्व व्यक्तिस महत्त्वाचें आहे तो संघ संप्रदाय नसून राष्ट्र होय. मत बदललें म्हणजे संप्रदाय सोडण्यास बिलकुल हरकत नाहीं. आज हिंदुसमाजांत एखाद्यानें रामानुज मत टाकून शांकरमत ग्रहण केलें किंवा शांकरमत टाकून माध्वमत घेतलें किंवा रामोपासना टाकून गणपतीची उपासना केली तरी कोणीहि फिकिर करणाक नाहीं. कारण हिंदुसमाज हा जो संघसमुच्चय तयार झाला तो उपासनेच्या तत्त्वावर मुळींच झालेला नाहीं. त्यामुळें हिंदुसमाजसदस्यत्वामध्यें घोंटाळा उत्पन्न होत नाहीं. हिंदुसमाज हा संघसमुच्चय आहे आणि राष्ट्रसंघ हाहि एक संघमुच्चय आहे. हिंदुसमाजास जगाचे अवयव हिंदु म्हणून व्हावयाचें असलें तर हिंदु आणि हिंदुस्थान यांचा अभेद झाला पाहिजे. हा अभेद व्हावयाचा तर हिंदुसमाजांतच रूपांतर होत होत त्यानें हिंदुस्थानी बनावयाचें अगर हिंदुस्थानी या नांवाचा एक समाज प्रयत्नानें तयार करावयाचा व हिंदुसमाजास मरूं द्यावयाचें हा प्रश्न लोकांच्यापुढें त्यांच्या स्वयंनिर्णयासाठींच आहे.
पुष्कळ लोकांनां वारंवार अशी भीति पडते कीं, राष्ट्रीय भावना या उदारबुद्धीच्या नसून इतर लोकांस अनुदारपणानें वागविण्यास विशिष्ट देशाच्या नागरिकांस त्या प्रवृत्त करणार्या आहेत. यांचें म्हणणें असें कीं, राष्ट्र म्हणजे विशेष भाषा किंवा स्थानिक रिवाज यांस प्रामुख्य देण्याचें म्हणजे इतर लोकांस अनुदारतेनें वागविण्याचें यंत्र होय. यासाठीं राष्ट्रीय भावना निंदास्पद होय. स्वतः विवाह करून गृहस्थाश्रमाची निंदा व ब्रह्मचर्याश्रमाची तारिफ करणें हें जितकें लबाडीचें व चोरटेपणाचें असतें तितकेंच स्वतंत्र राष्ट्राच्या लोकांनीं राष्ट्रीय भावनांची थट्टा करणें लबाडीचें आहे. स्वतःच्या राष्ट्रीय आकांक्षा तृप्त करून घ्यावयाच्या, त्यापासून होणारे फायदे घ्यावयाचेच आणि दुसर्यास मात्र ‘जगन्मिथ्या’ म्हणून उपदेश करावयाचा अशी ही धूर्तता आहे.
एवढें मात्र लक्षांत ठेवलें पाहिजे कीं स्वसादृश्य इतरांवर लादावयाची इच्छा लोकांस प्रसंगीं तापदायक होत असली तरी वैसादृश्याविषयीं जी अनुदारता स्वतंत्र लोकसत्तात्मक राष्ट्रांत दृष्टीस पडते ती सर्वथैव निंदास्पद नाहीं. या लोकांशीं आपणांस बरोबरीच्या नात्यानें वागावयाचें, लग्नव्यवहार करावयाचा असें ध्येय ज्या लोकांसंबंधानें आपण बाळगूं त्या लोकांनीं आपल्यासारखें व्हावें अशी इच्छा होणें स्वाभाविक आहे. इतरास बरोबरीच्या नात्यानें वागावावयाचें नसलें किंवा आपल्या समाजांत स्थान द्यावयाचें नसलें म्हणजे वैसादृश्याचा द्वेष कोण करितो? प्रसंगीं मनुष्य त्यांचें कौतुकहि करील. आपण पशुसंग्रहालयांतील पशूवर ते नागवे आहेत म्हणून कोठें रागवतों? कोळी किंवा ठाकूर हे अर्धनग्न आहेत म्हणून त्यांवर कोठें चिडतों? पण जर यांपैकीं कोणास आपल्यांतच वागूं द्यावयाचें असलें तर मात्र आपण वैसादृश्याविषयीं असहिष्णु बनूं.