प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण १० वें.
संघरक्षण, संघसदस्यत्व, आणि शिक्षणपद्धति.

समाजाचें सदस्यत्व वाटेल त्यानें ठेवावें किंवा वाटेल त्यानें टाकावें हा प्रश्न मागें जेव्हां विचारास घेतला होता त्या वेळेस एक अधिक व्यापक प्रश्नाच्या विवेचनावर या प्रश्नाच्या विवेचनाची पूर्णता अवलंबून ठेवली. तो प्रश्न म्हटला म्हणजे भारतीय राष्ट्रीयत्वाचें आणि विशेषेंकरून हिंदूंच्या सामुच्चयिक स्थितीचें जगद्विकासांत स्थान काय? हें स्थान अजमावण्यापूर्वीं संघसमुच्चय कोणत्या संक्रमणांतून विश्वराष्ट्रत्वास पोंचेल हें पाहूं.

जगाची प्रवृत्ति अधिक मोठे समाज करण्याकडे आहे आणि त्यामुळें जगाचें अंतिम ध्येय विश्वबंधुत्व व विश्वबंधुत्व विश्वैक्य आहे ही गोष्ट सिद्ध धरली आहे. विश्वैक्य पूर्णतेस येण्यापूर्वीं जगास संघसमुच्चयाची स्थिति प्रथम येणार. संघसमुच्चय अधिकाधिक विकसित झाला आणि सर्व विश्वामध्यें एक अवयव-अवयवी संबंध उत्पन्न झाला म्हणजे विश्वास एक समाज समजतां येईल. हें जें भावी विश्वराष्ट्र उत्पन्न व्हावयाचें त्या राष्ट्रामध्यें देशाचे देश प्रामुख्येंकरून ब्राह्मण्य, क्षत्रियत्व अथवा वैश्यत्व पत्करून इतर देशांस शूद्रत्व पत्करावयास लावणार नाहींत कशावरून? अर्थात् विश्वराष्ट्र जरी झालें तरी स्पर्धा ही सुटावयाची नाहीं. असें स्पष्ट दिसतें.

संघसमुच्चयांतर्गत संघांचें पर्यवसान विश्वराष्ट्राच्या अवयवांत होणार असेल तर आपण मुख, बाहु, ऊरु किंवा पाद यांच्या कर्मांपैकीं कोणतें कर्म स्वीकारावें हें प्रत्येक संघास म्हणजे राष्ट्रास ठरवावें लागणार आहे, आणि हें ठरवितांना स्पर्धा अत्यंत तीव्र होऊन अधिक कुशल व अधिक बलवान् अशा राष्ट्राच्या हातीं सर्वाधिकार जाण्याचा संभव आहे.