प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण १० वें.
संघरक्षण, संघसदस्यत्व, आणि शिक्षणपद्धति.

शिक्षणविषयक सामान्य सिद्धान्त.- हिंदुस्थानांतील शिक्षणविषयक प्रश्नासंबंधाचा विचार प्रत्येक समाजिक किंवा शासनविषयक ग्रंथांत पाहिजेच. राजकारणाचा किंवा समाजनीतीचा विचार करतांना शिक्षणविषयक भाग हा त्यांतील बराच मोठा अंश होईल. ही गोष्ट अ‍ॅरिस्टॉटलपासून सर्व महत्त्वाच्या तत्त्ववेत्त्यानीं मान्य केली आहे आणि आपल्या सामाजिक ग्रंथांत शिक्षणावर बरींच पानें खर्च केलीं आहेत.

समाजाच्या गरजा जसजशा भिन्न होतात तसतशा त्याच्या शिक्षणपद्धतीहि भिन्न होतात. एका काळचे आणि एका ठिकाणचे शिक्षणविषयक विचार किंवा शिक्षणपद्धति भिन्न कालस्थलीं उपयोगीं पडणार नाहींत. सर्व कालांस उपयोगीं पडणारे असें कांहीं तात्त्विक शिक्षणविषयक सिद्धांत मांडतां येतात, ते मांडल्यानंतर विशिष्ट काल व स्थलाकडे पाहून परिस्थिति बदलावयाची हा शिक्षणपद्धति ठरविण्याचा एक मार्ग झाला. दुसरा मार्ग असा आहे कीं, समाजांत गरजा जशा व ज्या मानानें व तर्‍हेच्या निर्माण होतील तशा त्या पुरवीत जावयाच्या. पहिला मार्ग तत्त्ववेत्त्यांस व ग्रंथकारांस उपयोगी आहे व दुसरा कामचलाऊ मुत्सद्दयांस उपयोगी आहे.

शिक्षणविषयक अत्यंत सामान्य नियम येणेंप्रमाणें देतां येतील.

(१) विवक्षित शास्य-मग तें राष्ट्र असो अगर संप्रदाय असो-जिवंत ठेवण्यासाठीं त्याजविषयीं श्रद्धा उत्पन्न करणें आणि ते टिकवून ठेवण्यासाठीं सर्व जनतेंत तद्विषयक अभिमान उत्पन्न करणें हें शिक्षणाचें आदि-ध्येय होय.

(२) शिक्षणाचें दुसरें एक ध्येय असें आहे कीं, समाजांतील प्रत्येक शिक्षित व्यक्तीचा उपयोग समाजास जितका अधिक होईल तितका व्हावा.

(३) पहिल्या सांगितलेल्या आदिध्येयाच्या पूर्तीसाठीं जी गोष्ट अवश्य आहे ती ही कीं, जे शास्याचें केंद्र असेल, मग तें राजा असो अगर आचार्य असो, त्या केंद्राबरोबर व्यक्तिला उत्तम तर्‍हेनें सहकारिता करतां यावी म्हणून तिच्या ठिकाणीं शास्यावर जशी भक्ति उत्पन्न करावयाची तशी केंद्रावरहि भक्ति उत्पन्न करावी.

(४) विशिष्ट शास्य ज्या संस्कृतीशीं संबंद्ध असेल त्या संस्कृतीविषयींहि आपलेपणाची भावना उत्पन्न व्हावी.

प्रत्येक मनुष्याचा अत्यंत उपयोग व्हावा म्हणून ज्या संस्था आहेत त्यांत गृहें, शाळा, समाजव्यवहार या मुख्य होत. शिक्षणापैकीं कोणता भाग शाळांकडे द्यावा आणि कोणता भाग गृहाकडे म्हणजे आईबापांवर सोंपवावा, आणि कोणता भाग समाजांत सहज उत्पन्न होणार्‍या नाट्यकाव्यादि वाङ्मयावर सोंपवावा हा विचार मुत्सद्दयांच्या व लोकांच्या इच्छेवर, संवयीवर आणि परिस्थितीवर अवलंबून राहील.

जगांत जें वाढतें ज्ञान आहे त्यांतील कितपत अंश मनुष्यास द्रव्यार्जनाचें काम सुरू करण्यापूर्वीं देतां येईल याचा विचार करून शिक्षणपद्धति बसवावी लागते. जें ज्ञान केवळ शुद्ध शास्त्रीय स्वरूपाचें आहे, त्या ज्ञानाविषयीं पक्षभेद फारसा उत्पन्न होत नाहीं. परंतु तो मुळींच होत नाहीं असें नाहीं. विशिष्ट ज्ञानामुळें कांहीं विशिष्ट कल्पना ढांसळत असतील आणि त्या कल्पना धरून बसण्यावरच समाजाची संघटित स्थिति अवलंबून असेल तर त्या प्रकारच्या ज्ञानास अडथळा होईल. उदाहरणार्थ, ब्राह्मण हे इतर सामान्य मनुष्यांतूनच, प्रसंगीं अत्यंत कनिष्ठ मनुष्यांतून, निघालेला वर्ग आहे असा ब्राह्मणांचा इतिहाल असला तर त्या प्रकारच्या ज्ञानाच्या प्रसारास ब्राह्मणांच्या हातीं सत्ता असल्यास ब्राह्मण आडवे जातील. जगाच्या उत्पत्तीस ६००० वर्षांपेक्षां किती तरी हजार पटींनीं अधिक काळ लागला असेल या तर्‍हेच्या कल्पना जेव्हां प्रसृत होऊं लागल्या तेव्हां त्यांस ख्रिस्तीसंप्रदाय आडवा जाऊं लागला हें या प्रकारचेंच उदाहरण आहे.

हिंदुस्तानचें शिक्षण कसें असावें? आधुनिक हिंदुस्थानाविषयीं विचार करतांना जेव्हां आपण शिक्षणपद्धतीवर येतों, तेव्हां आपण विशिष्ट प्रकारचें भवितव्य स्वच्छेनें ठरवावयाचें कर्तव्य अंगीकारितों. या बाबतींत आपल्या पुढें पहिला प्रश्न येतो तो हा कीं, हिंदुस्थानचा भावी नागरिक कसा असला पाहिजे? त्याची रूपरेखा ठरली म्हणजे तो माल कसा काढावा तें काढण्याची पद्धति ठरवितां येते. मूर्तीचा नमुना तयार केला म्हणजे छिनीचे ठोके कसे मारावे हें मागाहून ठरतें तर आपण आतां नमुन्याचा विचार करूं.

आम्हांस स्पर्धेंत अपयश आणणार्‍या ज्या किंतूंनीं त्रास दिला त्यांनीं हिंदुस्थानांतील भावी नागरिकांस त्रास होऊं नये, म्हणजे ज्या गोष्टी समाजास हितकर नाहींत तथापि ज्यांचें दास्य आपण केवळ लोकभयास्तव करतों त्या गोष्टींचें दास्य पुढच्या पिढीस करावें लागूं नये ही गोष्ट साध्य होण्यासाठीं आपणांकडून प्रयत्‍न झाला पाहिजे. समाजापुढें जें जयिष्णु ध्येय ठेवावयाचें तें ठेवलें नसलें म्हणजे भाऊबंदकी सुरू होते. दुसर्‍यास लुटावयाची अक्कल संपली म्हणजे लोक एकमेकांस लुटूं लागतात. यासाठीं समाजांतील धुरीणांचें हें नेहमींचें कर्तव्य आहे कीं, समाजास द्रव्य मिळविण्याचे जे मार्ग परिचित नाहींत तिकडे लोकांचें लक्ष ओढावें आणि त्यांची महत्त्वाकांक्षा जितकी व्यापक करतां येईल तितकी करावीं. ती महत्त्वाकांक्षा अशी असावी कीं, तिच्यामध्यें समाजांतील महत्त्वाकांक्षी लोक एकत्र करण्याचा आणि त्यांस समाजाबाहेरील लोकांशीं स्पर्धा करावयास लावण्याचा प्रसंग असावा. जितकी महत्त्वाकांक्षा अधिक विस्तृत होईल तितकी निरनिराळ्या भारतीयांस एकत्र होऊन काम करण्याची इच्छा अधिक होईल आणि घरांतल्या क्षुद्र गोष्टींबद्दलची भांडाभांडी कमी होईल. ही महत्त्वाकांक्षा अधिक वाढण्यासाठीं सर्व जगांत होणारे अनेक व्यापार व पैसे मिळविण्याचीं किंवा मोठेपणास पोंचविण्याचीं अनेक साधनें वगैरे यांच्याकडे लक्ष गेलें पाहिजे. हें लक्ष जावयास अधिक व्यापक चळवळी ज्या ठिकाणीं होत असतील, मोठमोठ्या घडामोडीचीं सूत्रें चालविणारे लोक जेथें असतील, येथल्यापेक्षां अधिक प्रगत अशा संस्था जेथें असतील तेथें गेलें पाहिजे. महत्त्वाकांक्षी हिंदुस्थानास यूरोप, अमेरिका व जपान यांसारख्या ठिकाणचा प्रवास हा अत्यंत अवश्य आहे. त्याशिवाय त्यांस जगांतील स्पर्धेची व्यापक कल्पना येणें शक्य नाहीं.