प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १० वें.
हिंदुस्थानचे बाह्यांवर सांस्कृतिक परिणाम.
आपल्या राष्ट्रानें प्राचीनकाळीं इतर राष्ट्रांवर परिणाम घडविला, त्याचें थोडक्यांत स्वरूप सांगावयाचें म्हणजे असें म्हणतां येईल कीं, बौद्ध संप्रदाय चोहोंकडे पसरून त्यानें पाली भाषेचा आणि उपनिषदांतील तत्त्वज्ञानाच्या एका विकृतीचा प्रसार केला. संप्रदायप्रवर्तनार्थ येथून अनेक लोकांची भिक्षू म्हणून चीन देशांत व तिबेट, सिलोन वगैरे ठिकाणीं जाण्याकडे प्रवृत्ति करून दिली. चित्रकला आणि मूर्तिकर्म हीं पूज्य म्हणून समजल्या जाणार्या पुरुषांच्या आश्रयानें विकास पावत असतात, या नियमानुसार प्रत्येक देशांत यांचा प्रसार व्हावयास बुद्धाचा गौरव कारण झाला. बुद्धाच्या जातकांतून ज्या अनेक कथा आहेत त्या चित्रविषय आणि मूर्तिविषय झाल्या. कांहीं ठिकाणीं आपल्या धर्मशास्त्रांचा आणि त्यांच्या आश्रयानें संस्कृत भाषेचाहि प्रसार झाला. आपलें वैद्यक सिलोन व इतर पुष्कळ ठिकाणीं गेलें. वाङ्मयाचे अनेक प्रकरा आपल्या देशांत जन्मास आले, त्यांचाहि परिणाम अनेक ठिकाणीं झाला. आपल्या देशांतील संस्कृतीच्या ज्या भागांस सर्व जगाच्या इतिहासाच्या दृष्टीनें महत्त्व आहे ते भाग प्रमुखत्वानें म्हटले म्हणजे आपलें शास्त्रीय वाङ्मय, आणि आपला पारमार्थिक व तात्विक विचार हे होत. काव्यें, नाटकें, अलंकारशास्त्र यांचा परिणाम कांहींसा झाला आहे; पण तो तात्विक विचाराच्या परिणामाच्या मानानें फार अल्प आहे. या सांगितलेल्या परिणामांच्या दृष्टीनें पाहतां आपल्या विचारास आणि त्याच्या इतिहासास सार्वलौकिक महत्त्व आलें आहे. यासाठीं आपल्या विचारौघाचा क्रम आपणास चांगला समजला पाहिजे आणि म्हणून तद्विषयक वाङ्मयाचा आमच्याकडून चांगला अभ्यास झाला पाहिजे.
बौद्ध वाङ्मयानें पूर्वेकडे श्रद्धापूर्ण सेवक व अभ्यासक मिळविले. त्याचे परिणाम पश्चिमेकडे पूर्वेइतके झाले नाहींत, तरी मुळींच झाले नाहींत असें नाहीं. पश्चिमेकडे पारमार्थिक उपदेशाच्या बाबतींत भारतीय विचाराशीं स्पर्धा करणारे कांहीं संप्रदाय होतेच. गौतमाच्या जन्माचा परिणाम त्या संप्रदायांचें अस्तित्व असूनहि झाला. पारशांच्या पवित्र ग्रंथांत गौतमाचा उल्लेख आला आहे. झरथुष्ट्राचा संप्रदाय एका कालीं पश्चिम एशियांत बराच शक्तिमान होता असें दिसतें. ग्रीकांवर जशी भारतीयांच्या कलाकौशल्याची, शौर्याची, आणि त्याप्रमाणेंच आचारश्रेष्ठतेची छाप पडली तशी कांहीं अंशीं पर्शूंच्या उपासनापद्धतीची छाप पडली. झरथुष्ट्राच्या संप्रदायग्रंथाचा शोध प्रथम यूरोपीय लोक करूं लागले तो त्यांत कांहीं अपूर्व ज्ञान सांपडेल या भावनेनें करूं लागले. झरथुराष्ट्राच्या ज्ञानीपणाबद्दल तारीफ यूरोपांत प्राचीन कालापासून फार पसरली होती. यामुळें जेव्हां त्याचे ग्रंथ प्रत्यक्ष लोकांच्या समोर येऊन त्यांतील सामान्यपणा आणि अर्वाचीनांस बाष्कळ वाटणार्या गोष्टी त्यांस दिसल्या तेव्हां हे ग्रंथ झरथुष्ट्राचे नव्हतच असें ते म्हणूं लागले. हा झरथुष्ट्राचा संप्रदाय स्थापन होण्यांत भारतीय संस्कृतीचा संपर्क कोठवर कारण झाला हें अजून नक्की समजलें नाहीं.
ख्रिस्ती संप्रदायाची मात्र तशी गोष्ट नाहीं. ख्रिस्ताविषयीं उत्पन्न झालेल्या आणि शुभवर्तमानांतून व्यक्त झालेल्या कथांचें सादृश्य बौद्ध कथांशीं बरेंच दिसून आलें आहे. तथापि त्या सादृश्यावरून ऐतिहासिक निर्णय काढण्याच्या बाबतींत बराच मतभेद आहे. ख्रिस्तानें आपला उपदेश बौद्ध ग्रंथांतून घेतला आणि ख्रिस्ताची गोष्ट बौद्ध ग्रंथांवरून सजविली असें म्हणणार्या वर्गापासून बौद्ध ग्रंथांतील गोष्टीच नंतरच्या आणि ख्रिस्ती संप्रदायाचा प्रसार होऊं लागला असतां बौद्धांनीं सजविलेल्या आहेत असें म्हणणार्या पक्षापर्यंत भिन्न भिन्न मतें व्यक्त झालीं आहेत. त्यांचें साग्र विवेचन पुढें येईल.
ख्रिस्ती संप्रदाय बाजूला ठेवला तरी शामनिझम् म्हणून सैबेरियांतील वन्य लोकांत तसेंच तार्तरीच्या कांहीं भागांत जी परमार्थसाधनाची रूढ पद्धति आहे ती बौद्ध संप्रदायांतून निघालीं असें म्हणतात. शामन् म्हणजे श्रमण. त्यांचा संप्रदाय तो शामनिझम्. आज मात्र या संप्रदायांत भुतेंखेतें आणि तिबेटी मतें व सैबेरियांतील छाछू करणार्या मूळ लोकांची कर्में यांचें मिश्रण होऊन त्याला अगदींच निराळें स्वरूप प्राप्त झालें आहे. तसेंच, मध्य एशियामध्यें जो मणिसंप्रदाय स्थापन झाला व जो युरोपांतहि थोडाबहुत पसरला होता, त्यांतहि ख्रिस्ती व झरथुष्ट्री यांजबरोबर बौद्ध मतांचें एकीकरण झालेलें होतें.
एवढें मात्र सांगितलें पाहिजे कीं, बौद्धसंप्रदायाचा तुरळक प्रसार आणि त्याचा इतर संप्रदायांवर परिणाम या दृष्टीनें मात्र भारतीय संस्कृतीचा पश्चिमेकडे परिणाम झाला. पूर्वेकडे मोठमोठीं राष्ट्रें व हजारों मैल प्रदेश ज्याप्रमाणें या आमच्या बौद्ध संप्रदायानें व्यापिला त्याप्रमाणें पश्चिमेकडे त्यास यश आलें नाहीं.
आमच्या वाङ्मयाच प्रारंभ वेदांपासून होतो. बौद्धसंप्रदाय हा वैदिक परंपरेचीच एक विकृति आहे, हें सांगितलेंच आहे. हा संप्रदाय पूर्वेकडे गेला तसे वेद तिकडे गेले नाहींत. वेदांकडे लक्ष पाश्चात्यांचें वेधलें आणि वेदांचा श्रद्धापूर्वक अभ्यास करणारे पाश्चात्यांत निघाले. आज हिंदुस्थानांत कांहीं लोकांनीं वेदाक्षरें घोकलीं आहेत; कांहीं लोकांनीं संहिताच्या संहिता पाठ केल्या आहेत; तथापि वेदांचा सूक्ष्म अभ्यास यूरोप व अमेरिका येथेंच होतो.
या दृष्टीनें यूरोपीय पंडितांचा परिश्रम आपणांस उपयुक्त आहे. त्यांच्या परिश्रमाचा इतिहास थोडाबहुत मनोरंजक आहे. त्यांस परिश्रम करण्यास जी स्फूर्ति अगर प्रवृत्ति झाली तिचीं कारणें तीन चार आहेत. ख्रिस्ती संप्रदायाचें संवर्धन करण्यासाठीं ज्या लोकांत संप्रदायाचा प्रसार करावयाचा त्यांच्या मनावरील पूर्वसंस्काराची ओळख करून घेणें संप्रदायाच्या प्रवर्तकांस अवश्य वाटलें. त्यामुळें कांहीं भारतीय पांडित्याचा उगम झालेला आहे. रॉजर ह्याक्सलेडेन आणि पौलिनो यांचे परिश्रम या वरील हेतूनेंच झालेले दिसतात. संस्कृत अभ्यासाकडे प्रवृत्ति होण्याचें दुसरें कारण शासनविषयक होय. हिंदुस्थानांत इंग्रजांचें राज्य सुरू झालें आणि हिंदुंच्या शासनसाठीं त्यांच्या कायद्याचें ज्ञान मिळविणें आवश्यक झालें. वॉरन हेस्टिंग्जच्या प्रोत्साहनानें हालहेडचे आणि तदनंतर जोन्स आणि कोलब्रूक यांचे परिश्रम या चोदनेनेंच झाले. हिंदुस्थानांतील अनेक इंग्रज पंडितांच्या परिश्रमाच्या बुडाशीं हाच हेतु होता.
फ्रान्स आणि जर्मनी येथें जे परिश्रम झाले त्यांच्या मुळाशीं भिक्षुकी किंवा राजकीय भावना प्रामुख्यानें दिसत नाहीं तथापि त्यांचा पूर्ण अभावहि आरोपितां येत नाहीं. जर्मनींतील पांडित्या फ्रेंच पांडित्याचें परिणत स्वरूप होय. उच्च प्रकारचें पांडित्य बर्नाफनें जसें प्रथम दाखविलें तसें कोणाहि इंग्रजानें दाखविलें नाहीं. आंकेति द्यु पेराँ या फ्रेंच पंडितानें इराणी संस्कृतीच्या अभ्यासास सुरुवात केली आणि तेव्हांपासून इराणी संस्कृतीवर जे महत्वाचे ग्रंथ पाश्चात्यांकडून तयार झाले त्यांत इंग्लंडातील विद्वनांच्या परिश्रमाचें फारसें महत्त्व नाहीं. जोरदारपणाचें, चिकाटीचें आणि चिकित्सक बुद्धीचें अस्तित्व फ्रेंच, डच आणि जर्मन ग्रंथावरून जसें दिसून येतें तसें इंग्रजी ग्रंथावरून दिसून येत नाहीं.