प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण ८ वें.
वेदप्रवेश-वेदांगें.
 
कल्पसूत्रें (श्रौत, गृह्य, धर्म).- प्राचीन सूत्रग्रंथांतील विषय व ब्राह्मणें आणि आरण्यकें यांमधील विषय एकच आहे म्हणून या ग्रंथांचें विशेष साम्य आहे. ऐतरेय आरण्यकांत असे पुष्कळ भाग आहेत कीं, त्यांस जवळजवळ सूत्रेंच म्हणतां येईल. हे भाग आश्वलायन व शौनक सूत्रकारांनीं लिहिले आहेत अशी परंपरा आहे. {kosh Max Muller, History Of Ancient Sanskrit Literature पान ३१४ व ३३९ पहा.}*{/kosh} सामवेदाचे कांहीं ग्रंथ ब्राह्मण या संज्ञेनें प्रसिद्ध आहेत, पण ती संज्ञा चुकीची आहे. कारण वास्तविक ते सूत्रग्रंथ आहेत. त्यांतील विषयांचें परीक्षण केलें असतां या ग्रंथांचा वेदांग वाङ्मयांत समावेश करावा लागतो. ब्राह्मणांतील प्रतिपाद्य विषय समाविष्ट केलेले कल्पग्रंथ ते वेदांगें होत. यांत यज्ञविधींचे संगतवार वर्णन दिलेलें असतें. या ग्रंथांस कल्पसूत्रें असें म्हणतात. ऋत्त्विजांच्या सोयीकरितां व यज्ञयागादि नियमांचें मंत्र ध्यानांत ठेवण्यास सुलभ जावें म्हणून थोड्या सांकेतिक शब्दांत पद्धतशीर रीतीनें केलेलीं सूत्रें अतिशय जरूर भासल्यामुळें हे ग्रंथ लिहिण्यांत आले. ब्राह्मणांत सांगितलेले श्रौतसंस्कार किंवा दररोज व्यवहारांत लागणारे गृह्यसंस्कार किंवा विधी ज्या कल्पसूत्रांत आले असतील त्यांस विषयानुसार श्रौतसूत्र किंवा गृह्यसूत्र अशी संज्ञा प्राप्त होते.

श्रौतसूत्रांत तीन अग्नींवर करावयाचीं कार्ये व त्यांचे मंत्र दिलेले आहेत व तसेंच अमावास्येस व पौर्णिमेस करावयाच्या इष्टी, ऋतुयज्ञ, पशुयज्ञ व निरनिराळ्या तर्‍हेचें सोमयज्ञ यांना आवश्यक असे मंत्र दिलेले आहेत. भारतीय यज्ञसंस्काराची माहिती मिळविण्यास हे ग्रंथ फार उपयुक्त आहेत पण धर्मेतिहासाच्या दृष्टीनें तर ते विशेषच महत्त्वाचे आहेत. {kosh श्रौतसूत्राचें पाश्चात्त्य भाषांत भाषांतर अजून झालेलें दिसत नाहीं तरी पण कांहीं भागांचें भाषांतर खालील पुस्तकांत दिलेलें आहे. Hillebrandt Das altindichse Neu-und Vollmoud opfer Jena १८७९; Julius Schawb, Das altindische Treopfer Erlangen १८८६. संपूर्ण कल्पवाङ्मयांतील श्रौत व गृह्य सूत्रांतील विधींचें मुक्य वर्णन सविस्तर रीतीनें खालील पुस्तकांत दिलें आहे. A Hillerbrandt in the Grundriss Vol III Book. २. (Ritual-Litterature Vedische opfer und Zauber strassburg १८९७) खालील ग्रंथांत श्रौतसूत्रांचें धर्मशास्त्रदृष्टया महत्त्व मानलें आहे. H. Hubert and M. marss in their Essai sur la nature et la function du sacrifice” (Annee Sociologigue Paris १८९७-१८९८ pp. २९, १३-८.}*{/kosh} श्रौतसूत्रांचें जनकत्व त्रयीकडे जातें व गृह्यसूत्रांचें अथर्ववेदाकडे जातें.

गृह्यसूत्रांतील विषय विविध असून फार मनोवेधक आहेत. {kosh खालील प्रतींत गृह्यसूत्रांचें भाषांतर दिलेलें आहे व त्यामुळें तीं चांगलीं समजतात. Indische Hausregein, published in Sanskrit & German by A. F. Stenzler. I. Acvalayan Leipzig १८६४-६५. II Paraskara-Leipzig १८७६ & १८७८. (Abhandlungen fur die Kundedes Morogenlandes III, IV & VI). The शांखायनगृह्य(Sanskrit & German) by H. Oldernberg (in Vol १५ of the Indische Studien). Frudrich Knauer याचें the Gobhilagirhya sutra. Dorpat १८८४ & १८८६. Cf. also M. Bloomfled Das Grhyasamgraha Paricishtades Gobhilasutra (in Z. D. M. G. Vol XXXV and P. V. Bradke ubar das Manava-grihya sutra (in Z. D. M. G. Vol XXXVI). गृह्यसूत्राचें इंग्रजी भाषांतर H. Oldenberg नें Sacred Books of the East” Vols २९ & ३० मध्यें दिलें आहे.}*{/kosh} भारतीय लोकांच्यां एकाग्नीवरील गृह्य विधींची व जुन्या चालीरीतींची माहिती या सूत्रांत दिली आहे. जन्मसंस्कारापासून तों अंत्यसंस्कारापर्यंतचे सर्व तर्‍हेचे संस्कार या सूत्रांत दिलेले आहेत. कांहीं सूत्रोक्त संस्कार आजपर्यंत चालू आहेत आणि कांहीं (शूलगव, मांसमधुपर्क इ.) नष्ट झाले आहेत.

गर्भाधान, पुंसवन, अनवलोभन, सीमंतोन्नयन, जातकर्म, नामकरण, निष्क्रमण, अन्नप्राशन, चौल, उपनयन, वेदारंभ, उपनिषद्व्रत, समावर्तन, प्रणय व विवाह वगैरे विधी गृह्यसूत्रांत दिलेले आहेत. शतपथ ब्राह्मणांत (११.५, ६.) कथन केलेले पंचमहायज्ञ सविस्तर रीतीनें गृह्यसूत्रांत दिले आहेत. वास्तविक हे पांच यज्ञ म्हणजे प्रत्येक व्यक्तीचीं कर्तव्यें होत. ब्राह्मणांमध्यें यांचें विशेष प्रतिपादन केलेलें आहे. प्रत्येक घरांतील मोठ्या मनुष्यानें दररोज हे पंचमहायज्ञ धर्माचरणांचें मुख्य अंग म्हणून केले पाहिजेत. हे रोजचे विधी जरी क्षुल्लक असले व दानें जरी हलक्या प्रतीचीं असलीं तरी त्यांस धर्मदृष्ट्या मोठें महत्त्व आहे. देवयज्ञ, पितृयज्ञ व असुरयज्ञ यांनां फक्त अग्निकुंडांत टाकण्याकरितां समिधा, भाताचे पिण्ड व जल लागतें. चौथा यज्ञ मनुष्ययज्ञ. यांत अतिथीस अन्नदान द्यावें लागतें. पांचवा ब्रह्मयज्ञ. यांत वेदाच्या भागाचें वाचन करावें लागतें. सायंप्रार्यज्ञ, पौर्णिमा व अमावास्येच्या दिवशींच्या इष्टी, वार्षिक यज्ञयागादि महोत्सव गृह्यसूत्रांत दिलेले आहेत. महोत्सवांत अग्निहोत्र, दर्शपूर्णमास व चातुर्मास्य वगैरे येतात. गृह्यबंधन, गोपालन, क्षेत्रकर्मविषयक व तसेच अपशकुन व रोगपरिहारक मंत्र व वशीकरणविद्या वगैरे मंत्रतंत्र या ग्रंथांत दिले आहेत. याशिवाय गृह्यसूत्रांत अंत्यसंस्कार व श्राद्धविधी आहेत. श्राद्धाचें महत्त्व वाढल्यामुळें श्राद्धकल्पें लिहिण्यांत आलीं. {kosh अंत्य संस्कार व प्राचीन भारतीय कल्प वाङ्मयानुसार ठरविलेलें पूर्वकालीन ज्ञान खालील ग्रंथांत चांगलें दिलें आहे. Uber Totenverehrung bei einigen der indogermanischen Voiker  (इंडो-जर्मन लोकांतील ‘अंत्य संस्कार). Amsterdam १८८८. Altindischer Ahnenkult Leiden १८९३. Die Altindischen Todten and Bestattungs-gebrauche, Amsterdam १८९६.}*{/kosh} गृह्यापैकीं बहुतेक भाग अथर्ववेदांतून घेतला आहे आणि कांहीं आरण्यकांतून घेतला आहे.

उच्च वाङ्मय या दृष्टीनें गृह्यसूत्रें जरी कमी प्रतीचे ग्रंथ आहेत तरी प्राचीन भारतीय लोकांच्या जीवनक्रमाविषयीं यांवरुन पुष्कळच ज्ञान मिळतें.

सुधारणेच्या इतिहासाचें संशोधन करणा-यास हे ग्रंथ अमूल्य आहेत. वरील ग्रंथांचें महत्त्व (भिन्न भिन्न ग्रंथांवरुन प्राचीन ग्रीक व रोमन लोकांच्या जीवनक्रमाचा इतिहास शोधण्यास लागणारी मेहनत लक्षात घेतां) सहज दिसून येतें.

भारतीय यज्ञविधी व संस्कार यांचें ज्ञान देणारे हे सूत्रग्रंथ बाह्यतः कितीहि हलक्या प्रतीचे दिसले तरी प्राचीन भारतीय संस्कारांची प्रत्यक्ष रुढ कर्तव्यात्मक माहिती यांत आली आहे, म्हणून या ग्रंथांस प्राचीन भारतीय ऐतिहासिक वाङ्मयांत बरेंच उच्च स्थान देण्यास हरकत नाहीं. प्राचीन भारतीय लोकांचा आचार कसा होता हें या ग्रंथांवरुन चांगलें समजतें. भारतीय लोकांचें सर्वच आचारविचार पारमार्थिक कल्पनांनी बद्ध असल्यामुळें सामान्य ग्रंथ परीक्षकास भारतीयांची सामान्य प्राचीन संस्कृति, आचार, वगैरेविषयीं विचार करण्यास हे ग्रंथ फार उपयुक्त आहेत गृह्यसूत्रांत दिलेले मंत्र व विधी यांचें दुस-या लोकांच्या आचारांशीं बरेंच साम्य असल्यामुळें इंडो-जर्मन लोकांच्या मूळच्या चालीरीती त्यांत पहावयास मिळतात, म्हणून या ग्रंथांचें विशेष महत्त्व आहे. गृह्यसूत्रांतील विवाहसंस्कार व विधी व इतर इंडो-जर्मन (आर्यन्) लोकांतील म्हणजे ग्रीक, रोमन, जर्मन व स्लाह्व लोकांतील लग्नविधी यांचें साम्य पाहिलें म्हणजे या लोकांचें नुसतें भाषासादृश्यच होतें असें नाहीं तर या लोकांचें नुसतें भाषासादृश्यच होतें असें नाहीं तर या लोकांचें आचारविचारांचेंहि सादृश्य होतें असें पटतें व इतर प्रागैतिहासिक काळची माहिती कल्पावयास मिळते. {kosh Cf. E. Hass and A. We ber, Die Heiratsgebrauche der alten Inder, nach den Grihyasutra (गृह्यसूत्रानुसार प्राचीन भारतीय विवाहसंस्कार). (in the fifth volume of the “Indische Studien”). L. V. Schroeder, Die Hochzeitsgebrauche der Esten and einiger andereer finnischugrischer Volkar-Schaften in Vergleich mit deren der indogermanischen Uolker (इंडोजर्मन लोकांच्या विवाह रीतींशीं एस्थोनिअन आणि दुसरीं कांहीं फिनिश-डगोंनियम राष्ट्रे यांच्या विवाहरीतींची तुलना) Berlin १८८८. B. W. Leist, Altarische ugusg entium. Jena. १८८८, M. Winternitz Das altindische Hochezeitsritunell nach dem Apastambiya Grihyasutra and einigen anderen Verwandten werken. Mit vergleichung der Hochzeits gebrauche bei den ubrigen indogermanischen Volkern (आपस्तंबीय गृह्यसूत्र व इतर पुस्तकानुसार प्राचीन) भारतीय विवाह संस्कार. इतर हिंदू-जर्मन लोकाच्या विवाह संस्कारांशीं तुलना (Denkschriften der Kais Akademie der Wessenscheaften in Wien Phil-Hist. Kl. Vol XL Vienna १८९२) M. Winternitz,  भारतीय व युरोपीय आचारांची तुलना व विशेषतः विवाह संस्कारांची तुलना. (The internatonal Folk-lore Congress १८९१, papers and Transactions. London १८९२, pp. २६७-२९१). O. Sehroder, Reallexikon der indogermnaischen Altertumskunde, Strassburg १९०१. P. ३५३ &c. Th. Zachariae, Zum altindischen Hochzeitsrital (in the Wiener Zeitschrift) Fur die Kunde des Morgenlandes, vol XVII p. १३५ & २११ &c}*{/kosh}

गृह्यसूत्रांच्या तोडीचेच आणखी तिस-या तर्‍हेचे ग्रंथ आहेत. यांचा संबंध गृह्यसूत्रांशीं बराच आहे, कारण सूत्रग्रंथांतील मंत्रांचेंच स्पष्टीकरण या ग्रंथांत आहे. या ग्रंथांस धर्मसूत्रें म्हणतात. या ग्रंथांत धर्माविषयीं माहिती असल्यामुळें यांनां धर्मग्रंथ म्हणतात. धर्म या शब्दांत न्यायतत्त्वें, कर्म, स्मृती, विधी, चारहि वर्णाचें आचार वगैरेंचा समावेश होतो. हिंदुस्थानांत या धर्मसिंधूंतून व्यावहारिक न्यायतत्त्वें व धार्मिक म्हणजे नैतिक व आध्यात्मिक तत्त्वें लिहिलेलीं आहेत. या सर्व तत्त्वांचा एकच ग्रंथ असतो. निरनिराळ्या विषयांचे निरनिराळे ग्रंथ सांपडत नाहींत. यांत चतुर्वर्णांचे नियम, धर्म व तसेच आश्रम वर्णिलेले असतात. या ग्रंथांचा आधार घेऊन उत्तरकालीन ब्राह्मणांनीं आपल्याला हितावह असे प्राचीन भारतीय नियम, विधी, संस्कार वगैरे बदलले व आपला पगडा चोहोंकडे बसविला असा त्यांवर आक्षेप आहे. धर्मसूत्रांचा सविस्तर विचार आपण धर्मयवाङ्मयाचा विचार करतांना करूं. धर्मसूत्रांचा या ठिकाणीं उल्लेख करण्याचा प्रसंग एवढाच कीं, वेदशाळेंतच गृह्यसूत्र व श्रौतसूत्राप्रमाणें यांचाहि उगम झाला. धर्मसूत्रें कल्पसूत्रांचाच एक भाग आहे.

शुल्बसूत्रांचाहि कल्पसूत्रांतच समावेश होतो. यांचा श्रौतसूत्रांशीं विशेष संबंध दिसतो. महत्त्वमापनाचे नियम, वेदीची रचना व अग्निकुंडाची रचना या ग्रंथांत दिली आहे. शुल्ब याचा अर्थ मोजण्याची काठीं. शास्त्रांच्या इतिहासाच्या दृष्टीनें भारतीय भूमितीवरचे हे अतिप्राचीन ग्रंथ फार महत्त्वाचे आहेत.

वेदांचा अर्थ लावण्यास श्रौत व गृह्यसूत्रांचा फार उपयोग होतो, यामुळें त्या ग्रंथांस विशेष महत्त्व आलें आहे. यांत नुसते यज्ञयागादिकांचे नियमच नसून मंत्रांचे विनियोगहि दिलेले आहेत. वैदिक संहितांतून दिलेले मंत्र या सूत्रग्रंथांत घेतलेले आहेत व कोणकोणत्या यज्ञाच्या वेळीं कोणकोणते मंत्र म्हणावयाचे हे सर्व सविस्तर रीतीनें सांगितलेलें आहे.

तथापि पुष्कळ मंत्र असे आहेत कीं, त्यांचा यज्ञाशीं बिलकुल संबंध नसतो. कित्येक ठिकाणीं एखादें कार्य साधण्याकरितां ज्या मंत्रांचा उपयोग केलेला दिसतो त्या कार्याशीं त्यांचा बिलकुल संबंध नसतो. कांहीं प्रसंगीं मंत्रांचा अर्थहि भलताच केलेला व त्यांत वाटेलतसा फेरबदल केलेला सांपडतो. परंतु एकंदरींत विधिनिषेधांचा इतिहास समजण्यास हे मंत्र अतिशय उपयुक्त आहेत. मंत्रांच्या विनियोगानें वेदांतील कठिण भाग समजण्यास सुलभ जातात. हे ग्रंथ म्हणजे वेदग्रंथांची एक प्रकारें किल्लीच आहेत.