प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २८ वें.
समाजनियमनात्मक विचार.

कायदेपद्धतातील अंतर्भूत गोष्टी.- कायदेपद्धतीच्या इतिहासांत ज्या ज्या गोष्टींचें विवरण केलें जातें त्या गोष्टींचें स्वरूप येणेंप्रमाणें:-
 
(१) कायदा उत्पन्न कसा होतो ? या प्रश्नाचें उत्तर तो पूर्वीं दिलेल्या निवाड्यांच्या संचयानें उत्पन्न होतो असें देण्यांत आलें आहे.

(२) कायदा लेखस्वरूपांत वाढत कसा जातो ? पुष्कळ प्रकारची परिस्थिति उत्पन्न झाली, म्हणजे त्या परिस्थितीविषयीं योग्यायोग्य विचार लोकांच्या मनांत येतात आणि त्यामुळें कांहीं चालीरूढी उत्पन्न होतात. न्यायाधीश त्या चालीप्रमाणें निकाल देऊं लागला म्हणजे तो ती चाल मान्य करतो. म्हणजे जी आज चाल अगर रूढी आहे ती उद्यां कायदा बनते.

(३) कायदा दुस-या कोणत्या कारणांनी विकास पावतो ? कधीं कधीं कायदा अन्य जनतेंत उत्पन्न होतो आणि तो पुढें उचलला जातो.

(४) एका परिस्थितींत उत्पन्न झालेला नियम अन्य परिस्थितींवर कसाबसा बादरायण संबंध लावून लागू करण्यांत येतो. या प्रकारच्या बादरायणसंबंधास इंग्रजींत ''लीगल फिक्शन्स'' म्हणतात.

(५) कायदा पारमार्थिक विधींतून व कल्पनांतून कितपत उत्पन्न झाला हाहि एक कायदेशास्त्राच्या ऐतिहासिक अभ्यासकांचा विषय आहे. उदाहरणार्थ पिंड देण्याचा अधिकार कोणाला आहे याचा निर्णय करावयाचा आणि त्यावर इस्टेट कोणाला द्यावयाची हें ठरविण्याचा प्रकार हा वैधसृष्टींतून व्यवहारसृष्टींत आलेल्या नियमामध्यें घालतां येईल.

(६) दोन भिन्न कायदेपद्धतींचा एकमेकांशीं संपर्क झाला म्हणजे कायद्याची स्थिति कशी होते हाहि इतिहास पंडितांच्या आवडीचा विषय आहे.

(७) कायदा हा केवळ राजसत्तामूलक आहे काय ? या विषयीं चर्चाहि बरीचशी कायद्याच्या वाङ्मयांत सांपडेल.

(८) समाजांची निरनिराळ्या काळची परिस्थिति, निरनिराळी कायदेपद्धति व नीतिविचार कसे उत्पन्न करते, एके ठिकाणीं बहुपत्नीकत्व अमान्य कां व दुस-या ठिकाणीं बहुपतिकत्व मान्य कां आहे याचें विवरण करणें यासारखे समाजशास्त्रीय विषय देखील कायद्याचा ऐतिहासिक दृष्टीनें विचार करण्यास घेतात.

(९) शासनसंस्थांचा आणि कायदेपद्धतींचा इतिहास यांचा निकट संबंध असल्यामुळें या दोहोंचा अभ्यास पुष्कळदां एकत्र करावा लागतो. राजानें निवाडे करणें हें केव्हां पासून सुरू झालें, वैरदेयाची वैदिक कल्पना काय आहे, तिचा प्रचार शिशुस्थितींत असलेल्या समाजांत कां व कितपत आहे याचाहि विचार वारंवार अवश्य होतो.

यूरोपचा कायदा हा हळू हळू जगांत चोहोंकडे प्रसृत होत चालला आहे. चिनी व जपानी राष्ट्रें देखील हा कायदा घेऊं लागलीं आहेत. जीं राष्ट्रें स्वतंत्र आहेत तींच इतःपर समाजनियमशास्त्रांत भर टाकतील; अन्य राष्ट्रें टाकुं शकणार नाहींत.