प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २८ वें.
समाजनियमनात्मक विचार.
प्राचीन कायदे पद्धती.- जगांत आजपर्यंत मोठमोठीं साम्राज्यें अनेक होऊन गेलीं. इराणी साम्राज्य बरेंच मोठें होतें. पण त्याची कायदेपद्धति चिरकालीन झाली नाहीं याचें कारण त्या राष्ट्राचा किंवा साम्राज्याचा महंमदीय अरबांकडून पाडाव झाला हें होय. हिंदूंच्या कायदेपद्धतीचा जावा, सिलोन, ब्रह्मदेश, कांबोडिया (कांबोज) पर्यंत परिणाम झाला. सत्तावर्धनांत हिंदूचें राष्ट्र जरी फारसें यशस्वी नसलें तरी संस्कृतिप्रसाराच्या कामीं आपल्या पूर्वजांचें एके काळीं महत्त्व कसे होतें हे मागें पहिल्या विभागांत सविस्तर वर्णिलें आहे आणि प्रत्येक ठिकाणी हिंदू कायद्याचा अंश तेथें कितपत जिवंत आहे हेंहि सांगितलें आहे. त्या विवेचनांत असें दिसेल की चीनमध्यें भारतीय धर्मशास्त्र किती गेलें आहे याची माहिती नाहीं पण पूर्वेकडील अनेक देशांत किती गेले याची माहिती सविस्तर देतां येते.
गेल्या पंचवीसशें वर्षांचा समाजनियमनाचा स्थूल इतिहास येणेंप्रमाणें देतां येईल.
हमुरब्बीचा कायदेग्रंथ जरी आज आपणांस उपलब्ध आहे आणि जरी त्याच्या अवलोकनानें अपणांस असें दिसून येते की निश्चित समाजनियम करण्यांत भारतीयांपेक्षां हमुरब्बीस श्रेष्ठत्व आहे तरी त्याची कायदेपद्धति फारशी टिकली नाही. पारशी साम्राज्याच्या वेळेस कायदेपद्धति कशी होतीं याची आपणांस फारशी माहिती नाहीं. त्या काळची कायदेपद्धति मुसुलमानी अमलानंतर अस्तंगत झाली. ग्रीकांची कायदेपद्धति जवळ जवळ नष्ट झाली. रोमन लोकांच्या कायदेपद्धतीत ''जसे जेन्शिअम'' हे जेव्हां तयार होऊं लागलें तेव्हां कांहीं ग्रीकांच्या रीतीभाती कायदा म्हणून रोमन साम्राज्यांत आल्या असाव्यात आणि त्यांचा कायदा म्हणून चोहोंकडे प्रसार झाला असावा. ब्रेहॉन म्हणून जे आयर्लंडमध्यें कायदेपंडित होते त्यांचा कायदा तर अस्तंगत झाला आहे. ख्रिस्ती संप्रदायाबरोबर जे विधिनिषेधात्मक नियम निर्माण झाले ते नियम यूरोपावर बरेच परिणामकारी होऊन कायद्यांत शिरले.
जेव्हां कांहीं नवीन सामाजिक स्थिति निर्माण होते तेव्हां त्याविषयीं कांही नियमहि तयार होऊं लागतात आणि जेव्हां कमी प्रगत समाज अधिक प्रगत समाजांच्या सदृश होऊं लागतात तेव्हां ते अधिक प्रगत समाजाची पूर्वानुभूत कायदेपद्धतीहि उचलूं लागतात असें आपणांस दिसून येईल. अमेरिकेंत मोठमोठे व्यापारी संघ आज उत्पन्न झालें आहेत. इतर देशांत तसेच संघ तयार होत आहेत. अशा प्रसंगीं अमेरिकेच्या संघविषयक कायद्याचें यूरोपियन जगाकडून अनुकरण होत आहे यांत कांहीं नवल नाही.