विभाग पंधरावा: तपून - धमन्या  

तिरगुळ — हे यजुर्वेदी, तैत्तिरीय आपस्तंब ब्राह्मण असून यांची वस्ती मोंगलाईंत  व महाराष्ट्रांत (सोलापूर, नगर, पुणें, सातारा या जिल्ह्यांत) विशेष आहे. यांचा मूळ देश तेलंगण (राजमहेंद्री, मच्छलीपट्टण व महादेवपुर) असून हे आपला मूळदेश सोडून वर सांगितलेल्या भागांत पसरले. यांची मूळची भाषा तेलगु असून इकडे आल्यानंतर कानडी व कुणबाऊ मराठी या भाषा यांनी उचलिल्या. जातिनिर्णयात्मक प्राचीन ग्रंथात तिरगुळ शब्द कनिष्ठजातिदर्शक सांपडतो. पद्मपुराणांत ''चौल त्रिगुड सौपरा:'' यांना पंक्तिदूषक ब्राह्मण म्हटलें आहे. रा. राजवाडे यांच्या मतें, त्रिगुड म्हणजेच (त्रैकूटक=त्रिगुडअ=त्रिगुड=तिरगूळ) हल्लीचे तिरगुळ असून ते (पद्मपुराणकारांच्या मतानें) दुष्टाचारवान ब्राह्मण असल्यानें पंक्तिदूषक होते. (भा.ई.सं.मं इतिवृत्त, १८३६. पृ.२२)

हे लोक आपला मूळ देश सोडून इकडे आल्यानंतर त्यांची संख्या थोडी असल्यामुळें व बरोबर उपाध्याय वर्ग नसल्यामुळें इकडील ब्राह्मणांशीं त्यांचा प्रथम अन्नव्यवहार होत असावा. परंतु पुढें यांनीं पानमळ्याचा धंदा उचलल्यानें व खेड्यांत राहून कुणब्याकडेच विशेष लक्ष दिल्यामुळें व हळू हळू आपल्या उपाध्यायास इकडे आणून त्यांच्या कडून धार्मिक कृत्यें करविण्याचा परिपाठ घातल्यामुळे इकडील ब्राह्मणवर्गानें त्यांनां हलकें समजून पंक्तिबाह्य ठरविलें असावें असें दिसतें. महाराष्ट्रांत यांची संख्या एकंदर महाराष्ट्र ब्राह्मणांत शेंकडा पांचांपेक्षांहि कमी असून मुख्य वस्ती मंगरूळ, करकंब, निमगांव, चर्‍होली, परिंचें वगैरे गांवी (ज्या ठिकाणीं पानमळ्याला योग्य अशी जमीन आहे तेथें) आहे. यांना कांही आक्षेपक लोक ते आपल्यांत गोळकांचा समावेश करून घेतात म्हणून 'मिश्र गोळक' (तीन गोळक) मानतात. परंतु तें म्हणणं चुकीचें असावें. रा. वडवळकर म्हणतात कीं अलीकडे कांही गोळक व तिरगुळांचे लेकवळेहि आपणांस तिरगुळ म्हणवूं लागले; त्यामुळे मूळच्या तिरगुळांस हीन लेखण्यांत येऊं लागलें.

अलीकडे शंकराचार्यांनीं (श्रृंगेरी व हंपी विरूपाक्ष) तिरगुळ हे पंक्तिपावन असल्याबद्दलचीं आज्ञापत्रें काढिलीं आहेत. तसेंच यांच्यांत अग्निहोत्री व वैदिक कर्में करणारी घराणीं आहेत. कांही ठिकाणीं यांच्या घराण्यांचा इतर ऋग्वेदी घराण्यांशीं शरीरसंबंध घडल्याचींहि उदाहरणें आहेत. महाराष्ट्रांतून मोंगलाईंत गेलेले हल्लींचे सुशिक्षित तिरगुळ येथील जुन्या तिरगुळांशी, हे ब्राह्मण नाहींत असें म्हणून पंक्तिव्यवहार करीत नाहींत.

यांच्यांत भेंडसूर, नारकर, शेंदरकर, राडकर, कमठाण, तबडे, धर्म, वडवळकर, कानडे, म्हात्रे, अरणकल्ले, बिचिले, बाब्रस वगैरे आडनांवे आहेत. गांवास कर हा प्रत्यय लावून जशीं मराठी आडनांवे बनतात तशीं 'रम' हा प्रत्यय लावून यांची आडनांवें बनली आहेत; उदा. बाबीचे बाब्रस; हंपीचे हंप्रस.

तिरगुळ या शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल अनेक तर्क आहेत. उदाहरणार्थ तेलंगणांतील त्रिगळप्रांतावरून हें नांव पडले; एका ब्राह्मणानें ब्राह्मण, क्षत्रिय व कुंभार स्त्रियांशी लग्न केल्यामुळें त्रिकुल या शब्दापासून हा शब्द निघाला; त्रिकूट पर्वतावरून हें नांव पडले; गॅझेटिअरमध्यें तिनगोलतीन पिढ्या गोलक असलेले-अशी व्युत्पत्ति दिली आहे व पेशवांईतील पंढरपुरास पाठविलेल्या गरोदर विधवांची ही संतति होय अशी आख्यायिका म्हणून दिली आहे.

रा. वडवळकर म्हणतात कीं, तित्तिर पक्ष्याच्या रूपानें वेद गिळणारा तो तित्तिरगळू उर्फ तिरगुळ होय. शंकराचार्यांच्या आज्ञापत्रांत त्रिगर्त, त्रिगूळ, त्रिगोळ, त्रिगल, तिगड अशीं नांवे येतात. कानडींत तिरू म्हणजे भटकणारा आणि गळु म्हणजे समुदाय असा अर्थ होता. त्यावरून तिरगुळ म्हणजे भटक्या वर्ग होय अशीहि एक व्युप्‍तत्ति देण्यांत आली आहे. पंरतु हें प्रादेशिक नांव असून त्रिगळ प्रांतावरून पडलें असण्याचा बराच संभव दिसतो. बाकीच्या व्युप्‍तत्तींस दिलेले आधार आम्हांस पुरेसे वाटत नाहींत.

मोंगलाईंत चितापूरची नागम्मादेवी, यादगिरीचा व मैलारचा खंडोबा, बावगी व गिरीचा बालाजी हे यांचे कुलदेव असून यांच्यांत भारद्वाज, वत्स, काश्यप, बादरायण, लुहित वगैरे गोत्रें आहेत. महाराष्ट्रांत हे उपरी असल्यानें यांना वृत्त्या, वतनें किंवा जहागिरी नाहींत. मोंगलाईमध्यें मात्र थोडी फार आहेत.

[संदर्भग्रंथ — सोलापूर ग्याझि; रा. दा. ना. शेंदरकर; शि ग. बाब्रस व रा. दी. ना. वडवळकर यांनी पाठविलेली माहिती.]