पुरवणी खंड : हिंदुस्थानखंड

प्रस्तावना

स्वदेशविषयक ऐतिहासिक वाङ्मयाचा मुख्य उपयोग आजच्या एकंदर व्यवहाराशी नागरिकाचा परिचय करून देऊन त्यास चालू कार्यपरंपरेंत भाग घेण्यास सोपें करावें किंवा जे भाग घेत असतील त्यांशी सहकारिता करण्यास समर्थ करावें हा असतो. भारतीय जनतेचा बाहेरच्या जगाशी संबंध, अत्यंत व्यापकपणें, ज्ञानकोशाचा पहिला विभाग ‘हिंदुस्थान आणि जग’ यांत वर्णिला आहे तर खुद्द भारतीय स्थिति व विकास यांचे सविस्तर अवलोकन या विभागांत केले आहे. भारतीय संस्कृतीचे आद्यवाङ्मय जें श्रुतिस्मृति व इतिहासपुराणें त्याविषयी प्रस्तुत ग्रंथांत विवेचन आहेच. आणि हिंदुस्थानचा इतिहास अत्यंत प्राचीन काळापासून आजतागाईत या ग्रंथांत दिला आहे. तसेंच लोकसमाज, हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व त्याचे शासनसत्तात्मक विभाग व परदेशीय राजकारण ही सर्व या ग्रंथांत दिलीच आहेत. सांपत्तिक स्थिति व हिंदुस्थान सरकारचा सांपत्तिक व्यवहार यांचे समालोचन या ग्रंथांत जितके दिलें आहे तसें इतर कोणत्याहि मराठी ग्रंथांत नसल्यामुळें वाचक वर्गास महत्त्व वाटणार आहे. बौध्दिक प्रगती व आरोग्य यांच्याविषयी तेंच सांगतां येईल.

या मजकुरांत नवें असें कांहीच नाहीं. तथापि या ग्रंथाचें वैशिष्ट्य अत्यंत विविध माहितीच्या एकीकरणांतच आहे. भारतीय समाजशास्त्रविषयक जें प्रकरण यांत आहे त्या प्रकरणांत विचारनावीन्य, त्याप्रमाणेंच निर्णयनावीन्य आणि पध्दतिनावीन्य हीं दिसून येतील. भारतीय समाजाचा ओघ पाहतां त्यांत सामाजिक प्रगतीचे कांही विशिष्ट नियम दिसून येतात. व समाज आपली प्रगति आपल्याच पध्दतीने करीत आहे आणि सामाजिक सुधारणेची व सामाजिक प्रगतीची कल्पना नवीन नाहीं इत्यादि गोष्टी वाचकांस सहज पटतीलच.

शेवटच्या प्रकरणात गेल्या आठ वर्षांचा राजकीय प्रगतीचा आढावा घेतला आहे. लोकांस जसजसे अधिकाधिक अधिकार मिळतात तसतसे राजकारण प्रपंचात जास्त लोक पडतात आणि त्यामुळें समाजास नेतृत्वहि अधिक विविध मिळतें. पक्षांचा उपयोग हा असतो कीं, निरनिराळ्या विचारपध्दतीस व निरनिराळ्या हितसंबंधास संघीभूत होण्याची संधि मिळते व त्या संघामार्फत आपल्या विचारपध्दतीचा राजशासनावर परिणाम घडविण्यास किंवा आपल्या हितसंबंधांचें संरक्षण करण्यास सवड मिळते. हें संघीकरण समाजांत चालू असतां निवडणुकीच्या प्रसंगी ज्या दोस्त्या कराव्या लागतात त्यामुळे सर्व समाजांतील बहुविध व्यक्तीस जागृति मिळते. व आपल्या हितसंबंधांसाठी हातपाय हलविण्याची शक्ति उत्पन्न होते. हा सामाजिक परिणाम नवीन राजकारणानें उत्पन्न झाला आहे खचित; व हा परिणाम वाढत जाणार आहे.

प्रस्तुत ग्रंथ व ‘हिंदुस्थान आणि जग’ हा विभाग हीं दोन पुस्तकें वाचलीं असतां भारतीय नागरिकत्व व हिंदुसमाजाचें नागरिकत्व या दोन्ही दृष्टींनीं लोकांची तयारी होण्यास मदत होईल.

हिंदुस्थानचें एकीकरण व्हावें व एकराष्ट्र व्हावें यासंबंधानें लोकमत वाढत चाललें आहे. पण हें राष्ट्र कसें बनवावयाचें यासंबंधानें हिंदुस्थानचें मन अजून तयार झालें नाहीं. हिंदुसमाजांत अंतःसंघटना होऊन तो समाज बाह्यांच्या सात्मीकरणास अनुकूल आणि समर्थ व्हावा या तर्र्‍हेचें सामाजिक ध्येय हिंदूंस अंधुकपणानें दिसूं लागलेसें दिसतें. त्याशिवाय शुध्दिसंघटनाच्या तत्त्वांस जोर मिळाला नसता.

शुध्दिसंघटना यांचे उर्फ समाजांत समानता वाढविण्याच्या चळवळीचें खरें महत्त्व आणि तत्त्व समाजांतील अत्यंत सुशिक्षित वर्गास देखील पूर्णपणें समजल्यासारखें दिसत नाहीं. एकीकडे संघटनेची आवश्यकता बोलावयाची व दुसरीकडे आपापसांतील भेदभाव कायम ठेवण्याकडेच प्रवृत्ति दिसावयाची इत्यादि प्रकार चालू आहेतच. पण ते पाहून निराश होण्याचें कारण नाहीं. संक्रमणावस्थेच्या कालांत हे प्रकार व्हावयाचेच. नवीन तत्त्व समजलें म्हणजे जुनी अंतःकरणें एकाएकीं पालटतात असें होत नाही. जुन्या भेदांचें रक्षण करण्यासाठी जो अट्टहास उत्पन्न होतो तो नवीन प्रवृत्तीच्या जयाचा सूचक आहे. ही गोष्ट लक्षांत ठेवली असतां जुन्या भेदांचा आग्रहानें पुरस्कार करणारीं पण व्यवहारांत मात्र ते भेद न पाळणारी माणसें दिसूं लागली म्हणजे जुने भेद लयास जाऊं लागले आहेत अशीच खात्री पटून मन आशावादी होऊं लागतें.

एकमेकांवरील विश्वास व जें आपलें आहे तें मिळविण्याविषयी धडपड ही वाढूं लागली आहेत. हेंहि परिस्थिति अवलोकन करणारांस दिसून आल्यावाचून राहणार नाहीं.

आपली अंतर्घटना अगोदर करून मग परागंदा झालेल्या आपल्या लोकांविषयीं काळजी करावी असें मत वारंवार मांडण्यांत येतें. पण विकासक्रम पाहतां तो उलट दिसतो. आपल्या विदेशी असलेल्या बांधवांची स्थिति सुधारण्याविषयीं उत्कंठा लोकांत अगोदर उत्पन्न झाली व त्याविषयींच्या प्रश्नास अगोदर महत्त्व मिळाले; व नंतर अंतर्घटनेविषयी जास्त खटपट होऊं लागली; असें म्हटल्यास वावगें होणार नाहीं. तसेंच एकंदर हिंदुसमाजांतील संख्या वाढवावी, व आहे ती रक्षण करावी या भावनेस जोर मिळाल्यावर हिंदुसमाजाची अंतःस्थ स्थिति अधिक सुधारावी या भावनेस जोर अधिक मिळाला. ही परिस्थिति लक्षांत घेतां हिंदुस्थानच्या बाहेरच्या हिंदु जगासंबंधी ग्रंथ अगोदर बाहेर पडावा व हिंदुस्थानविषयक प्रस्तुत ग्रंथ नंतर बाहेर पडावा हा ज्ञानकोशमंडळाचा उत्पादनक्रम अयुक्तिक झाला असें वाटत नाहीं.

भारतीय संस्कृतीचें आद्यवाङ्मय हें प्रकरण ( १ लें, पृ. ४ पासून) मुख्यत: रा.यशवंत रामकृष्ण दाते यांच्या हातचें आहे. रा. चिंतामण गणेश कर्वे यांनीं भरतखंडवर्णन (प्र.२ रें), लोकसमाज (प्र.४ थें), सांपत्तिक स्थिति (प्र. ७ वें) व सद्यःस्थिति व स्वयंशासन (हें शेवटलें प्रकरण) हे विषय मुख्यतः तयार केले आहेत. रा. आबा चांदोरकर यांनीं हिंदुस्थानचा इतिहास (प्र.३ रें) लिहिला आहे. रा. लक्ष्मण केशव भावे यांनी बौध्दिक प्रगति (प्र.८ वें) व आरोग्य (प्र. ९ वें) हीं प्रकरणें मुख्यतः तयार केलीं व रा. वामन त्र्यंबक आपटे यांनीं
हिंदुस्थानची राज्यव्यवस्था (प्र. ५ वें) हा भाग लिहिला आहे.

- श्री. व्यं. केतकर