प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ४ थे.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति- कालगणना,
आणि तीसाठी प्रारंभबिंदूची योजना.

हिंदुस्थानांतील चांद्र व सौर वर्षे:- मनुष्य सुशिक्षित होऊन कालगणना करूं लागल्यानंतर त्याला एक क्रिया करावी लागते ती ही कीं, दुसर्‍या लोकांच्या कालगणना आपल्या कालगणनेशीं मिळत्या करून घेणें. कालगणनेमध्यें वर्षें किंवा मास मोजण्यास अगोदर सुरूवात झाली आणि प्रारंभबिंदू मागाहून उत्पन्न झाले. दोन कालगणनांची जुळवाजुळव करावयाची, या बाबतींतील मोठा परिश्रम म्हटला म्हणजे सौर आणि चांद्र वर्षपद्धतींची जुळणी करणें हा होय. या पद्धतीचे प्रयत्‍न फार प्राचीन काळापासून चालू आहेत, व आजहि संपले आहेत असें नाहीं. याविषयीं विवेचन व पंचांगविषयक आज चालू असलेले वाद यांची माहिती पुढें ‘ पंचांगशोधन ’या लेखांत सांपडेल.

चांद्र व सौर या कालगणना दोन मिळत्या करून घेण्याचे प्रसंग अत्यंत प्राचीन राष्ट्रांत आणि प्राचीन पद्धतींतहि दिसून येतात. आणि या प्रसंगाचें कारण वर्षें सूर्यावरून मोजावीं की चंद्रावरून मोजावीं यासंबधानें विकल्प होय. चंद्राच्या साह्यायानें महिने मोजण्यास सोपे, व वर्षें मोजण्यास सूर्य अधिक उपयोगी यामुळें दोन प्रकारची वर्षें येणार; आणि तीं मिळतीं करून घ्यावी लागणार. आपल्याकडे दोन्ही प्रकारच्या वर्षांचा प्रचार आहे.

सौर वर्ष:- सूर्यास मेषापासून मीनपावेतोंच्या बारा राशींचा उपभोग घेण्यास म्हणजे त्यांतून परिभ्रमण करण्यास जेवढा वेळ लागतो त्यास सौर वर्ष असें म्हणतात. पंचसिद्धांतिकेंतील मूल सूर्यसिद्धांताप्रमाणें एका सौर वर्षांत ३६५ दिवस, १५ घटिका, ३१ पळें व ३० विपळें असतात. पण या संबंधात मतभेद असल्यामुळें हा काळ अगदीं बरोबर आहे असें मात्र मानितां येत नाही. सूर्याचें एका राशीतून दुसर्‍या राशींत जें संक्रमण होतें त्यास संक्रांति असें म्हणतात. ज्या राशीतं सूर्य प्रवेश करितो त्या राशीचें नांव संक्रांतीस देण्यांत येत असतें. उत्तरेस, बंगाल्यांत व पंजाबांत आणि दक्षिणेस मलबारपासून कन्याकुमारीपर्यंत व तिन्नवेल्ली जिल्ह्यांत व्यवहारांत सौर वर्षाचा उपयोग करण्यांत येतो. त्याचे महिनेहि सौरच असतात-म्हणजे एका संक्रांतीपासून दुसर्‍या संक्रातीपर्यंत एक महिना समजला जातो. सौर महिन्यास बहुधा ज्या राशींत सूर्य असतो त्या राशीचेंच नांव दिलेलें असतें तिन्नवेल्ली जिल्हयासारख्या कांहीं ठिकाणीं मात्र सौर महिन्यास राशीचीं नांवे न देतां मेष महिन्यास वैशाख, वृषभ महिन्यास ज्येष्ठ, याप्रमाणे चैत्रादि व्यावहारिक नांवेच दिलेलीं आढळतात. सौर मासांत तिथीच्या ऐवजीं एक, दोन, तीन या प्रमाणें २९, ३०, ३९ किंवा ३२ दिवस असतात. बंगल्यांतील लोक संक्रांतीच्या दुसर्‍या दिवसास महिन्याचा पहिला दिवस धरतात; परंतु पंजाब वगैरे उत्तरेकडील डोंगराळ मुलखांत संक्रमण दिवसा झाल्यास तोच दिवस, व रात्री झाल्यास दुसरा दिवस, नवीन महिन्याचा प्रथम दिवस समजतात.

सामान्यत: हिंदू लोकांच्या पंचांगांत मासगणना  चांद्र व वर्षगणना सौर असते. चांद्र मासाची व सौर वर्षाची सांगड घालून देण्याकरिंता ज्या चांद्र मासांत मेषसंक्राति होईल तो चैत्र, वृषभ संक्राति होईल तो वैशाख अशा रीतीनें चांद्र मासास नांवें देऊन ज्या महिन्यांत संक्रांति येणार नाहीं त्यास न झालेल्या संक्रांतीच्या नांवाचा अधिक मास किंवा मलमास धरतात, व एखाद्या महिन्यांत दोन संक्राती आल्यास एका महिन्यास क्षय झाला असें मानतात, वगैरे माहिती पंचागासंबंधी विवंचन करतांना अगोदर देण्यांत आलीच आहे ( हाच विभाग पृ. ९७ पहा ).

चांद्रवर्ष:- दोन चांद्र पक्षांचा एक चांद्र मास होतो व अशा बारा चांद्र महिन्यांचे एक चांद्र वर्ष होतें. नर्मदा नदीच्या उत्तरेकडील हिंदू लोकांचा चांद्र मास पौर्णिमांत असतो. परंतु  नर्मदेच्या दक्षिणेकडील लोकांप्रमाणें उत्तर हिंदुस्थानांतील लोकांतहि आरंभी चांद्रमास अमांतच असला पाहिजे. कारण, अद्यापहि उत्तर हिंदुस्थांनात वर्षाचा व अधिक महिन्याचा आरंभ शुद्ध प्रतिपदेपासूनच धरण्यांत येत असतो; व दक्षिण हिंदुस्थानांतील लोकांप्रमाणें तेहि अमावास्येकरिता ३० चाच आंकडा लिहीत असतात. मुसुलमानांच्या चांद्र मासांचा आरंभहि चंद्रदर्शनापासून म्हणजे बहुधा शुद्ध द्वितीयेपासूनच होत असतो. पोर्णिमांत व अमांत चांद्र मासांच्या कालगणनेंतील फरक काय असतो याचें स्पष्टी करण पृष्ठ ९८ वर अगोदर केलेलेच आहे. सूर्यसिद्धांताप्रमाणें एका चांद्र वर्षांत ३५४ दिवस, २२ घटिका, १ पळ व २४ विफळें असतात. आपणां हिंदू लोकांत मास, पक्ष व तिथि यांची गणना चांद्रमानाप्रमाणेंच होत. परंतु सौर वर्षापेक्षां चांद्र वर्षांत १० दिवस, ५३ घटिका, ३० पळें व ६ विपळें कमी असल्यामुळें सौरमानांत व चांद्रमानांत ३२ महिन्यांमध्यें एका महिन्याचा फरक पडतो. तो भरून काढून व चांद्रमानाची सौरमानाशीं सांगड घालून चांद्र मासाचा व ऋतूंचा संबंध कायम राखण्याकरितां अधिकमास व क्षयमास धरण्याची पद्धत सुरू केली गेली. या योजनेमुळें मुसलमानांच्या चांद्र वर्षांतील वाटेल तो महिना जसा वाटेल त्या ऋतूंत येऊं शकतो व १०० सौर वर्षांत त्यांच्या चांद्र वर्षांची जशीं अजमासें ३ वर्षें २४ दिवस व ९ घटिका वाढतात, तसा कांहीं प्रकार आपल्या हिंदू चांद्रसौर वर्षांत होत नाहीं. बंगाल, पंजाब, मलबार वगैरे कांही प्रांतांत शुद्ध सौरगणना प्रचलित आहे; पण हिंदू श्राद्धव्रतादि धर्मकार्ये तिथींच्या अनुरोधानेंच होत असल्यामुळें तेथेहि पंचांगांत सौर दिवसांबरोबर चांद्र महिने, पक्ष, तिथी वगैरे नमूद करण्याची व्यवस्था करावी लागते.

निरनिराळ्या शकांपासून इष्ट शक आणि इष्ट तारीख कशी काढावी तें ठरलें व तदनुरूप जंत्र्या तयार झाल्या, वर्षे ठरलीं, कालगणनेस प्रारंभबिंदु ठरला, तरी तेवढ्यानें कालगणनेचा प्रश्न सरत नाही. पद्धतशीर प्रारंभबिंदू स्थापन होण्यापूर्वी झालेल्या इतिहासाला कोणती कालगणना वापरावी हा प्रश्न शिल्लक राहतोच. या प्रश्नावर अर्वाचीन संशोधकांकडून जो परिश्रम केला गेला त्याशीं वाचकांचा परिचय पाहिजे.