प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ४ थे.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति- कालगणना,
आणि तीसाठी प्रारंभबिंदूची योजना.
वेदकालीन कालमापन:- ज्यांची अनेक वर्षांची कालगणनापद्धति परिचित आहे अशा राष्ट्रांमध्यें हिंदुस्थानाचा अंतर्भाव होतो. वैदिक काळीं शक नव्हते. युगकल्पना नव्हती, तरी कांहीतरी कालमापनपद्धति असलीच पाहिजे. त्यासंबंधानें शंकर बाळकृष्ण दीक्षित म्हणतात:
‘वेदांत कल्प हा शब्द केवळ कांही तरी कालमापन या अर्थी सुद्धां आढळून येत नाहीं. युग हा शब्द मात्र वेदांत कांही तरी कालाचा वाचक आहे यांत संशय नाहीं. तो काल म्हणजे अमुकच वर्षे असें कोणत्याहि वाक्यावरून स्पष्ट होत नाहीं. तथापि वेदांगज्योतिषांत आलेल्या पंचसंवत्सरात्मक युगाच्या ज्या संवत्सर, परिवत्सर, इदावत्सर, अनुवत्सर, इद्वत्सर ह्या अवयवीभूत वर्षसंज्ञांचा वेदोत्तरकालीन ग्रथांत अनेक ठिकाणीं निर्देश आलेला आढळतो, त्यापैंकीं ऋ. सं. ७. १०३, ७-८ मध्यें संवत्सर व परिवत्सर हे दोन शब्द आले असून ऋ. सं. १०. ६२, २ मध्यें परिवत्सर शब्द आणखी एकदां आला आहे. नुसत्या वर्षासंबधीं कांहीं सांगावयाचें असतां ऋग्वेदांत त्याबद्दल बहुधा शरद् हेमंत यांसारखा एखादा ऋतुवाचक शब्द येतो. याशिवाय वा.सं. २७. ४५ मध्यें संवत्सर, परिवत्सर, इदावत्सर, इद्वत्सर,वत्सर; वा. सं. ३.१५; व तै. ब्रा. ३.४,१ या दोहोंतहि संवत्सर, परिवत्सर, इदावत्सर, इद्वत्सर, वत्सर व पुन्हां संवत्सर; तै. ब्रा. १.४, १० मध्यें संवत्सर, परिवत्सर, इदावत्सर व अनुवत्सर; तै. ब्रा. ३.१०,४ मध्यें संवत्सर, परिवत्सर, इदावत्सर, इदुवत्सर [ = अनुवत्सर- माधवाचार्य ] , इद्वत्सर व वत्सर; अशीं नावें निरनिराळ्या प्रकारांनीं आली आहेत. यावरून, सर्वांशीं वेदांगज्योतिषांतील पंचसंवत्सरात्मक युगपद्धतीसारखी नसली तरी कांही अंशी तशी पद्धति वेदकालीं प्रचारांत असावी असें दिसतें. ऋ. सं. १. १५८, ६ मध्यें दीर्घतमा दहाव्या युर्गी म्हातारा झाला अशा अर्थाचा एक मंत्र आहें अर्थात् यांत दीर्घतम्याचें कांही तरी वैशिष्टय सांगण्याचा हेतु असला पाहिजे. वेदांगज्योतिषांतील पांच वर्षांचें युग घेतलें तर तो ५० व्या वर्षी म्हातारा झाला असें होईल; पण तें तर उलट कमीपणा दाखविणारें आहे. मनुष्याची वयोमर्यादा १०० वर्षें धरल्यास या मंत्रांत युग १० वर्षांचें तरी मानावें लागतें. यावरून, आणि युगायुगाच्या ठायीं आम्ही तुझी स्तुति करतों अशा अर्थांचा ऋ. सं. ६. ८, ५ मध्यें उल्लेख आला आहे त्यावरून युग हें एका मनुष्याच्या आयुष्यांतील कांही कालपरिमाण- अर्थात् १०० हून कमा- असें दिसून येतें. तथापि, ‘ पूर्वी देवयुगामध्यें अमुक झालें’ ‘ सांप्रतचीं मानवी युगें,’ असे उद्गार ( ऋ. सं. १०.७२,२; १.१०३,४;५.५२,४;५.७३,३) युग म्हणजें कांहीं तरी मोठा काल अशी कल्पना बोलणार्याच्या मनांत असल्यावाचून निघण्याचा संभव दिसत नाहीं. यावरून युग शब्दाचा अर्थ नियमित नव्हता असें म्हणावे लागते. यामुळे काहीएक गोष्ट काहीएक क्रमाने एकदां घडून ती तशाच कालक्रमानें पुन्हां घडण्याचें जें एक कालपरिमाण तें युग, हा ज्योतिषांतील युगाचा अर्थ (उ. आर्यभटीयाची परमादीश्वरकृत भटदीपिका टीका, गीतिकापाद आर्या ७ पहा ) वेदकालीहि असेल असें वाटूं लागतें. महायुग म्हणजे ४३,२०,००० वर्षे हें परिणाम जरी त्या वेळीं प्रचारांत नसलें, तरी युग म्हणजे कांही तरी दीर्घकालाचें मान इतका तरी अर्थ वेदकालीं होता. इतकेंच नाहीं तर, “ या औषधी:पूर्वा जाता देवेभ्यस्त्रियुगं पुरा ” (ऋ. सं. १०. ९७, १ व सायण भाष्य पहा) या व याच अर्थाच्या तैत्तिरीय संहितेंतील व वाजसनेयि संहितेंतील ( १२. ५५) वाक्यांवरून युगसंख्या ४ ही कल्पनाहि वेदत्रयीसंहिताकालीं असावीं असें दिसतें [ महीधरानें वाजसनेयिसंहितेवरील भाष्यांत त्रियुग शब्दाचा अर्थ वसंत, वर्षा व शरद् हे ऋतू असा दिला आहे. सायणभाष्यकार कृतत्रेताद्वापर हीं तीन युगें किंवा वसंतवर्षाशरद् हे तीन ऋतू असे दोन्ही अर्थ देतात]. वेदांत कृतादि शब्द कांही एक कालपरिमाण या अर्थी आले आहेत असें सिद्ध करतां येत नाहीं. तथापि त्या चार देवता मानल्या जात असत; व त्यांत कृत हें चांगलें त्रेतादि उत्तरोत्तर कमी योग्यतेचीं व कलि अगदीं वाईट ही कल्पना मात्र स्पष्ट दिसून येते ( तै. सं. ४. ३,३; वा. सं. ३०.१८; तै. ब्रा. ३.४,१ व १.५,११; ऐ. ब्रा. ३३.१५ ). युगें हीं कांहीं कालपरिमाणदर्शक आहेत व तीं चार आहेत ही समजूत इतर वेदवाक्यांवरून जर दिसून येते, तर मग वेदोत्तरकालीं फार प्रबल झालेली जी युगकल्पना तिचें मूळ कृतादि संज्ञा ज्यांत आहेत त्या उपरिनिर्दिष्ट वाक्यांतच असलें पाहिजे. द्वापर हा शब्द गोपथ ब्राह्मणांत (१.२८) एक कालपरिमाण ह्या अर्थी आला आहे.