प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ४ थे.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति- कालगणना,
आणि तीसाठी प्रारंभबिंदूची योजना.
रोमन कालगणना:- आजची यूरोपांत प्रचलित असलेली कालगणनापद्धति मूळची रोमन आहे. त्यांचें वर्ष सौर पद्धतीचें होतें आणि त्यांचें धार्मिक विधी कृषिविषयक होते. रोमन लोकांचें अत्यंत प्राचीन वर्ष चांद्र असावें असें म्हणतात. त्यांचें वर्ष जेव्हां चांद्र पद्धतीचें झालें तेव्हां त्यांचें गणिती ३५४ दिवसांचें वर्ष धरीत. त्यामुळें अर्थात् त्यांचे कृषिमूलक विधी करण्याचे दिवस मागेंपुढे होत. रोमन लोकांनीं सौर पद्धति अमलांत आणली याचें हेंच कारण होय. वर्ष कृषिमूलक विधीस जुळतें करून घेण्याचें काम पाँटिफिसिस (धर्मधिकारी) यांजवर पडून त्यांजकडून रोमन कालगणनेंत वारंवार सुधारणा होऊं लागली. सीझरनें ज्या अनेक क्रांतिकारक गोष्टी केल्या त्यांतील एक म्हटली म्हणजे पंचांगसुधारणा होय. ती सुधारणा करण्यापूर्वी चांद्र व सौर वर्षांची तोंडमिळवणी करून घेण्याकरितां एक वर्ष ३५५ दिवसांचे असें करून सूर्यावर अवलंबून असणारे, म्हणजे शेतकीच्या कालाशी विशेष संबंध असणारे दिवस योग्य स्थानावर आणीत. ही कालगणनापद्धति सीझरला पसंत पडली नाहीं. त्यामुळें तो सर्वाधिकारी (डक्टेटर) व धर्माधिकारी (पाँटिफिसिस) असतांना त्यानें धृष्टपणानें सोसिजिनिस नांवाच्या ज्योतिष्याच्या साहाय्यानें एक पंचांगसुधारणा केली. त्यानें ख्रि. पू. ४६ वें वर्षं ४४५ दिवसांचें केलें आणि पुढील वर्षे ३६५ दिवसांची केलीं. पूर्वी वर्ष मार्चमध्यें सुरू होत असे पण ख्रि. पू. १५३ सालापासून कॉन्सल जानेवारींत अधिकारूढ होऊं लागले. सीझरच्या सुधारणेनंतर लवकरच वर्षारंभहि जानेवारीपासूनं करण्यांत आला.
ख्रिस्ती संप्रदायाच्या स्थापनेमुळें सर्व जगास सामान्य असा एक शक स्थापन झाला; एवढेंच नव्हे, तर त्यांची संप्रदायविशिष्ट पंचागपद्धति चोहोंकडे पसरली. तींत सुधारणा पुष्कळ होत गेल्या. त्यांचें वर्णन शकविवेचन करतांना याच प्रकरणांत पुढें देऊं.