प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ४ थे.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति- कालगणना,
आणि तीसाठी प्रारंभबिंदूची योजना.
मृत कालगणनापद्धती:- तथापि ज्या राष्ट्रांची कालगणनापद्धति अगदींच मृत झाली अशी राष्ट्रें म्हणजे मेक्सिकन आणि मय हीं होत.
अमेरिकेच्या युकाटान प्रांतांतील मयनामक देश्य लोकांमध्ये जो कालगणनासंप्रदाय होता त्याजविषयीं माहिती आपणांस चिदं-बलं नांवाच्या ग्रंथापासून मिळते. चिंदं नांवाच्या एका प्रवक्त्यानें एक भविष्यावाद प्रसिद्ध केला आहे तो सांगणारा हा ग्रंथ आहे. ह्या ग्रंथामध्यें चार प्रकारची माहिती आहे. (१) फलज्योतिष आणि भविष्यवाद, (२) कालगणना व इतिहास, (३) आथर्वणज्ञान व उत्तरकालीन इतिहास आणि (४) ख्रिस्ती संप्रदायांची माहिती. हा ग्रंथ ज्या लिपींत लिहिला आहे ती लिपि स्पॅनिश संन्याशांनी लोकांस शिकविली आणि तींत मय भाषेमध्यें मय लेखकांकडून विज्ञान लिहिलें गेलें.
मेक्सिकन आणि मय लोकांच्या पद्धती त्या त्या राष्ट्रांच्या संस्कृतिवर्णनांत देण्याचें योजिलें आहे.
कालगणना करतांना आणि वर्षे मोजतांना प्रारंभबिंदु धरावा लागतो. हा प्रारंभबिंदु धरण्यासाठीं काय प्रयत्न झाले आणि प्रारंभबिंदु कोणता धरावा याविषयीं निरनिराळ्या राष्ट्रांनीं निरनिराळ्या योजना केल्या आहेत त्याचें स्थूल वर्णन आणि भारतीय खटपटीचें विशेष विवेचन येथें देतों.