प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ४ थे.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति- कालगणना,
आणि तीसाठी प्रारंभबिंदूची योजना.

मेसापोटेमियामधील इतिहाससंशोधनानें बायबलांतील इतिहासावर प्रकाश:- हिब्रू बायबलमधील ऐतिहासिक भागाशी अजमावून पाहण्याच्या दृष्टीनें असुरिया आणि बाबिलोनिया येथील राजांचे लेख फार महत्त्वाचे ठरले कांहीं काळपर्यत पॅलेस्टाइनच्या लोकांवर मेसापोटोमिया मधील शूर लोकांच्या स्वार्‍या चालल्या होत्या; आणि नवीन शोधांच्या आधारें, हिब्रू लोकांनीं तत्कालीन ज्या हकीकती नमूद केल्या होत्या त्यांची सत्यासत्यता, दुसर्‍या एका दृष्टीनें लिहिलेल्या इतिहासाच्या साधनांनी ठरविणें शक्य झालें. एकच गोष्ट भिन्न दृष्टींनीं मांडली गेल्याचीं उदाहरणे फारशी नसली तरी स्थूलमानानें ही तुलनेची कसोटी लावतां येते. अशी कसोटी लागल्यामुळें ज्या कित्येक गोष्टींचा उत्कृष्ट उलगडा झाला, त्यामध्यें सायरस अथवा कुरूस राजानें बाबिलोन शहरावर केलेल्या चढाईसंबंधांत झालेला उलगडा फार महत्वाचा आहे. हिब्रू बायबलाच्या लेखकांनां ह्या महत्वाच्या गोष्टीबद्दल फार अंधुक माहिती होती; आणि ग्रीक इतिहासकार हेरोडोटस ह्याची ह्या अंधारामुळें दिशाभूल झाली असें अलीकडे उपलब्ध झालेल्या सायरस राजाच्या माहितीवरून आणि त्या वेळी बाबिलोनचें राज्य करीत असलेला नावोनिडास ह्याच्याहि हकीकतीवरून उघड दिसतें.

हिब्रु लेखांसंबंधी उपलब्ध झालेल्या ह्या असुरियांतील माहितीचें महत्व काय असा प्रश्न जगाच्या इतिहासकारांपुढे आला तर त्याचें सर्वस्वी समाधानकारक उत्तर देणें सोपें नाहीं. एवढें मात्र निर्विवाद म्हणतां येईल कीं, बायबल मधील ऐतिहासिक भाग ठोकळ मानानें खरा आहे, आणि तो लिहिणार्‍या लोकांचा समकालीन कागदपत्रांशी परिचय होता. ह्या भागांतील प्रमाद, घोटाळे आणि पूर्वग्रह ह्यांवरून असेंहि उघड होतें कीं इतर सामान्य इतिहासकारांचे दोष येथेंहि आहेतच. यासंबंधांत प्रो. सेसी असें म्हणतो कीं, बायबलमधील इतिहास सत्य आहे, परंतु बायबलरूपी ऐतिहासिक कागदपत्र ज्या अवाढव्य सारस्वतांचे केवळ खंड आहेत त्या सारस्वतांच्या अभावीं ह्या खंडाचा उलगडा लागणार नाहीं.