प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ४ थे.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति- कालगणना,
आणि तीसाठी प्रारंभबिंदूची योजना.

असुरियांतील इतिहाससंशोधन:- व्हिक्टोरियाच्या कारकीर्दीच्या आरंभी इजिप्त, आशियामायनर वगैरे देशांबद्दल गाढ अज्ञान होतें. इजिप्तच्या इतिहासाचीं साधनें टॉमस यंग वगैरे मंडळीच्या श्रमानें उपलब्ध झालीं होतीं खरीं; पण त्या साधनांचा उपयोग करून त्यांतील निगूढार्थ उकलणें फार प्रयासाचें काम होतें. ह्या देशांच्या ऐतिहासिक माहितीची तहान बायबलमधील तुटपुंजी माहिती आणि हेरोडोटस आणि डायोडरस वगैरे लेखकांची त्रोटक वृत्तें हृयांवर भागवावी लागे. ह्या राष्ट्रांची चिरनष्ट माहिती आपल्याला पुढें मागें मिळेल असें भाकीत त्या वेळी वेडगळपणांत मोडलें असतें. पण त्या वेळीं जें अशक्य वाटलें असतें तें लवकरच बोटा ह्या फ्रेंच गृहस्थाच्या आणि सर हेन्‍री लेअर्ड ह्या इंग्रजाच्या शोधांमुळें शक्य होत चाललें. प्राचीन निनिव्हि शहराच्या जवळ खणीत असतां त्यांनां ज्या वस्तू सांपडल्या त्यांवरून या पूर्वकालीन लोकांची कलाकुसरीच्या गोष्टीत किती प्रगति झाली होती हें तर प्रत्ययास आलेंच, परंतु लवकरच त्यांची मोठी पुस्तकालयेंहि सांपडली, ह्या पुस्तकालयांत जीं पुस्तकें उपल्बध झालीं ती मातीच्या विटांच्या रूपांत होतीं. या विटांची माती ओली असतांना त्यांवरील अक्षरें खोदलेली असून पुढें विटा भाजण्यांत आल्या तेव्हां ती अक्षरें चिरस्थायी झालीं. ही काहीतरी विशिष्ट लिपि आहे हें सर्वांना पटे, परंतु त्या पुस्तकांतील मजकुराचा आगापिछा कोणासच कळेना. “ इतकी जुनी लिपि ”तिचा प्रचारहि मोडलोला, आता कसचा त्याचा उलगडा  लागतो ” असें म्हणून कित्येक शंकावाचस्पती पाय गाळीत.

परंतु हें गूढ शेवटी उलगडलें. असुर लोकांच्या वर्णमालेंत आडवीं, उभीं किंवा तिरपी चिन्हे होतीं. वर्णसंख्या जवळजवळ पांचशें असून प्रत्येक वर्णाचे किमानपक्षी दोन निरनिराळे उच्चार होत. ह्यामुळें नवशिक्याला ही लिपि फारच दुर्बोध होई. पर्शियन लोकांनी वरील दोष काढून असुर लोकांची लिपीच चालू केली होती. जर्मन व्युत्पत्ति शास्त्रज्ञ ग्रोटफिंड ह्यानें पर्सिपोली येथील कांही शिलालेखांचा अर्थ करतांना पर्शियन भाषेंतील कांही वर्णांचे तरजुमे केले होते. निनिव्हि येथील ग्रंथसंग्रह जेव्हां सांपडला त्या वेळीं ग्रोटफिंडचें अनुयायी त्याचा शोध पूर्णावस्थेच नेत होते. पश्चिम इराणांत बेहिस्तान येथें एक तीन लिपीत लिहिलेला शिलालेख सांपडला आहे. डायोडरस ह्या इतिहास कारानें हा शिलालेख निनिव्हिच्या सेमिरामिस राणीचा आहे असें म्हटलें आहे, पण वास्तविक तो दारिअस राजाचा आहे.ह्या शिलालेखाची एक लिपि पर्शियन आणि दुसरी असुरी आहे. ह्या पर्शियन आणि असुरी लेखांचा मजकूर एकच आहे असें अनुमान काढण्यांत आलें. सर हेनरी रॉलिन्सन ह्याच्या परिश्रमानें शेवटीं असें आढळून आलें कीं ह्या पर्शियन शिलालेखांत विशेषनामांचा भरणा बराच आहे. विशेषनामांत भाषाभिन्नत्वामुळें फारसा फरक होत नाहीं, ही गोष्ट अनुभवसिद्ध असल्यामुळें साहजिकच असें ठरलें कीं पर्शियन शिलालेखांतील विशेषनामें असुरी भाषेंतल्या शिलालेखांत तशीच किंवा जवळजवळ तशींच आलीं असली पाहिजेत. ह्या सूचनेमुळें बर्‍याचशा असुरी वर्णांचे उच्चार कळून चुकले आणि असें ठरलें कीं असुरी भाषा सेमेटिक भाषासमुच्चयांचील असून तिचें हिब्रू भाषेशीं बरेंच साधर्म्य आहे.

ही माहिती जमेस धरून सर हेन्‍री रॉलिन्सन वगैरेंनीं आपले शोध पुढें चालविले; आणि ह्या मंडळींच्या परिश्रमानें असुरी भाषेचें व लिपीचें शास्त्र तयार होऊन त्या भाषेंत व लिपींत कांहीं विशेष बाऊ नाहीं हें लोकांनां पटलें. असुरी भाषेच्या खांचाखोंचा हुडकून काढणें आणि त्या भाषेच्या व्याकरणाची मांडणी कशी आहे हें ठरविणें हीं कामें करण्यासाठीं दिवसानुदिवस अधिकाधिक लोक पुढें सरसावत आहेत.

काम व्हावयाचें पुष्कळ असलें तरी झालेल्या श्रमांमुळें ह्या कीलाकृति लेखांचीं भाषांतरें करतां येऊं लागली आहेत. बोटा, लेअर्डप्रभृति लोकांनी जमविलेल्या साधनांत वरचेवर भर पडत आहे. असुरियापेक्षां प्राचीन अशा बाबिलोनी आणि खाल्डी लेखांची भर यूरोप आणि अमेरिका खंडांतील संग्रहालयांत वारंवार पडत चालली आहे. ह्या सर्वाचा परिणाम असा झाला आहे कीं, पौरस्त्य इतिहासाबद्दलच्या  पूर्वीच्या कल्पना पार पालटून गेल्या. हजारों वर्षांपूर्वी घडलेल्या घालमेलींची तत्समकालीन लोकांनीं लिहिलेली खडानखडा बरोबर माहिती मिळाली. पूर्वी ज्यांचा मागमूस देखील नव्हता अशा गोष्टींची संगति जुळून त्यांचें काल मुकरर ठरले. बर्‍याच ठिकाणीं कालनिर्णयाबद्दल वाद आहे व पुष्कळ वेळां हकीकतींत तुटकपणा वाटतो, हें खरें जों जों जास्त मागें जावें तों तों  घोटाळा वाढत जातो आणि खाल्डियाच्या पूर्वेतिहासाबद्दल तर फारच अनिश्चितपणा आहे. सारगाँन राजा हा पूर्वी पुराणांत गुरफटला होता पण आतां त्याच्या काळापर्यंत म्हणजे ख्रि. पू. ३८०० वर्षापर्यंतच्या पुष्कळ गोष्टीबद्दल खात्रीलायक बोलतां येतें ब्रिटिश संग्रहालयांतील कित्येक वस्तू ख्रि. पू. ४५०० वर्षांच्या आहेत आणि पेन्सिलव्हानिया विश्र्वविद्यालयांतील संशोधकांनी मातीच्या जमलेल्या थरांवरून असें ठरविलें आहे कीं सुमारें ९००० वर्षांमागें मेसापोटेमियांत बरीच सुधारणा झाली होती.