प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ४ थे.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति- कालगणना,
आणि तीसाठी प्रारंभबिंदूची योजना.
कालगणनेचा नैसर्गिक व व्यावहारिक गोष्टींशीं संबंध:- कालगणना करतांना मनुष्यांच्या कांही इच्छांस अवकाश मिळालेला आहे. एक इच्छा कालगणना आणि नैसर्गिक गोष्टी यांची जुळणी झाली पाहिजे ही होय. दुसरी इच्छा आपल्या आयुष्यांत आपणांस करावयाच्या गोष्टा करण्याची वेळ पंचांगावरून काढतां आली पाहिजे. उदाहरणार्थ, मृगाचा पाऊस पडला म्हणजे नांगरावयास लागावें, हा नियम घ्या. यांत शेतकर्यास मृगाचा पाऊस ओळखण्याइतकें ज्ञान गृहित धरलें आहे. तिसरी इच्छा म्हणजे उत्सव किंवा विधी यांचे काल बिनचूक सांगतां आले पाहिजेत. शेतकर्याला केवळ नांगरणी व लावणीच करावयाची नसते, तर वर्षांत अनेक गोष्टी ठराविक वेळीं करावयाच्या असतात. म्हणून त्याला वर्षांतील कालांची निरनिराळीं दर्शकें पाहिजेत. शेतकर्यास नक्षत्रावरून आपल्या कामापुरतें कालमापन सोपें होतें. त्यामुळें नक्षत्रांस महत्त्व स्वाभाविकपणें येणार. शेतकर्यास आपला कार्यक्रम ठरविण्यास योग्य म्हणजे सौरवर्ष होय. अमावस्या व पौर्णिमा या नैसर्गिक गोष्टी प्रत्येक मनुष्यास परिचित असतात. त्या नियमित काळानें येतात त्यामुळें त्यांचा उपयोग कालगणनेंत करणेंहि स्वाभाविक होय. धार्मिक उत्सव जेव्हां वर्षांतील ठराविक कृत्यांशी संबद्ध असतात तेव्हा त्यांचा काल थोडाबहुत निश्चित असतो: पण दिवस निश्चित करण्याकरितां ज्योतिषाची मदत लागते. त्यामुळें उत्सव, विधि वगैरे सर्व बाबतींत ज्योतिषाचा संबंध उत्पन्न होतो.