प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ४ थे.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति- कालगणना,
आणि तीसाठी प्रारंभबिंदूची योजना.
ऐतिहासिक लेखांचा नाश:- अशा तर्हेची नोंद करण्याचे जे प्रयत्न अगदी आरंभी झाले ते बहुतेक काळाच्या किंवा काळपुरूषांच्या तावडीत सांपडून नष्ट झाले ड्रुइड लोकांचे लेख ह्यांचा सत्यनाश झाला. सवादोन हजार वर्षेापूर्वी एका चिनी बादशहानें तत्कालीन ग्रंथ जाळून टाकिले आणि एका स्पॅनिश झोटिंगाने माँटेझुमा येथील चित्रसंग्रह धुळीस मिळविला. हेलॅसिनस् ( ख्रि. पू. ५ वें शतक ), जगाचा इतिहास लिहिण्याचा प्रथम प्रयत्न करणारा एफोरस ( ख्रि. पू. ४ थें शतक ) आणि ऑलिम्पिचतुर्थक कालमान धरून सिसिलीचा इतिहास लिहिणारा टायमिअस ह्यांच्या अस्सल ग्रंथाची आजमितीस कांहीच माहिती, उपलब्ध नाहीं. तदुत्तरकालीन लेखकांनी जीं अवतरणें त्यांच्या ग्रंथातून उद्धत केलीं आहेत त्यावरूंन वरील त्रयीबद्दल कांही जुजबी माहिती मिळते.
बाबिलोनचा रहिवाशी आणि इतिहासकार बरोसस (ख्रि. पू. ३ रें शतक) आणि ग्रीकमध्यें इजिप्तचा इतिहास लिहिणारा मॅनेथो ( ख्रि. पू. ३ रें शतक ) ह्यांच्या ग्रंथाचे फक्त अवशेष आज उपलब्ध आहेत; आणि ते अवशेष देखील सर्वथा विश्वसनीय आहेत असें नाहीं. एरॅटोस्थेनिस ( ख्रि. पू. २ रें शतक, उत्तरार्ध ) हा अलेक्झाँड्रियन ग्रंथसंग्रहाचा संग्राहक म्हणून तर प्रसिद्ध आहेच परंतु त्याच्या “ कालनिर्णायिका ”( क्रॉनोग्राफिया ) नांवाच्या ग्रंथामुळें त्याला कालनिर्णयशास्त्राचा प्रणेता किंवा आद्यप्रवर्तक ही पदवी प्राप्त झाली. ह्याचें पुष्कळसें लिहिणें निवळ अजमासी तर्हेचे आहे आणि अजमास कितीहि अस्सल दर्जाचा असला तरी त्याला आधार म्हणून जमेस धरता येत नाहीं. अॅपोलोडरस (ख्रि. पू. २ र्या शतकांचा मध्य) ह्यानें ट्रॉयचा पाडाव हा आरंभबिंदु मानून आपल्या काळापर्यंतचा छंदोबद्ध इतिहास लिहिला आहे.