प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ४ थे.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति- कालगणना,
आणि तीसाठी प्रारंभबिंदूची योजना.

कालगणनाशास्त्राचा विकास:-  कालगणनाशास्त्राचा मुख्य उद्देश या जगाच्या इतिहासांत कालक्रमानुसार ज्या गोष्टी घडून आल्या त्यांची नीटपणें कल्पना देणें व ह्या महत्त्वाच्या घडामोडीमध्यें गेलेल्या कालविभागांचा निर्णय करणें हा होय. एकंदर जागतिक इतिहासाचा कालक्रमहि ह्या शस्त्रानें दर्शविला जातो. गतकालाची माहिती ठेवण्याची कितीहि असंस्कृत पद्धति असली तरी तत्पूर्वीं खगोलाच्या गतीचें थोडेंबहुत ज्ञान असावेंच लागतें. कारण, त्याशिवाय कालगणना बरोबर करतां येणारच नाही. त्याचप्रमाणें सुधारलेल्या जीवनक्रमास आवश्यक अशा कलांमध्यें थोडी प्रगतीहि व्हावी लागते. ही प्रगति मागें गेलेल्या कित्येक पिढ्यांच्या संचित अनुभवावरूनच होणें शक्य असतें लेखनकलेच्या शोधापूर्वी मागें घडलेल्या गोष्टींची स्मृति अगदी शक्य तितकी बिनचूककपणें कांही थोड्या वर्षांपेक्षां जास्त कालपर्येत जागृत ठेवणें शक्यच नव्हतें. ज्या घडामोडींनीं मानववंशाच्या भौतिक परिस्थितींत फेरबदल घडवून आणला किंवा पृथ्वीवर नुकत्याच अस्तित्वांत आलेल्या मनुष्यप्राण्याच्या असंस्कृत मनोभूमिकेवर कायमचा परिणाम घडविला, अशा घडामोडींची माहिती दंतकथात्मक गोष्टींच्या स्वरूपांत हजारों लोखों युगांतून पुढें प्रसृत होणें शक्य झालें. परंतु त्यांमध्यें गेलेले कालविभाग प्रथम ठोकळ मानानें लक्षांत राहून पुढे हळूहळू स्मृतिपथांतून निघून जातात. लेकनकलेच्या शोधामुळें अस्पष्ट अशा दंतकथांबद्दल बिनचूक व कायम टिकणारा इतिहास लिहिणें शक्य झालें; परंतु जगाच्या बाल्यावस्थेंत कालगणना अचूक रीतीनें करण्याइतकें मानव जातीचें शिक्षण झालें नव्हतें. ह्या सर्व कारणांमुळेंच जगाच्या प्राचीन कालयुगांचा क्रम ठरविण्याचे प्रयत्‍न त्या मानानें अगदी अर्वाचीन आहेत. त्याच्या अगोदरचे कालगणनेचे ओबड धोबड प्रयत्‍न समजलें असतां प्राचीन लोक आपला व्यवहार कसा करीत हें समजेल.

मनुष्याचें कालगणनेकडे लक्ष जाण्यास त्याची बरीच प्रगति झाली असली पाहिजे. जेव्हां व्यापार वाढतो, व्याज आकारण्याचा प्रसंग येतो तेव्हां कालगणना अधिक सूक्ष्म करावी लागते. अशा कारणामुळें कालगणनेस कोणता तरी प्रांरंभबिंदु असला पाहिजे अशीहि भावना उत्पन्न होते.  प्रारभबिंदु उत्पन्न करून कालगणना पद्धतशीर करावी ही भावना जेव्हां मनुष्यास ऐतिहासिक दृष्टि येऊं लागते तेव्हां उत्पन्न होते. ही ऐतिहासिक दृष्टि उत्पन्न व्हावयास मनुष्यप्राण्याचा विकास बराच व्हावा लागतो.

निरनिराळ्या राष्ट्रांमध्ये प्रांरभबिंदु योजण्याचें प्रयत्‍न होणार. एका राष्ट्रांतच आपलें नांव किंवा आपणांस प्रिय अशा पुरूषाचें नांव अधिक चिरंजीव करण्यासाठीं पूर्वींचे प्रारंभबिंदू बंद करून नवीन प्रारंभबिंदू योजावयातेहि प्रयत्‍न होतात. अमेरिकन लोक पुष्कळशा कागदांत आपल्या राष्ट्रस्थापनेचें वर्ष हा प्रारंभबिंदु करतात. या गोष्टी लक्षांत घेतां कालगणनाशास्त्राच्या इतिहासाचे भाग येणेंप्रमाणें पडतात.

(१) कालगणना शिस्तवार करण्यासाठी शकस्थापनेच्या पूर्वींचे निरनिराळ्या राष्ट्रांतील प्रयत्‍न.

(२) निरनिराळे शक आणि त्यांचा विशेषें करून भारतातं प्रचार.

(३) निरनिराळ्या शकांची संगति लावण्याचा प्रयत्‍न

(४) एकशकप्रसार.

(५) शकपद्धति ज्या काळांत नव्हती त्या काळाच्या इतिहासलेखनासाठीं उपयोगीं पडणारें कालगणनाशास्त्र.

या सर्व गोष्टींकडें आपण क्रमश: वळूं.

कालगणनेसाठी आणि कालप्रारंभार्थ केल्या गेलेल्या ओबड धोबड यत्‍नांचा इतिहास द्यावयाच्या पद्धती दोन आहेत. एक पद्धति तौलकनिकमानववंशशास्त्रीय होय. आजच्या रानटी जाती आपल्या पूर्वजांसारख्या असतील अशी कल्पना करावयाची. आजच्यांचें अप्रगत रिवाज अवलोकन करावयाचें आणि त्यांपासून आजचे प्रगत रिवाज विकासवावयाचे. दुसरी पद्धति म्हटली म्हणजे विशिष्ट राष्ट्रांचे विकास शोधावयाचें. पहिल्या पद्धतीनें विवेचन करावयाचें म्हणजे अमेरिका व आफ्रिका खंडांतील देश्यांच्या व हिंदुस्थानांतील डोंगरी लोकांच्या पद्धती दाखवावयाच्या. त्यांपैकी कांहीचें पुढें विवेचन येईलच (कालगणना पहा).