प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ४ थे.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति- कालगणना,
आणि तीसाठी प्रारंभबिंदूची योजना.
कालमापनार्थ प्रारंभबिंदु ठरविण्याचे प्रयत्न भारताबाहेरील:- येथपर्यंत भारतातींल ओबड धोबड पद्धतीचें वर्णन झालें. आतां विशेष पद्धतशीर प्रयत्नांची माहिती देण्यापूर्वी जगभर कालगणनेला प्रारंभबिंदु उत्पन्न करण्यासाठीं काय काय प्रयत्न झाले याचा हिशेब घेऊं.
जूलियनशक:- खरें पाहिलें असतां हा कांहीं कालक्रम दर्शविणारा शक नाहीं. परंतु निरनिराळ्या शकांची परस्परांशी तुलना करतांना व ख्रिस्तपूर्व वर्षांची मोजदाद करतांना हा शक अत्यंत सोईस्कर असल्यामुळें कालगणना करणार्यांनी ह्या जूलियन कालविभागाचा बराच उपयोग केला आहे. ह्या शकाची एकंदर ७९८० वर्षें असून ख्रिस्त शकाचें ४७१४ वें वर्ष आहे.
ऑलिंपिक शक:- ग्रीस देशांत प्राचीन काळीं ज्या ऑलिंपिक खेळाच्या शर्यती होत त्यामध्यें विजयी झालेल्यांचा सन्मान करण्याच्या हेतूनें हा शक जूलियन शकांतीन ३९३८ व्या सालीं, म्हणजे ख्रि. पू. ७७६ व्या सालीं सुरू करण्यांत आला. ह्या शकांतील प्रत्येक “ ऑलिंपिअड ” नामक कालविभाग हा चार ऑलिंपिक वर्षांचा असें. ह्या ऑलिंपिक वर्षाचा आरंभ स्थूल मानानें जुलईच्या १ ल्या तारखेपासून समजण्यांत येतो. ऑलिंपिक शकावरून खिस्ती शकांचें वर्ष काढतांना ज्या दोन गोष्टी ध्यानांत ठेवावयाच्या त्या ह्या कीं, जर एखादी गोष्ट तारीख १ जानेवारी व १ जुलई यांच्या दरम्यान घडली असेल तर त्या ऑलिंपिक शकाच्या आंकडयाची व ख्रिस्तपूर्व शकाच्या आंकडयाची बेरीज ७७६ असते; व जर तीच गोष्ट १ जुलई व १ जानेवारी यांच्या दरम्यान घडली असेल तर ऑलिंपिक शताच्या आंकडयाची व ख्रिस्तपूर्व शकाच्या आंकड्याची बेरीज ७७७ असते. म्हणजे यांतून ऑलिंपिक वर्षै वजा केलीं तर ख्रिस्तपूर्व साल निघतें.
रोमस्थानपनाशक:- ह्या शकाचा आरंभ ख्रि. पू. ७४७,७५०,७५१,७५२ व ७५३ ह्या सालीं झाला अशीं निरनिराळ्या रोमन इतिहासकारांचीं निरनिराळीं मतें आहेत. ह्या शकांतील वर्षाचा आरभं एप्रिलच्या २१ तारखेस होतो हें मात्र निर्विवाद आहे. रोमन लोक दोन प्रकारांनी वर्षगणना करीतं. सार्वजनिक व खाजगी व्यवहारासाठीं ठरविलेलें वर्ष जानेवारीपासून मोजलें जाई व सरकारी दफ्तर, इतिहास वगैरेंमध्यें वापरण्यांत येणारें वर्ष एप्रिलच्या २१ तारखेस सुरू होई.
विश्वोत्पत्तिशक:- वास्तविक हा खरा शक नसून निरनिराळ्या लोकांनीं बायबलांतील आधारावर अनुमानानें हजारों प्रकारच्या ज्या कालगणना केल्या त्या होत. ह्या सर्वांत अत्यंत मोठी, अत्यंत लहान व सर्वमान्य अशा कालगणना अनुक्रमें ६९८४, ३४८३, व ४००४ ह्या होत. अर्थात् विश्वोत्पत्ति व नवीन मनुष्यनिर्मित शक यांजमधील हा कालविभाग अगदीं काल्पनिक आहे.
यहुदीकाल गणनावशक:- इस्त्राएल लोक इजिप्तमधून बाहेर निघून जाईपर्यंत ते आपल्या वर्षांस तुलाविषुवापासून आरंभ करीत; परंतु पुढे पुढें आपल्या मुक्ततेचें स्मरण ठेवण्याकरितां त्यांनीं मेषविषुवापासून वर्षारंभ करण्याची पद्धति पाडली. विश्वोत्पत्ति ही ख्रिस्ती शकाच्या ३७६० वर्षे व ३ महिने अगोदर झाली असें तें मानतात; व त्या दृष्टीनें ते आपली कालगणना करतात. परंतु ही कालगणना एकंदर घोटाळ्याचीच आहे.
काँन्स्टँटिनोपलशक:- हा शक विश्वोत्पत्तीपासून सुरू झाला असें मानण्यांत येत असून ख्रिस्ती शकाच्या १ ल्या वर्षीं ह्या शकाचें ५५०९ वें वर्ष पडतें. ह्या शकाचें व्यावहारिक वर्ष सप्टेंबरच्या १ ल्या तारखेस सुरू होत असून, धार्मिक वर्ष मार्च २१ ला सुरू होतें. हा शक रशियांत पिटर दी ग्रेट ह्याच्या कालापर्यंत सुरू होता व पुरोहित अद्यापहि तो वापरतात.
अलेक्झांड्रिया शक:- अलेक्झांड्रियाच्या ख्रिस्ती लोकांनीं जूलिअस आफ्रिकॅनस याची कालगणना स्वीकारून अँडँमच्या उत्पत्तीपासून खिस्ताच्या अवतारापर्यंतचा काल ५५०० ठरविला. अलेक्झांड्रियन वर्षाचें ख्रिस्ती वर्षांत रूपांतर करतांना एक गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे कीं, जूलिअसनें ख्रिस्ताचा अवतारकाल याच्या ३ वर्षे अगोदर मानला होता. म्हणजे खरा ख्रिस्तावतारकाल या शकानुसार ५५०३ हा होय. ही कालगणना डाओक्लेटिअनच्या राज्यारोहणापर्यत चालू होती; परंतु त्याच्या राज्यरोहणाच्या वर्षी म्हणजे ५७८७ या वर्षीं त्या सालांतून एकदम १० वर्षें कमी करून तें वर्ष ५७७७ असें समजण्यांत आलें.
अँटिओक येथील मंडेनशक:- ह्या अँटिओक येथील शकाला जूलियस आफ्रिकॅनसची कालगणनाच आधारभूत आहे. पॅनोडोरस नामक इजिप्शियन मठवाशाच्या प्रेरणेवरून सिरियामधील ख्रिश्चन लोकांनीं हा शक सुरू केला. पॅनोडोरस यानें जूलिअसच्या कालगणनेंतून १० वर्षें कमी केलीं व ख्रिस्तावतारकाल ३ वर्षें पुढें ढकलला.
नॅबोनसरशक.- ह्या बाबिलोनमधील शकाची ज्योतिर्गणितशास्त्रांत प्रसिद्धि आहे. टॉलेमी व हिपार्कस या खगोलशास्त्रवेत्त्यांनीं ह्या शकाचा पुष्कळ उपयोग केला आहे. टॉलेमीच्या लिहिण्यावरून असें दिसतें कीं ख्रि. पू. ७४७ च्या फेब्रुवारी महिन्याच्या २६ व्या तारखेस झालेल्या नॅबोनसरच्या राज्यारोहणापासून ही शकगणना सुरू झाली. जूलियन व बाबिलोनी वर्षांचें कालमान भिन्न असल्यामुळें ह्या शकाच्या वंर्षास जुळणारीं दुसर्या शकांतील वर्षें काढणें दुर्घट झाले. या शकाच्या सालावरून दुसर्या शकाचें साल काढण्यास तज्ज्ञ लोक एका तुलनात्मक कोष्टकाचा उपयोग करतात.
मॅसिडोनी उर्फ सिल्यूकिडीशक:- ख्रि. पू. ३११ सालीं बाबिलोनमध्यें सिल्यूकस निकेटार याचें राज्य झाल्यापासून या शकास आरंभ होतो. ह्या शकाचा सर्व ग्रीक प्रदेशांत प्रसार झाला होता व तो ख्रिस्ती शकाच्या १५ व्या शतकापर्यंत चालू होता. निरनिराळ्या ग्रंथकारांनीं ह्या शकाचा आरंभ निरनिराळ्या कालीं मानिला आहे. परंतु सामान्यत: ह्या शकाचा आरंभ ख्रि. पू. ३१२ सालापासून धरतात (पुढें हिंदुस्थानांतील शकांच्या वर्णनांत दिलेला सिल्यूकिडी शक पहा).
अलेक्झांडरशक:- कांही ग्रीक इतिहासकारांनी ख्रि. पू. ३२५ सालीं अलेक्झांडर मरण पावला तेव्हांपासून या शकाची गणना केली आहे. परंतु .या शकाचा बिलकुल प्रचार नाहीं.
टायर येथील शक:- ख्रि. पू. १२६ सालच्या आक्टोबर महिन्याच्या १९ तारखेपासून ह्या शकास आरंभ होतो. ह्या शकाच्या सालावरून ख्रिस्ती शकांचें साल काढावयाचें असल्यास त्याच्या आंकड्यांतून १२५ वजा करावे व ख्रिस्तपूर्व सालावरून या शकाचें साल काढण्यास ख्रिस्तपूर्व साल १२६ मधून वजा करावें.
अँटिओक येथील सीझेरियन शक:- ख्रिस्तपूर्व ४८ सालीं ९ ऑगस्टला जूलिअस सीझरनें जो जय मिळविला त्याच्या स्मरणार्थ हा शक सुरू झाला. परंतु सिरियन व ग्रीक लोकांच्या याच शकाच्या गणनेंत ११ महिन्यांचें अंतर आहे. कारण ग्रीक लोकांनी हा काल ११ महिने मागें ढकलिला.
जूलियन शक:- हा शक ख्रि. पू. ४५ सालच्या जानेवारीच्या १ ल्या तारखेपासून रोमन वर्षगणनेंतील सुधारणेचें स्मरण राखण्याकरितां सुरू केला होता.
स्पॅनिश शक:- ऑगस्टसनें ख्रि. पू. ३९ व्या वर्षी स्पेनचा पूर्ण ताबा घेतला व तेव्हापासून हा शक स्पेन, पोर्तुगाल इत्यादि रोमन प्रदेशांत सुरू झाला. ह्या शकावरून ख्रिस्ती शकांची वर्षें काढण्यासाठीं त्यांतून फक्त ३८ वर्षेच वजा करावीं लागतात.
अँक्टिअम शक व ऑगस्टस शक:- ख्रि. पू. ३१ सालांत सप्टेंबरच्या ३ तारखेस अँक्टिअम येथे झालेल्या युच्या स्मरणार्थ ह्या शकाचा आरंभ झाला. रोमन व इजिप्शियन लोकांनी हा शक चालू ठेवला होता. ह्यानंतर चार वर्षांनी म्हणजे ख्रि. पू. २७ सालीं ऑगस्टसनें रोमन सिनेट सभेस सर्व सत्ता सोडून देण्यास भाग पाडलें त्याच्या स्मरणार्थ ऑगस्टस शक सुरू झाला.
डायोक्लेटिअन शक किंवा मार्टीरशक :- वर सांगितलेंच आहे कीं डायोक्लेटिअन बादशहानें जूलिअस आफ्रिकॅनसच्या कालगणनेंत १० व वर्षे कमी केलीं. अलेक्झांड्रियांतील ख्रिस्ती लोकांनी ह्याच वेळीं म्हणजे इ. स. २८४ च्य २९ ऑगस्टला वरील डायोक्लेटिअन शक सुरू केला. पुढें ख्रिस्ती लोकांची कत्तल झाल्यापासून ह्याच शकास मार्टीर शक म्हणण्याचा प्रघात पडला.
आर्मीनियनशक:- ह्या शकाचा आरंभ इसवी सनाच्या ५५२ सालांतील जुलईच्या ९ तारखेस होतो. एकंदर व्यावहारिक गोष्टींत आर्मीनियन लोक प्राचीन इजिप्शियन शक वापरतात. परंतु धार्मिक गोष्टीत मात्र ते जूलियन शकाप्रमाणें चालतात.
कालगणनेच्या ओबड धोबड प्रयत्नांपासून पद्धतशीर शकपद्धति सुरू होण्यास बराच काळ लागला; आणि जरी आपणांस अनेक शक प्राचीन काळापासून काळ मोजणारे सापडतात तरी असें समजूं नये कीं विशिष्ट शकाच्या पहिल्या दुसर्या वर्षांपासून त्या शकानें कालगणना करण्यास सुरूवात झाली. उलट पक्षीं शक प्रचलित झाले ते उत्तरकालीं शास्त्रज्ञांनी किंवा लोकांनी आपल्या सोईकरितां केले; आणि शकप्रारंभ गणित करून शोधून काढले असेंहि झालें आहे. शिवाजीचा राजशक मात्र निघाला त्या वेळेसच वापरला गेला असें झालें असेल; पण त्या शकाचा प्रसार मात्र झाला नाहीं. शककृर्तृत्वाची आकांक्षा करणारे आपणांस अजूनहि सांपडतात. नेपाळांतील एका राजपुरूषानें पन्नाससाठ वर्षांपूर्वी निराळा शक स्वत:च्या नांवाने सुरू करण्याची महत्त्वाकांक्षा धरली होती.