प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ४ थे.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति- कालगणना,
आणि तीसाठी प्रारंभबिंदूची योजना.

पंचांगविषयक शास्त्रीय देवघेवीची कथा:- पंचाग घटनेचा प्राचीन कालापासून इतिहास द्यावयाचा म्हणजे, ज्या दीर्घ प्रदेशामध्यें शास्त्रीय देवघेव होती आणि ज्या प्रदेशामध्यें नव्हती असे जगाचे दोन भाग पाडून ज्या भागांत देवघेव नव्हती त्या भागांतील मृत झालेला शास्त्रीय प्रयत्‍न आणि ज्या भागांत देवघेव होती त्या भागांतील शास्त्रीय सातत्य देण्याचा प्रयत्‍न केला पाहिजे. देवघेव नव्हती असा भाग म्हटला म्हणजे प्राचीन इजिप्तच्या संस्कृतीपासून आणि मुसुलमानी संस्कृतीपासून अलिप्त असा आफ्रिका प्रदेश आणि यूरोपीय जातीच्या ताब्यांत येण्यापूर्वीचा अमेरिकेंतील काल होय. तसाच ग्रीक व इटली यांच्या संस्कृतीचा परिणाम होण्यापूर्वीचा यूरोपीय राष्ट्रांचा म्हणजे केल्टिक वगैरे लोकांचा शास्त्रीय प्रयत्‍न मृत विघेंतच मोडेल. देवघेव असलेल्या प्रदेशांतील शास्त्रीय सातत्याचें आणि देवघेवीचें सामान्य स्वरूप प्रथम लक्षून पुढें अधिक खोलांत शिरंता येईल.

बाबिलोनियामध्यें आपणांस अत्यंत प्राचीन ज्योतिषाचे पुरावे सांपडत आहेत. सार्गनच्या पूर्वी अनेक शतकें लिहिलेल्या टेलो येथील लेखांतली म्हणजे ख्रि. पू. ३००० च्या सुमाराची किंवा त्याहूनहि अधिक जुनी बारा महिन्यांची नांवें सांपडलीं आहेत. त्या काळापासून बाबिलोनियाचा ज्योतिषविषयक ज्ञानाचा इतिहास लिहिण्याचा प्रयत्‍न होतो. बाबिलोनियाच्या शास्त्राचा इजिप्तवर परिणाम ग्रीसमार्फत झाला आणि ग्रीसमार्फतच तो यूरोपावर झाला. कांही अंशी त्याचा चीनवरहि परिणाम झाला. चीनच्या शास्त्रावर हिंदुस्थानांतील शास्त्राचा परिणाम झाला. जपानी पंचांगपद्धति म्हणजे चीनच्या पंचांगपद्धतीची नक्कल होय. कांबोज (कांबोडिया), चंपा, वगैरे पूर्वेकडील द्वीपकल्पांतील राष्ट्रांत भारतीय व चिनी कालगणनेच्या अंगांची भेसळ आहे. चीन, हिंदुस्थान, ग्रीस, प्राचीन इराण. इत्यादि राष्ट्रांमध्ये जरी आपाआपसांत देवघेव झाली तरी प्रत्येकाचा स्वकीय अंश असा कांहीं तरी होताच आणि तो कायमहि राहिला. प्रत्येक देशांत किंवा संस्कृतींत पारमार्थिक संप्रदायांच्या उद्धवामुळें कांही नवीन उपवास, सण किंवा व्रतें हीं उत्पन्न झालीं, आणि त्यामुळें ज्या काळांत त्यांच्या संप्रदायांचे नियम करण्याचा प्रसंग आला त्या काळाच्या शास्त्रीय परिस्थितीमुळें विशिष्ट कालगणनापद्धती लोकांत बराच कालपर्यंत स्थित झाल्या. संप्रदायविशिष्ट पंचांग म्हणजे एखाद्या जुनाट काळांचें ज्योतिष आणि संप्रदायदिवसमहत्त्व यांचे एकीकरण होय. संप्रदायांच्या प्रसाराबरोबर अनेक राष्ट्रांतील परंपरागत कालगणनापद्धती मागें पडून संप्रदायस्वीकृत कालगणना लोकांवर लादली गेली. त्यामुळें अनेक प्रदेशांमध्यें भिन्नसंप्रदायी लोकांच्या भिन्न कालगणनापद्धती चालू झाल्या. असले पराक्रमी संप्रदाय म्हटले बौद्ध, ख्रिस्ती व मुस्लिम हे होत. अशी थोडक्यांत पंचांगविषयक शास्त्रीय देवघेवीची कथा वर्णितां येईल.