प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ४ थे.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति- कालगणना,
आणि तीसाठी प्रारंभबिंदूची योजना.
ग्रीकांच्या इतिहासाच्या साधनांची छाननी:- इजिप्त किंवा मेसापोटेमिया ह्यांचा इतिहास जसा जवळ जवळ नष्ट झाला होता तसा ग्रीक लोकांचा इतिहास झाला नव्हता.
ग्रीकांत मोठाले इतिहासकार झाले खरे, पण त्यांच्या राष्ट्राच्या इतिहासाची त्यांस पूर्णपणें जाणीव नव्हती. त्यांचें इतिहासाचें ज्ञान गेल्या तीन चार दशकांतच विशेष वाढलें. आणि त्या ज्ञानाच्या वाढीबरोबर कालगणना व ऐतिहासिक युगें पाडण्याची पद्धति यांत महत्वाचें फेरफार झाले. अर्वाचीन संशोधकांनी नवीन साहित्य पैदा केलें एवढेच नाहीं, तर जुनें साहित्य पुन्हां अभ्यासिलें. कविकल्पना आणि दंतकथा व ग्रीक लोकांच्या कर्तुत्वाच्या कल्पना लोकांच्या स्मरणांत होत्या. त्यांच्या आधारानें होमरनें आपल्या महाकाव्यांत ग्रथित केलेल्या गोष्टीची छाननी १९ व्या शतकाच्या प्रथम चरणांतील इतिहासकारांनी केली तेव्हां त्यांच्या सत्यतेविषयीं त्यांना संशय आला. वुल्फप्रभृति व्युत्पत्तिशास्त्रज्ञांनी तर सूक्ष्मपरीक्षणानंतर होमरनामक कोणी व्यक्तीच होती किंवा नव्हती अशी शंका काढली. होमरची महाकाव्यें हीं वस्तुत: निरक्षरतेच्या काळांत सामान्य लोकांच्या तोंडी बसलेल्या काव्यांचा मागाहून केलेला संग्रह आहे असें मानण्याकडे विद्वानांची प्रवृत्ति होत होती. ह्या काल्पनिक होमरच्या अस्तित्त्वाच्या अजमासीक काळापूर्वी ( ख्रि. पू. १००० ते ८०० ) ग्रीसमध्यें लेखनकला अवगत असणें असंभाव्य आहे व अतएव आपले म्हणणें बिनतोड आहे असें ह्या पक्षाचें ठाम मत होतें. पीसिस्ट्रेटसच्या अमदानींत ( ख्रि. पू. ६०५-५२७) ईलियड प्रथम लिहिलें गेलें असा समज रुढ झाला. पॅले तर ह्याच्याहि पुढें जाऊन असें म्हणूं लागला कीं, पेलॉपोनेशियन युध्दाच्या वेळीं ( ख्रि. पू. ४३१-०४ ) सदर काव्याची एकहि लिखित प्रत नसावी. होमरच्या महाकाव्यांबद्दलची वरील संशयवृत्ति आणि परंपरागत गोष्टीबद्दल अविश्वास दर्शविण्याची सर्वसाधारण वृत्ति ह्यांमध्यें मूलत: पुष्कळ साधर्म्य होतें. सावधवृत्तीनें लिहिणारे इतिहासकार असे म्हणू लागले की “वीरवृत्ती-युग” हे इतिहासकालाच्या पूर्वीचें आहे; त्याबद्दलची माहिती उपलब्ध तर नाहीच, पण ती पुढें मागें उपलब्ध होईल कीं नाही ह्याचीहि वानवाच आहे. सर जॉर्ज कॉर्नवाल लूई ह्यानें रोमच्या प्राचीन इतिहासाबद्दल लिहिताना असें सप्रमाण दाखविले कीं, एका शतकापेक्षां जास्त काळपर्यंत कोणतीहि गोष्ट केवळ तोंडी आधारावर शुद्ध स्वरूपांत टिकणें शक्य नाहीं. ह्यावरून असें ओघानेंच प्राप्त झालें कीं, ख्रि. पू. ६ व्या शतकापर्यंत जर लेखनकलेचा ग्रीसमध्ये उदय झाला नसेल, तर ख्रिस्ती शकाच्या अजमासें सात शतकें अगोदर घडलेली कोणतीहि गोष्ट अविकृत स्वरूपांत आज अवगत होणें शक्य नाहीं.
ग्रोट वगैरे परंपरा मानणारे लेखक असें मानीत कीं ग्रीसचा प्राचीन इतिहास हा गूढ आणि अज्ञेय आहे. दंतकथांवर ते विश्वास ठेवीत, परंतु त्यांचा प्रत्यक्ष हकीकतीशी मेळ घालण्याचा प्रयत्न ते करीत नसत. टिरिन्स, मायसिनी आणि हिसार्लिक वगैरे ठिकाणी ग्रीसच्या प्राचीन इतिहासाविषयीं बरेंच संशोधन करण्यासारखें आहे असें प्रतिपादन करून त्याप्रमाणें प्रयत्न करण्याचें श्रेय स्लीमन ह्यानें संपादिलें. प्रस्तुत संशोधकानें ज्याला ट्रॉय शहर म्हटले तेच ट्रॉय असेल किंवा नसेल; परंतु ह्या संशोधनामुळें होमरच्या कथावस्तूंच्या सत्याविषयीं बरीच आशा वाटूं लागली. प्राच्य पुराणवस्तु संशोधनाच्या हकीकतीची ज्याला माहिती आहे असा कोणीहि मनुष्य ईलियडमध्यें वर्णिलेली लढाई झालीच नसेल असें म्हणण्याचें धाष्टर्य करणार नाहीं. डॉ. आर्थर इव्हॅन्स प्रभृति लोकांच्या उद्योगामुळें अलीकडे मायसिनियन कालाबद्दल बरीच माहिती मिळाली असून, तत्पूर्वकालची आणि त्या पूर्वीच्याहि ईजिअन संस्कृतीची माहिती झाली आहे. ह्या हकीकतीत घोटाळा फार आहे, आणि ग्रीक लोकांच्या नाशवंत वस्तूंवर लिहिण्याच्या चालीमुळें हा घोटाळा नाहीसा होण्याची आशा फार कमी आहे; उपलब्ध शिलालेखांवरून जर कांहीं सिद्ध होत असेल तर तें इतकेंच कीं, ग्रीक लोकांशी निकट संबंध असलेल्या लोकांत लेखनकला फार पुरातन काळीं फैलावली होती. इजिप्तमध्यें ख्रिस्ती शकापूर्वीचें कांही लेख सांपडले, परंतु त्यांत देखील टॉलेमी राजांच्या काळापूर्वीचा (ख्रि. पू. ३३०-२३) काहींच मागमूस लागत नाहीं. अबु- सिंबेल येथील दुसर्या रामेसिसच्या पुतळ्यावरर्य जो लेख आहे त्यावरून हें उघड दिसतें कीं अलेक्झाँडरपूर्वी तीन शतकें (ख्रि. पू. ६ वें शतक) तरी ग्रीक लोकांत लेखनकलेचा चांगला फैलाव झाला असावा. क्रीट बेटांत सांपडलेले शिलालेख ह्यापेक्षा फार जुने असून ग्रीक भाषेहून भिन्न अशा दोन भाषांत ते लिहिले आहेत. ह्यावरून इतक्या प्राचीन काळीहि लेखनकलेचे अस्तित्व शाबीत होतें. ईलियड महाकाव्य केवळ तोंडी पाठपरंपरेनें प्रचारांत होतें असें मानण्याचें प्रयोजन ह्यामुळें उरत नाहीं.
लेखनकलेचा हा वरील मुद्दा तूर्त बाजूला ठेवला तरी होमरच्या काळीं इतर तत्कालीन लोकांप्रमाणें ग्रीक लोकांनांहि आपले विचार लेखरूपानें नमूद करतां येत ही गोष्ट अन्य साधनांनीं सिद्ध होत आहे. पुराणवस्तुसंशोधनामुळें पांचसहा हजार वर्षांपूर्वीच्या सुधारणेचे अवशेष उपलब्ध झाले आहेत. ग्रीसची सुधारणा ही पुढें उदयाला आली आणि तिला कांही आगापिछा नाहीं, ही कल्पना इतिहास कारानी उराशीं घट्ट धरून ठेवण्याचा कितीहि प्रयत्न केला तरी आधुनिक शोधांवरून ही गोष्ट निर्विवाद सिद्ध झाली आहे कीं, ग्रीसची संस्कृती फार पुरातन असून इजिप्तच्या संस्कृतीशी तिचा निकटचा संबंध आहे. क्रीट द्वीपकल्पांत सांपडलेल्या शिलालेखांचा इजिप्तशी संबंध आहे इतकेंच नव्हे तर तेल-एल-अमर्ना शहरी सांपडलेलें मातीकाम मायासिनियन पद्धतीचें असून तें ख्रि. पू. ० ४००-१३७० ह्या मुदतींत तयार झालें ही गोष्ट विशेष महत्वाची आहे.
तेल-एल-अमर्ना येथें सांपडलेल्या वस्तूंत बरीचंशीं पत्रें आहेत. बहुतेक पत्रे बाबिलोनियाच्या लिपींत आणि भाषेंत लिहिलीं असून पूर्व आशियामधील निरनिराळ्या प्रांतांतून तीं आलेलीं आहेत. प्रस्तुत पत्रसंग्रहांत मायसिनी प्रांतांतील पत्रें नाहीत ही गोष्ट सूचक आहे. बाबिलोनियाची संस्कृति ग्रीसमध्यें पोंचली नसावी असा ह्याचा निष्कर्ष निघतो. तथापि व्यापारी संबंधामुळें ह्या संस्कृतीचा कांही तरी सुगावा ग्रीक लोकांना लागलाच असेल.
ह्या आधुनिक शोधांमुळें पुराणकालीन इतिहासाची पुनर्घटना झाली आहे. ग्रीसच्या संस्कृतीसारखी संस्कृति अल्पावधींत पूर्णावस्थेला येणें शक्य नाहीं, तिची तयारी पायरीपायरीनें होत जावी लागते, विकासवाद येथेंहि लागू आहेच, ह्या आज अगदी उघड वाटणार्या गोष्टी पुराणवस्तुसंशोधकांच्या दीर्घोद्योगानें सिद्ध झाल्या.
वर जी असुरिया, बाबिलोनिया, इजिप्त व ग्रीस या प्राचीन राष्ट्रांतील इतिहाससंशोधनाची उदाहरणार्थ सारांशरूपानें माहिती दिली आहे तिजवरून ऐतिहासिक प्रसंगांचे नक्की दिवस, महिने किंवा वर्षे ठाऊक नसली व स्थूलमानानें कालनिश्चय करण्यासहि कांही ज्योतिर्विषयक प्रमाणें उपलब्ध नसलीं तर इतिहाससंशोधक कोणत्या पद्धतीचा अंगीकार करतात हें कळून येईल.
कालगणनेच्या विकासाची आतांपर्यंत विवेचिलेलीं अंगें म्हटलीं म्हणजे, (१) वर्षांतील दिवस मोजणें, (२) तिथी, वार वगैरेंचा विकास, (३) चांद्र आणि सौर पद्धतींचा मेळ बसविणें किंवा या दोहोंतील कोणती तरी पद्धति एक निष्ठपणानें वापरणें या क्रियेचा विकास, (४) निरनिराळे प्रारंभबिंदू किंवा निरनिराळे शक यांचा विकास व (५) जेथें ज्योतिर्विषयक प्रमाण नसेल किंवा दिवस, तारीख व वर्ष काढतां येत नसेल तेथें इतिहाससंशोधकांनी वापरलेल्या पद्धतीचा उपयोग हीं होत. कालमापनज्ञानाचा जो विकास आपणांस दृष्टीस पडतो त्यांत कालमापक यंत्रांचा विकास या भागाकडे थोडें तरी लक्ष दिल्याशिवाय हा विषय पुरा करतां येत नाहीं. तथापि, प्रत्येक ज्ञानप्रगतीशी संलग्न असलेली यांत्रिक प्रगति हा स्वतंत्र विवेचनाचा विषय धरून येथेंच हें प्रकरण संपवितों.