प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.

स्वभाववर्णन.- थई लोकांचें थोडेंसें स्वभाववर्णन देऊन, सयामच्या राजपद्धतीची ही संक्षिव्त माहिती पुरी करूं. त्यांच्या एकंदर स्वभांवात गुलामगिरीची वृत्ति दिसून येते; यामुळें सर्व वर्गाचे लोक अगदीं समानदर्जाचे आहेत असें दिसतें. सयामी लोक सरदारांची खुशामत करणारे असून ते नेहमीं आदरशील असतात; ते हट्टी व आळशी आहेत. इतर पूर्वेकडील उपभारतीय लोकांप्रमाणें त्यांनां आपल्या देशाबद्दल फाजील गर्व वाटत असल्यामुळें ते परकी राष्ट्रांनां तुच्छ मानतात. ते बढाईखोर असून, सोन्याच्या व चांदीच्या अलंकारांची त्यांनां आवड आहे. परंतु ते प्रामाणिक असून चौर्यकर्म करण्यापेक्षां मरण बरें असें त्यांनां वाटतें. ते नेमस्त व संयमी असून अगदीं आज्ञाधारक व शांतताप्रिय आहेत. त्यांचें कौटुंबिक वर्तन अनुकरणीय आहे; परंतु स्त्रियांच्या पातिव्रत्यास सयामी लोक फारसें महत्त्व देत नाहींत. शेतकी व उपयुक्त आणि ललित कला यांमध्यें त्यांची विशेष प्रगति झालेली नाहीं; तथापि या बाबतींतहि कांहीं गोष्टींत त्यांनीं बरीच कुशलता दाखविली आहे. ज्योतिःशास्त्र व वैद्यकशास्त्र या दोनच शास्त्रांकडे त्यानीं लक्ष दिलें आहे. गौतमाच्या धर्माचे ते कट्टे अनुयायी आहेत; सयाममध्यें गौतमाचें मुख्य स्थान असून त्या ठिकाणीं भिक्षूंचीं कित्येक देवळें व मठ आहेत. शिवाय, सयामी लोकांचें बौद्धधर्मविषयक उत्तम वाङ्‌मय आहे. सयामी लोकांच्या मनोवृत्तीवर ताबा असल्याबद्दल जरी तलपत्री लोक आंनद दर्शवितात तरी तिबेट व जपान या देशांप्रमाणें धार्मिक बांबतींत व कायदेकानूच्या बाबतींत या देशांतील राजावर त्या लोकांचें तितकें वर्चस्व नाहीं.

सयाममध्यें धार्मिक बाबी सर्वस्वीं राजाच्या ताब्यांत असून पुरोहितवर्ग त्याच्यावर अवलंबून असल्यामुळें लोकांवर जुलूम करण्यासाठीं तो त्यांचा उपयोग करतो वगैरे गोष्टींचा उल्लेख पूर्वींच केलेला आहे. शिक्षेच्या बाबतींत सयामी पुरोहितवर्गास कांहिंएक विशेष हक्क दिलेले नाहींत; त्यांनीं एखादा गुन्हा केला तर त्यांच्या पवित्र आचरणामुळें ते अधिक दूषित होतता अशी त्यांची सयुक्तिक कल्पना आहे. ते पुरोहित असल्यामुळें त्यांच्या वरील खटला गृहस्थ लोकांच्या खटल्याप्रमाणें चालवितां येत नाहीं. त्यांचा प्रथम धर्मधिकारदर्शक पोषाख काढून घेण्यांत येतो व अशा रीतीनें त्यांचा अधिकार निघाल्यानंतर त्यांनां सामान्य न्यायासनाच्या स्वाधीन करण्यांत येतें.